जोकोविच, नाओमीचे वर्चस्व

किशोर पेटकर
सोमवार, 1 मार्च 2021

क्रीडांगण

महामारीने उद्‍भवलेल्या कठीण परिस्थितींचा सामना करत, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविने; तर जपानच्या नाओमी ओसाका हिने महिला एकेरीत वर्चस्व राखले. 

आं तरराष्ट्रीय टेनिसमधील ग्रँडस्लॅम मोसमाची सुरुवात ऑस्ट्रेलियन ओपनने होते, कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर मेलबर्न पार्कवरील ही प्रमुख स्पर्धा यंदा तीन आठवडे उशिरा सुरू झाली. स्पर्धा सुरू असताना मेलबर्न परिसरात काही कोविड-१९ बाधित सापडल्यामुळे कडक लॉकडाउन जाहीर झाला, पण स्पर्धेवर परिणाम झाला नाही. टेनिसप्रेमींविना सामने खेळले गेले. लॉकडाउननंतर मोजकेच टेनिसप्रेमी रॉड लॅव्हर अरेनावर परतले, तरीही हे भव्य टेनिस स्टेडियम सुनेसुनेच भासत होते. महामारीने उद्‍भवलेल्या कठीण परिस्थितींचा सामना करत, अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याने पुरुषांत, तर जपानच्या नाओमी ओसाका हिने महिला एकेरीत वर्चस्व राखले. जोकोविचने सलग तिसऱ्यांदा, तर एकंदरीत नवव्यांदा किताब पटकाविला. नाओमी हिने तीन वर्षांत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. 
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात कोविडमुळे कडक निर्बंध होते, सहभागी खेळाडूंना सक्तीच्या विलगीकरण प्रक्रियेतून जावे लागले, तरीही शेवटी खेळच जिंकला. जोकोविचनने अंतिम लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याला हरवून या स्पर्धेत सर्वाधिक एकेरी किताब मिळविण्याचा विक्रम बजावला. जोकोविचने तेरा वर्षांपूर्वी फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगा या हरवून सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर प्रत्येक अंतिम लढतीत त्याने बाजी मारत मेलबर्न पार्कवरील श्रेष्ठत्व अधोरेखित केले. 
जिगरबाज खेळ यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना जोकोविच पूर्णतः तंदुरुस्त नव्हता. उपांत्य फेरीपासून त्याचा खेळ खुलला. अगोदरच्या लढतीत आपण शंभर टक्के खेळत नव्हतो, ही कबुली त्यानेच दिली. तरीही त्याने हिंमत हरली नाही. या ३३ वर्षीय खेळाडूने पुरुष एकेरीत अव्वल स्थानाला साजेशी कामगिरी करताना मेदवेदेव याच्यावर सुमारे दोन तासांच्या खेळात सरळ सेट्समध्ये ७-५, ६-२, ६-२ अशी मात केली. रशियन टेनिसपटूला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मॉस्कोचा हा तृतीय मानांकित २५ वर्षीय खेळाडू जोकोविचची घोडदौड रोखू शकला नाही. 

माजी विजेत्या रॉजर फेडररची माघार, 
राफेल नदालचा अगोदरच्या फेरीत झालेला पराभव या पार्श्वभूमीवर जोकोविचला नव्या दमाचे खेळाडू रोखू शकतील का प्रश्नावर पुन्हा एकदा नकारार्थी उत्तर मिळाले. तिशी उलटलेला जोकोविच असो वा नदाल, तरुण पिढीतील खेळाडूंना ते भारी ठरत आहेत. गतवर्षी जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिम याला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन आठव्यांदा जिंकली होती. यंदा जोकोविचचा खेळ आणखीनच खुलला, त्यामुळे मेदवेदेव याला दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१९ साली अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत मेदवेदेव याला राफेल नदालने पाच सेट्समध्ये हरविले होते. 

विक्रमाच्या दिशेने
कारकिर्दीत अठरावे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावत नोव्हाक जोकोविच आता विक्रमाच्या दिशेने झेपावला आहे. रॉजर फेडरर व राफेल नदाल यांना गाठण्यासाठी त्याला आणखी दोन ग्रँडस्लॅम किताबाची गरज आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर जोकोविचसाठी बाकी मोसम खूपच खडतर आणि त्रासदायक ठरला. महामारीचा मोठा उद्रेक असताना युरोपात टेनिस मालिका आयोजित केल्यामुळे जोकोविचवर जगभरातून टीका झाली. त्यानंतर तो स्वतः कोरोना विषाणू बाधित झाला. अमेरिकन ओपनमध्ये अखिलाडूवृत्तीमुळे जोकोविचवर चांगलीच चिखलफेक झाली. चौथ्या फेरीतील लढतीत त्याने रागाने मारलेला चेंडू सामन्याच्या लाईन अधिकाऱ्याच्या गळ्यास जोराने लागला. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. त्याला चौथ्या फेरीत बाद करण्यात आले. फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत नदालने जोकोविचचा तीन सेट्समध्ये साफ धुव्वा उडविला. मागील कटू मोसमास तिलांजली देत जोकोविचने नव्या मोसमास सकारात्मक आणि यशस्वी सुरुवात केली आहे. मेलबर्न पार्कवरील  नऊ अजिंक्यपदाव्यतिरिक्त तो विंबल्डनच्या हिरवळीवर पाच वेळा जिंकलेला आहे. अमेरिकन ओपनमध्ये तीन वेळा, तर फ्रेंच ओपनमध्ये एक वेळ बाजी मारली आहे. वर्षाच्या सुरुवातीचा धडाका कायम राहिल्यास जोकोविचला याच वर्षी फेडरर आणि नदाल यांच्या विक्रमास आव्हान देणे शक्य होईल.

