क्रिकेटची मॅरेथॉन गर्ल!

किशोर पेटकर
गुरुवार, 25 मार्च 2021

क्रीडांगण
 

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दणकेबाज शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण साजरे करणारी मिताली राज, आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये दहा हजार धावांची टप्पा पार करणारी अवघी दुसरी बॅट्सवूमन, तर पहिलीच भारतीय ठरली आहे. 

मिताली राज... क्रिकेटमध्ये या महिला खेळाडूची ओळख फार मोठी आहे. मैदानावरील तब्बल २१ वर्षांची अचाट कामगिरी; वय वर्षे ३८, पण जोश अजूनही विशीतील तरुणींना लाजविणारा. तिची फलंदाजी भूरळ पाडणारी, नयनरम्य फटकेबाजी, विशेषतः कव्हर ड्राईव्ज डोळ्यांचे पारणे फेडणारे! भारतीय महिला क्रिकेट संघाची आधारस्तंभ हा लौकिक तिने सुरुवातीपासून टिकविला आहे. 

मितालीचा १९९९ ते २०२१ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास अविस्मरणीय आणि रोमांचित करणारा आहे. जागतिक क्रिकेटमधील ती सफल ‘मॅरेथॉन गर्ल’ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मितालीने पाच आकडी धावसंख्या गाठली. तिच्या २१२व्या वन-डे सामन्यात, तर एकंदरीत ३११व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण करताना मितालीने कौतुकास्पद तंदुरुस्तीही दाखवली. 

तंत्रशुद्ध बॅट्सवूमन

मितालीची फलंदाजी एकदम तंत्रशुद्ध. फटकेही प्रेक्षणीय. हवाई दलातील निवृत्त अधिकारी असलेल्या वडिलांच्या हट्टापायी मिताली क्रिकेट नेटमध्ये दिसली, कारण लहान वयातील मितालीचा आळस तिच्या वडिलांना अजिबात सहन होत नव्हता. सुमारे दहा वर्षांची असताना क्रिकेटसाठी मितालीने भरतनाट्यम सोडले. क्रिकेट सरावात झोकून दिल्यानंतर या हैदराबादस्थित मुलीने मागे वळून पाहिलेच नाही. २६ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या लढतीत ती सलामीला खेळली. नाबाद ११४ धावांची खणखणीत खेळी करणाऱ्या मितालीच्या असामान्य गुणवत्तेने साऱ्यांना दीपवून टाकले. त्यानंतर महिलांच्या कसोटीत द्विशतक झळकावून तिने आणखी मोठे शिखर सर केले. मिताली केवळ आदर्श बॅट्सवूमन नसून खंबीर कर्णधारही आहे. संघनायिका या नात्याने तिने भारतीय संघात चेतना जागविली, त्या बळावर २०१७ साली भारतीय महिलांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. 

विश्वविक्रमाच्या दिशेने...

तुम्ही जेव्हा दीर्घ काळ खेळता, तेव्हा कारकिर्दीत मैलाचे दगड आपोआप पार होतात, असे मितालीचे म्हणणे आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा करणारी ती पहिलीच आहे. टी-२० क्रिकेट नजरेआड केलेली कणखर मनोवृत्तीची ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेटाने फलंदाजी करतेय. त्यामुळे तिला विश्वविक्रमाची संधी आहे. दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सने सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये १०,२७३ धावा केल्या आहेत. मिताली या विक्रमापासून आता  जास्त दूर नाही. लवकरच आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या विक्रमाची ती सम्राज्ञी होऊ शकते.

 

संबंधित बातम्या