किवींचे कसोटी जगज्जेतेपद

किशोर पेटकर
सोमवार, 5 जुलै 2021

क्रीडांगण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) विश्वकरंडक अथवा अन्य प्रमुख स्पर्धेत विजेतेपदाने हुलकावणी दिलेल्या न्यूझीलंडने अखेर ही उणीव भरून काढली. सभ्य, संयमी कर्णधार केन विल्यम्सन याने संघाचे परिपक्व नेतृत्व केले.

न्यूझीलंड कसोटी क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेचा विजेता ठरला. यापूर्वीच्या दोन स्पर्धांमध्ये त्यांचा भ्रमनिरास झाला होता. २०१५ सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत किवींनी अंतिम फेरीत जागा मिळविली. तेव्हा ब्रेंडन मॅकलम संघाचा कर्णधार होता, तर विल्यम्सन संघातील प्रमुख फलंदाज होता. मेलबर्न स्टेडियमवर तेव्हा ऑस्ट्रेलियाची सरशी झाली. चार वर्षांनंतर २०१९ साली ‘ब्लॅककॅप्स’ संघाने पुन्हा एकदा जिगर दाखवली. विश्वकरंडकातील उपांत्य फेरीत भारताला पराभूत करून त्यांनी यजमान इंग्लंडला आव्हान दिले. यावेळी न्यूझीलंडचा संघ खूपच कमनशिबी ठरला, त्यामुळे कर्णधार विल्यम्सनच्या हाती झळाळता विश्वकरंडक दिसला नाही. प्रत्येकी पन्नास षटकांत आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यानंतर इंग्लंडने सामन्यात जास्त चौकार लगावले या नियमाच्या आधारे विजयश्री प्राप्त केली.

सुसंस्कृत कर्णधार
किवींचा संघ २०१९मधील विश्वकरंडक विजेतेपदासाठी जास्त लायक होता. त्यांच्या खेळात सातत्य होते, पण आयसीसीच्या आगळ्यावेगळ्या नियमाने विल्यम्सन व त्यांच्या सहकाऱ्यांना दुःखसागरात लोटले. पण कर्णधाराने भावनांचा कडेलोट होऊ दिला नाही. शांतपणे त्याने पराभव स्वीकारला. तेव्हाचा केन विल्यम्सनचा सुसंस्कृतपणा पाहून जगभरातील क्रीडाप्रेमी त्याचे चाहते झाले. तीन वर्षांपूर्वीच्या कटू स्मृतींना तिलांजली देत न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीस भारतीय संघाला सामोरा गेला. विराट कोहलीच्या संघाला चारीमुंड्या चीत करून सर्वप्रथमच आयसीसीचा कसोटी ‘विश्वकरंडक’ जिंकण्याचा पराक्रम साधला.

व्यावसायिक क्रिकेटवर भर
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन वर्षांच्या कालावधीत न्यूझीलंडने पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोन राखला. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापूर्वी ते इंग्लंडमध्ये दोन सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरले. दोन्ही लढतीत ते यजमानांना भारी ठरले. पहिल्या कसोटीत पावसामुळे विजय हुकला, पण दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमने संघाला 
विजय मिळवून दिला, त्यामुळे ‘ब्लॅककॅप्स’चा आत्मविश्वास कमालीचा दुणावला. 
इंग्लंडविरुद्धच्या शानदार, सखोल कामगिरीने न्यूझीलंडने भारताला इशारा दिलाच होता. त्यातच भारतीयांचे अंतिम सामन्यासाठीचे नियोजन चुकले. साउदॅम्प्टनमधील वातावरण पावसाळी होते, त्यामुळे न्यूझीलंडने चार तेजर्रार गोलंदाज, तसेच एक उपयुक्त मध्यमगती गोलंदाज असा पूर्णतः वातावरण व खेळपट्टीस अनुरूप मारा वापरला. भारताने एक फलंदाज कमी करून दोघा फिरकी गोलंदाजांना संधी दिली, पण पावसामुळे सहाव्या राखीव दिवसापर्यंत लांबलेल्या अंतिम लढतीत भारतीय साऱ्याच आघाड्यांवर निष्प्रभ ठरले, फलंदाजांनी साफ निराशा केली. शानदार कामगिरीचे श्रेय न्यूझीलंडच्या परिपूर्ण नियोजनास द्यायलाच हवे.

संबंधित बातम्या