फसलेले आयपीएल नियोजन

किशोर पेटकर
सोमवार, 17 मे 2021

क्रीडांगण

जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक वलयांकित आणि लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नियोजन साफ फसले. देशभरात कोरोना विषाणू महामारीची दुसरी लाट आणि उद्रेक जीवघेण्या टप्प्यावर असताना आयपीएल घेण्याचा निर्णय बीसीसीआयवर चांगलाच शेकला. 

आयपीएल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले जैवसुरक्षा वातावरण (बायो-बबल) कोरोना विषाणूने पूर्णपणे भेदले. खेळाडू कोविड बाधित झाले. स्पर्धा टप्प्याटप्प्याने सहा केंद्रांवर खेळविण्याचा निर्णय पूर्णतः चुकला. आयपीएल स्पर्धेस नऊ एप्रिलला सुरुवात झाली, तेव्हा देशातील नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती, तरीही बीसीसीआयने धोरण बदलले नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू कोविड बाधित आढळले, मात्र जैवसुरक्षा वातावरणात प्रवेश केल्यानंतर सारे सुरळीत झाले. मुंबई व चेन्नईत कोविडची धग असूनही या ठिकाणचा आयपीएल टप्पा विघ्नविरहित पार पडला. पुढील टप्प्यात अहमदाबाद व दिल्लीत खेळण्यासाठी संघांना प्रवास करावा लागला आणि कोरोना विषाणूचा विळखा आयपीएलभोवती घट्ट झाला. 

फाजील अतिआत्मविश्वास
गतवर्षी भारतात कोरोना विषाणू महामारीचे साम्राज्य होते, त्यामुळे तुलनेत सुरक्षित असलेल्या संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) आयपीएलचा मोसम रंगला. गतवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दुबई, अबुधाबी, शारजाह या शहरांत आयपीएलचे सामने झाले. तेव्हा संघांना खूपच कमी प्रवास करावा लागला. संयुक्त अरब अमिरातीतील ही शहरे खूपच जवळच्या अंतरावर असल्याने बसनेही प्रवास शक्य झाला. भारत हा अवाढव्य देश असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना प्रवासाचा व्याप खूपच किचकट, जोखमीचा ठरतो. त्यामुळेच आयपीएलचे बायो-बबल भेदले गेले आणि त्यास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते या वर्षी मार्च या कालावधीत गोव्यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा झाली. फातोर्डा, बांबोळी व वास्को या तीन ठिकाणी सामने झाले. गोव्यातील अंतर्गत प्रवास कमी कालावधीचा असल्याने आयएसएलचे बायो-बबल तब्बल पाच-सहा महिने सुरक्षित आणि अभेद्य राहिले. कोविडचा कहर असताना बायो-बबलच्या संरक्षणात देशातील सहा शहरांतील प्रवास सुरक्षित ठरेल हा फाजील अतिआत्मविश्वास बीसीसीआयच्या अंगलट आला हे स्पष्टच आहे. स्टेडियम आणि सराव मैदान सुविधा चांगली असलेल्या एकाच शहरात आयपीएल घेण्याचे नियोजन आखले असते, तर कदाचित ते यशस्वीही ठरले असते. 

पुढे काय?
आयपीएलच्या २०२१ मोसमातील २९ सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. बंगळूर व कोलकाता येथील सामन्यांचे वेळापत्रक कागदावरच राहिले. आता स्पर्धा पुन्हा कधी सुरू होईल याचा नेम नाही. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणारच. त्यामुळे बाकी सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळविण्याचा विचार होत आहे. इंग्लंडमधील काही काऊंटींनी आयपीएल पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.

संबंधित बातम्या