महिला क्रिकेट प्रशिक्षकपद चर्चेत

किशोर पेटकर
सोमवार, 31 मे 2021

क्रीडांगण

भारतीय पुरुष क्रिकेट संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढतीसाठी मोर्चेबांधणी करत असताना, महिलांचे क्रिकेटही चर्चेत राहिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांना महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी प्राधान्य दिले. 
किशोर पेटकर

माजी कसोटीपटू मदन लाल, सुलक्षणा नाईक व रुद्रप्रताप सिंग यांचा समावेश असलेल्या समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली, त्यात माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार सरस ठरले आणि बीसीसीआयने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. पोवार यांनी डब्ल्यू. व्ही. रमण यांची जागा घेतली आहे. ४३ वर्षीय पोवार यांची दुसऱ्यांदा या पदी निवड झाली आहे. तीन वर्षांपूर्वी कटू स्मृतींसह त्यांना हे पद सोडावे लागले होते, तेव्हा कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज आणि पोवार यांच्यातील मतभेद उघड झाले होते. आताही मिताली इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार असून पुन्हा एकदा प्रशिक्षक पोवार यांच्यासमवेत काम करेल. २०१८ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर पोवार यांना प्रशिक्षकपद सोडावे लागले होते, त्यास मितालीच कारणीभूत होती असे मानले जाते. तेव्हा पोवार जुलै ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीसाठी प्रशिक्षकपदी राहिले.

प्रशिक्षकासमोर आव्हान
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून डच्चू मिळालेल्या पोवार यांची तेव्हा संघातील खेळाडू हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांनी पाठराखण केली होती. टी-२० संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधाराने पोवार यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. त्यानंतर रमण यांच्याकडे प्रशिक्षकपद आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली, पण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पोवार यांच्यासमोर आता मागील कडवटपणा विसरून संघाची भक्कम बांधणी करण्याचे आव्हान आहे. मितालीसमवेत कसोटी आणि एकदिवसीय संघाला कणखर मार्गदर्शन करायचे आहे. पोवार हे पक्के व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. या वर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यानंतर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी पोवार यांची मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांनी संघात नवा आत्मविश्वास जागविला आणि मुंबईने विजय हजारे करंडक जिंकण्याचा पराक्रम साधला.

दीर्घ कालावधीनंतर कसोटी
जूनमधील इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला क्रिकेट संघ दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळेल. यापूर्वी नोव्हेंबर २०१४मध्ये म्हैसूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटी लढत झाली होती. आता तब्बल सात वर्षांनंतर भारतीय महिलांना कसोटी क्रिकेटची संधी मिळत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघासाठी कसोटी सामना असेल. विशेष बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियात भारतीय महिला संघ प्रथमच गुलाबी चेंडूने दिन-रात्र कसोटी सामना खेळेल. तब्बल पंधरा वर्षांनंतर भारतीय महिला ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळतील, हेसुद्धा उल्लेखनीय आहे.

संबंधित बातम्या