दहापैकी दहा!

किशोर पेटकर
सोमवार, 20 डिसेंबर 2021

क्रीडांगण

न्यूझीलंडचा ‘मुंबईकर’ फिरकी गोलंदाज एजाझ पटेल काही वर्षांपूर्वी वेगवान गोलंदाज होता. त्याचा वेग आणि स्विंगही चांगला होता. त्याने वेगाची कास धरत गोलंदाजी सुरू ठेवली असती, तर क्रिकेटमधील दुर्मीळ पराक्रम त्याला साध्य झाला असता का...? 

एकोणीस वर्षांखालील वयोगटात खेळत असताना एजाझ पटेलला फिरकी गोलंदाजीकडे वळण्याचा सल्ला मिळाला. त्यानेही तो गांभीर्याने घेतला. डावखुऱ्या फिरकीवर लक्ष केंद्रित केले आणि कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्व दहाही गडी बाद करणारा अवघा तिसराच गोलंदाज हा मान मुंबईत जन्मलेल्या या ३३ वर्षीय गोलंदाजाने मिळविला. त्याच्यापूर्वी दोघा फिरकी गोलंदाजांची अशी संस्मरणीय कामगिरी केली होती. मँचेस्टर येथे जुलै १९५६मध्ये इंग्लंडच्या जिम लेकरने ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्व १० गडी ५३ धावांच्या मोबदल्यात टिपले होते. त्यानंतर फेब्रुवारी १९९९मध्ये भारताच्या अनिल कुंबळेने दिल्ली येथे पाकिस्तानचा पूर्ण डाव गारद करताना ७४ धावाच दिल्या होत्या. आता न्यूझीलंडतर्फे एजाझ पटेलने यावर्षी डिसेंबरमध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताच्या पहिल्या डावातील सर्व १० गडी ११९ धावांत बाद केले. 

अवघ्या तीन वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एजाझचा पराक्रम कौतुकास्पद आहे. वयाचा आठव्या वर्षी पालकांसमवेत तो मुंबईतून किवींच्या भूमीत स्थलांतरित झाला, तेथील नागरिक झाला.

...आणि फिरकीकडे वळला
किवींच्या देशात सध्या फिरकी गोलंदाजीत भारतीय वंशाचे क्रिकेटपटू जास्त दिसतात. न्यूझीलंडमधील हवामान, खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीस पोषक नसल्याचे मानले जाते. त्यामुळे भारतीय वंशाच्या खेळाडूंत फिरकीची उपजत गुणवत्ता शोधण्यास प्राधान्य मिळते. फिरकीपटू दीपक पटेल याने भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंचा झेंडा किवींच्या भूमीत सफलतेने उंचावला. न्यूझीलंडमधील स्थायिक भारतीय त्याच्यात पाऊलखुणांवरून जाताना दिसत आहेत. दीपक पटेल न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना, त्यानेच एजाझला वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीकडे वळण्याचा सल्ला दिला. एजाझची उंची वेगवान गोलंदाजीस तेवढी पोषक नव्हती. पाच फूट सहा इंच उंचीच्या या गोलंदाजाने डावखुऱ्या फिरकीवर मेहनत घेण्यास सुरुवात केली. ऑकलंड संघात वाव नसल्याचे पाहून तो सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघात दाखल झाला. २०१२पासून त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटचा आलेख उंचावू लागला. क्लब पातळीवर मेहनत घेत एजाझने न्यूझीलंडच्या मुख्य राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारली.

उशिरा पदार्पण, पण लक्षवेधी
दिग्गज फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरीच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड संघ फिरकी गोलंदाजाच्या शोधात नव्या चेहऱ्यांची चाचपणी करत असताना एजाझ प्रकाशझोतात आला. तिशीच्या उंबरठ्यावर असताना त्याने कसोटी क्रिकेट मैदानावर पाय ठेवला. नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध अबुधाबी येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उशिरा संधी मिळाली, पण तो अल्पावधीत लक्षवेधी ठरला. न्यूझीलंडच्या कसोटी संघातील मुख्य फिरकी गोलंदाज होण्याइतपत त्याने प्रगती साधली. त्याने डावात सर्व १० गडी बाद करून न्यूझीलंडच्या क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला आहे.

संबंधित बातम्या