‘त्रिशतक’वीर इशांत!

किशोर पेटकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

क्रीडांगण

भारतीय क्रिकेटमध्ये तीनशेपेक्षा जास्त विकेट घेणारे सहा जण आहेत, त्यात वेगवान गोलंदाज तिघे. दिल्लीच्या इशांत शर्मा याने कपिल देव व झहीर खान या वेगवान गोलंदाजांसमवेत ‘थ्री हंड्रेड क्लब’मध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. 

बत्तीस वर्षांच्या इशांत शर्माने चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर मैलाचा दगड गाठला. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या डॅन लॉरेन्स याला बाद करून इशांतने ३००वा कसोटी बळी मिळविला. त्यासाठी त्याला ९८ कसोटी सामने खेळावे लागले. प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत पायाच्या दुखापती, मध्यंतरी हरपलेला सूर इत्यादी प्रतिकूलतेवर मात करत जिगरबाज इशांत टिकून राहिला. नव्या दमाचे वेगवान गोलंदाज संघात जागा मिळविण्यासाठी धडपडत असताना इशांतला संघर्षही करावा लागला, पण जिगर गमावली नाही. त्याचे पुढील लक्ष्य झहीरला (९२ कसोटीत ३११ बळी) मागे टाकण्याचे असेल. कपिलच्या ४३४ विकेटचा पाठलाग करताना त्याला खूप मोठी मजल गाठावी लागेल, शिवाय शरीराची साथही आवश्यक असेल. 

चौदा वर्षांचा प्रवास
सर्वोत्तम भारतीय वेगवान गोलंदाजांपैकी एक, ही इशांतची ओळख कायम राहील. चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करणाऱ्या या तेजतर्रार गोलंदाजाने २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिकी पाँटिंगला चांगलेच सतावले होते. तेव्हा तो अवघ्या १९ वर्षांचा होता. त्यापूर्वी मे २००७ मध्ये त्याने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, शिडशिडीत बांधा, लांब केस यामुळे हा वेगवान  गोलंदाज वेगळा भासायचा. तो आणि विराट कोहली समवयस्क. नोव्हेंबर २००६ मध्ये त्याने आणि विराटने एकाचवेळी दिल्ली येथे तमिळनाडूविरुद्ध रणजी सामन्याद्वारे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 

हुकमी गोलंदाज
वयोमानानुरूप इशांतच्या वेगवान गोलंदाजीत किंचित बदल जाणवतो, पण भेदकता आणि कुशलता कमी झालेली नाही, शिवाय परिक्वतेतही वाढ झालेली आहे. कसोटीत तो अजूनही भारताचा हुकमी गोलंदाज आहे. जुलै २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्याने सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. लॉर्डसवरील कसोटीत त्याने दुसऱ्या डावात ७४ धावांत ७ गडी बाद करून भारताने नोंदविलेल्या ९५ धावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बाब म्हणजे, ही कामगिरी नोंदविण्याच्या दोन वर्षे अगोदर इशांतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि यशस्वी ठरण्यासाठी त्याने झटपट क्रिकेटचा त्याग केला. आंतरराष्ट्रीय मैदानावर ऑक्टोबर २०१३ नंतर टी-२०, तर जानेवारी २०१६ नंतर तो एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. कसोटी कारकीर्द लांबविण्यासाठी त्याने घेतलेला निर्णय योग्यच ठरला आहे.

संबंधित बातम्या