गुडबाय मिस्टर ३६०

किशोर पेटकर
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

क्रीडांगण

क्रिकेट मैदानावरील अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स कोण अशी विचारणा केल्यास बहुतेक चेहरे प्रश्नांकित होतील, पण ‘एबी’ डिव्हिलियर्सला ओळखता का असे विचारले, तर क्रिकेटप्रेमी, विशेषतः रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे (आरसीबी) चाहते प्रफुल्लित होतील. त्यांच्यासाठी तो लाडका ‘एबीडी’ आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी कर्णधार आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींत लोकप्रिय झाला. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होताना या प्रतिभाशाली क्रिकेटपटूने, आपण अर्धा भारतीय झालो असून ते अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली. 

तुफानी फटकेबाजी करताना एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीवर खेळपट्टीचे स्वरूप, गोलंदाजाचा दर्जा याचा काहीएक परिणाम होत नसे. त्याने मैदानावर नयनरम्य चौफेर टोलेबाजी करताना सर्व कोनातून फटके मारले. साहजिकच ‘मिस्टर ३६०’ ही सार्थ उपाधी त्याला मिळाली. त्याने एका पायावर बसून लेगसाईडला मारलेला स्कूप डोळ्यांचे पारडे फेडत असे. तीन वर्षांपूर्वी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली, त्यानंतर तो जगभरातील टी-२० लीग स्पर्धेत खेळू लागला. आता सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून बॅट म्यान करण्याचे ठरविल्यामुळे हा महान क्रिकेटपटू मैदानावर सर्व कोनातून चौकार-षटकारांची बरसात करताना दिसणार नाही.

आरसीबी संघाचा आधारस्तंभ

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला यावर्षीही आयपीएल विजेतेपदाने हुलकावणी दिली. विराटने या संघाचे कर्णधारपद सोडले आहे. संघाचा खंदा आधारस्तंभ असलेल्या डिव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे आता आरसीबीच्या फलंदाजीत न भरून येण्याजोगी पोकळी निर्माण होईल हे निश्चित. आयपीएलमध्ये या आक्रमक शैलीच्या फलंदाजाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. दशकभरापूर्वी, एप्रिल २०११मध्ये त्याने आरसीबी संघाची जर्सी अंगावर चढविली. त्यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे आयपीएल स्पर्धेत तीन वर्षे खेळला होता. आरसीबी संघाकडून खेळताना डिव्हिलियर्स जास्त वलयांकित झाला. या संघाचा तो अविभाज्य भाग ठरला. त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण ५१६२ धावा केल्या, त्यापैकी ४४९१ धावा आरसीबीकडून खेळताना नोंदविल्या. यावरून बंगळूरच्या संघासाठी त्याचे फलंदाजीतील योगदान लक्षात येते. २०१७ मधील स्पर्धा वगळता, एबीडीने आरसीबी चाहत्यांना निराश केले नाही. 

अष्टपैलू क्रिकेटपटू

एबी डिव्हिलियर्स डिसेंबर २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रकाशझोतात आला. इंग्लंडविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. सलामीचा फलंदाज या नात्याने सुरुवात केली. त्यानंतर संघाच्या गरजेनुसार आठव्या क्रमांकापर्यंत कुठेही खेळला, मात्र मध्यफळीत तो जास्त खुलून फलंदाजी करताना दिसला. मध्यमगती गोलंदाजी करून बळीही मिळवले, यष्टिरक्षणात छाप पाडली, देशाच्या संघाचे नेतृत्वही केले. या बिनधास्त फलंदाजाने २००४ ते २०१८ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटीत ८७६५, वन-डेमध्ये ९५७७, तर टी-२०मध्ये १६७२ धावा केल्या. आता वयाच्या ३७व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून थांबायला हवे याची जाणीव झाल्याने या अष्टपैलू क्रिकेटपटूने, ‘ती ज्योत आता तेवढी तेजस्वीपणे जळत नाही,’ असे सांगत क्रिकेट मैदानाला गुडबाय केला आहे.

संबंधित बातम्या