नाओमीचा धडाका
जपानमध्ये जन्मलेली आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील निवासी असलेल्या नाओमी ओसाका हिने कारकिर्दीत चौथ्यांदा ग्रँडस्लॅम यश प्राप्त केले. या कामगिरीने ही २३ वर्षीय खेळाडू आता महिला एकेरीत द्वितीय स्थानी आली आहे. चार वर्षांच्या कालावधीत नाओमीने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दबदबा राखला आहे. यावेळच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिचा सरळ दोन सेट्समध्ये पाडाव केला. २०१९ मध्ये तिने रॉड लॅव्हर अरेनावर पहिल्यांदा विजेतेपदाचा करंडक उंचावला होता. तेव्हा पेत्रा क्विटोवा हिचा तीन सेट्समध्ये संघर्षमय लढतीत पराभव केला होता. यावेळी पहिला सेट ६-४ आणि नंतर ६-३ फरकाने जिंकून तिने विजयास गवसणी घातली. जेनिफर ही २२वी मानांकित खेळाडू. अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना तिने उल्लेखनीय खेळ केला, मात्र नाओमीचा धडाका तिला परतावून लावता आला नाही. नाओमीने कारकिर्दीत चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे आणि एकदाही विजेतेपदाचा मान गमावलेला नाही. २०१८ साली अमेरिकन ओपनमध्ये सेरेना विल्यम्सला हरवून तिने प्रथमच ग्रँडस्लॅम यशाची चव चाखली. गतवर्षी सुपर मॉम व्हिक्टोरिया अझारेन्का हिला हरवून पुन्हा एकदा न्यूयॉर्कमधील स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले. मेलबर्न आणि न्यूयॉर्कमध्ये नाओमीने जबरदस्त खेळ केलेला असला, तर विंबल्डन आणि पॅरिसमधील रोलाँ गॅरोवर तिला तिसऱ्या फेरीच्या पुढे जाणे जमलेले नाही. वय तिच्या बाजूने आहे, त्यामुळे या ठिकाणीही ग्रँडस्लॅम धडाका राखण्याची तिला संधी असेल.

आदर्श खेळाडूला नमविले
अमेरिकेची सेरेना विल्यम्स तब्बल २३ ग्रँडस्लॅम एकेरी किताब पटकाविलेली महान महिला टेनिसपटू आहे. वयाच्या ३९व्या वर्षीही तिची जिगर अफलातून आहे. तिला विक्रमी २४वे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद साद घालत आहे, पण चार वर्षांत तिला सातत्याने हुलकावणी मिळत आहे. २०१७ साली मातृत्वाची चाहूल लागलेली असूनही ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली आणि अजिंक्य ठरली. मातृत्वानंतर २०१८ साली ती व्यावसायिक टेनिसमध्ये परतली, पण दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही तिला विजेतेपद मिळवता आले नाही. २०१८ व २०१९ मध्ये सलग दोन वर्षे विंबल्डन आणि अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली, तरीही उपविजेतेपदाने पिच्छा सोडला नाही. सेरेना यंदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी प्रयत्नशील होती, पण नाओमी तिला भारी ठरली. त्या पराभवानंतर सेरेना खूपच भावुक झाली. तिने अजून जिद्द सोडलेली नाही. त्यामुळे २४व्या ग्रँडस्लॅम करंडकासाठी ती फिरून एकदा प्रयत्न निश्चितच करेल, पण नाओमीसारख्या नव्या दमाच्या खेळाडू तिला भारी ठरत आहे हेसुद्धा सत्य आहे. सेरेनाला नाओमी आपला आदर्श मानते. सेरेना विल्यम्सच्या लढती पाहूनच मी मोठी झाले, असे नाओमीने मेलबर्नला उपांत्य लढत जिंकल्यानंतर सांगितले. टेनिसमधील आराध्य असली, तर टेनिस कोर्टवर नाओमीसाठी सेरेना कट्टर प्रतिस्पर्धी असते.

संबंधित बातम्या