फुटबॉलपटू संदेशला युरोपचे तिकीट

किशोर पेटकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

क्रीडांगण

युरोपातील फुटबॉल वलयांकितच. तेथे खेळण्यासाठी  सारेच फुटबॉलपटू आसुसलेले असतात. भारतीय फुटबॉलपटूही त्याला अपवाद नाहीत. युरोपात व्यावसायिक फुटबॉल खेळण्यासाठी कितीतरी भारतीयांनी प्रयत्न केले, काहींनी त्यात थोडीफार सफलताही मिळविली. आता २८ वर्षीय भारतीय बचावपटू संदेश झिंगन याला मोठा ब्रेक मिळाला आहे. 

चंडीगडचा संदेश झिंगन आता क्रोएशियात व्यावसायिक फुटबॉल खेळणार आहे. तेथील अव्वल लीगमध्ये खेळणाऱ्या एचएनके सिबेनिक संघाने त्याला करारबद्ध केले आहे. क्रोएशियन फुटबॉलचे जागतिक नकाशावरील स्थान लक्षात घेता, संदेशसाठी ही फार मोठी संधी आहे.

गतमोसमात सिबेनिक संघ क्रोएशियातील अव्वल साखळीत सहाव्या स्थानी होता. तेथील लीग स्पर्धा खूपच चुरशीची असते, साहजिकच संदेशला दर्जेदार कामगिरी करावी लागेल. भारतीय फुटबॉलमध्ये दशकभरातील कारकिर्दीत त्याने सर्वोत्तम खेळाचा ठसा उमटविला आहे. क्रोएशियात भारतीय फुटबॉलचा दर्जा सिद्ध करण्यासाठी संदेशला मेहनत घ्यावी लागेल. भारतीय फुटबॉल संघ प्रशिक्षक इगोर स्टिमॅक हे क्रोएशियन असून १९९८ मधील विश्वकरंडक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविलेल्या संघाचे सदस्य होते. ते भारताचे प्रशिक्षक असताना संदेश क्रोएशियात व्यावसायिक फुटबॉल खेळतोय हासुद्धा आगळा योगायोग आहे.

भारतातील अनुभवी बचावपटू

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचा संदेश झिंगन याच्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला या प्रतिभाशाली खेळाडूला कोलकात्यातील काही संघांनी नाकारले होते. पण २०११ साली युनायटेड सिक्कीम या नवोदित संघाने त्याला संधी दिली आणि नंतर या परिश्रमी खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. या बचावपटूने अफलातून खेळ करत आयएसएल स्पर्धेत भक्कम खेळाचे प्रदर्शन केले. २०१४ साली आयएसएलच्या पहिल्याच वर्षी तो स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. तेव्हा संदेश २१ वर्षांचा होता. आता वयाच्या २८व्या वर्षी तो देशातील सर्वांत अनुभवी आणि भरवशाचा बचावपटू आहे. केरळा ब्लास्टर्सचे सलग सहा मोसम प्रतिनिधित्व केल्यानंतर २०२० साली संदेशने कोलकात्याच्या एटीके मोहन बागानशी पाच वर्षांचा करार केला. गतवर्षी त्याला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. क्रोएशियातील क्लबने करारबद्ध केल्यामुळे संदेश आगामी मोसमात आयएसएल स्पर्धेत दिसणार नाही.

दुखापतीवर मात

क्रोएशियन फुटबॉल लीगमध्ये एचएनके सिबेनिक संघातर्फे ५५ क्रमांकाच्या जर्सीत संदेश मैदानात उतरेल. २०१९-२० मोसम संदेशसाठी घातक ठरला. गंभीर दुखापतीमुळे तो त्या मोसमात उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेत अडकला. कारकीर्द रोखली जाण्याचा धोका होता, मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर संदेशने पुनरागमन केले. २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धेत तो एटीके मोहन बागानच्या बचावफळी महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. राष्ट्रीय संघातही त्याने यशस्वी पुनरागमन केले. साहजिकच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गतमोसमातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉल या पुरस्कारासाठी संदेशच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. २०१५ ते २०२१ या कालावधीत भारताचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करताना त्याने काही सामन्यांत कर्णधारपदाचीही जबाबदारी पेलली.

संबंधित बातम्या