‘सोनेरी’ नीरज

किशोर पेटकर
सोमवार, 16 ऑगस्ट 2021


क्रीडांगण

अखेरीस अॅथलेटिक्समध्ये भारताला ऐतिहासिक ऑलिंपिक पदकविजेता गवसला. भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून २३ वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. ८७.५८ (मीटर) हे आकडे भारतीय क्रीडाजगतात आणि विशेषतः अॅथलेटिक्समध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जातील. 

खांडरा-पानिपत येथील नीरज चोप्रा हा अॅथलेटिक्समध्ये पदक आणि तेही सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय आहे. तेरा वर्षांपूर्वी २००८ साली बीजिंग ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत अभिनव बिंद्रा याने सोनेरी यश प्राप्त केले होते, त्यानंतर केवळ दुसऱ्यांदा नीरजमुळे ऑलिंपिकमधील वैयक्तिक पदक वितरण सोहळ्यात भारतीय राष्ट्रगीताची धून ऐकायला मिळाली. भारताने आत्तापर्यंत दहा ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यापैकी आठ पुरुष हॉकीतील आहेत. 

भारतीयांना प्रेरणा
नीरजचा अद्वितीय पराक्रम भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. नीरज तरुण आहे. शरीराने साथ दिली आणि जोश कायम राहिला, तर भविष्यात त्याच्या गळ्यात आणखी ऑलिंपिक पदके चकाकताना दिसू शकतील. १९६० साली रोममध्ये भारताचे थोर अॅथलिट मिल्खा सिंग यांचे कांस्यपदक ४०० मीटर शर्यतीत थोडक्यात हुकले होते. जूनमध्ये या महान धावपटूचे निधन झाले आणि ऑलिंपिकमध्ये भारतीय पदकविजेता जिवंतपणी पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. सुवर्णपदक जिंकून नीरजने भारताच्या दिग्गज क्रीडापटूस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतीय सेनेतील सुभेदार नीरज चोप्रा देशवासीयांच्या गळ्यातील ताईत झाला असून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे.

प्रबळ प्रतिस्पर्ध्यांनाही वरचढ
सन २०२१मध्ये टोकियो ऑलिंपिकपूर्वी जर्मनीचा जोहानेस व्हेटर (९६.२९ मीटर), पोलंडचा मार्सिन क्रुकोवस्की (८९.५५ मीटर), त्रिनिदाद-टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट (८९.१२ मीटर) यांची कामगिरी सरस होती. नीरजने मार्च महिन्यात पतियाळा येथे इंडियन ग्रांप्रीत ८८.०७ मीटरसह राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. मातब्बर प्रतिस्पर्धी प्रत्यक्षात टोकियोमध्ये भारतीय भालाफेकपटूच्या आसपास फिरकू शकले नाहीत. नीरज आपल्यास गाठू शकणार नाही आणि त्याचे आव्हानच नाही अशी वल्गना करणारा व्हेटर तोंडावर आपटला. ऑलिंपिकमध्ये २०१२ साली लंडनमध्ये सुवर्ण आणि २०१६मध्ये रिओत कांस्यपदक जिंकलेल्या वॉलकॉटला अंतिम फेरीही गाठता आली नाही. 

संधी साधली
नीरजच्या आंतरराष्ट्रीय जडणघडणीत ऑस्ट्रेलियन गॅरी कॅल्व्हर्ट, तसेच १०४.८० मीटरवर भाला फेकणारे महान उवे हॉन व क्लॉस बार्तोनिएझ या दोन्ही जर्मन प्रशिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. ऑलिंपिक सुवर्ण वाटचालीत नीरजला बार्तोनिएझ यांनी परिपूर्ण दिशा दाखविली. दोन वर्षांपूर्वी नीरजच्या भालाफेक करणाऱ्या उजव्या हातावर महत्त्वपूर्ण, तेवढीच निर्णायक शस्त्रक्रिया झाली, त्यातून सावरत त्याने यशस्वी पुनरागमन केले. कोविड-१९मुळे सुरू झालेले लॉकडाउनही स्वतःच्या वाटचालीत आडवे येऊ दिले नाही. पाच वर्षांपूर्वी नीरजने जागतिक २० वर्षांखालील स्पर्धेत ८६.४८ मीटरवर भालाफेक करत ज्युनियर विश्वविक्रम केला, पण रिओ ऑलिंपिकची पात्रता मुदत संपल्यामुळे तेव्हा त्याला ऑलिंपिक हुकले होते. यंदा या दृढनिश्चयी भारतीय युवकाने सुवर्णपदकासह ऑलिंपिक संधी साधली. आता ९० मीटर पार करण्याचे त्याचे ध्येय आहे.

संबंधित बातम्या