इटली फुटबॉलवर नामुष्की

किशोर पेटकर
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेस पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर इटली फुटबॉल महासंघाने प्रशिक्षक जियान पिएरो व्हेंतुरा यांना डच्चू दिला. ते अपेक्षितच होते. व्हेंतुरा यांची कारकीर्द अल्पजीवीच ठरली.

जागतिक फुटबॉलमधील इटली हा दादा संघ, चार वेळचा जगज्जेता या नात्याने त्यांच्याकडे आदरानेही पाहिले जाते, पण गतवैभव लोप पावले आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, युरोपमध्येच हा संघ जर्जर झालेला आहे. हल्लीच त्यांच्यावर मोठी नामुष्की आली. पुढील वर्षी रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरू शकला नाही. फ्ले-ऑफ फेरीत त्यांना पहिल्या लढतीत स्वीडनने एका गोलने हरविले, नंतर दुसऱ्या लढतीत गोलशून्य बरोबरीत रोखले. दोन सामन्यानंतर स्वीडनचे पारडे १-० असे सरस झाले आणि इटलीच्या संघाला रशियाचे तिकीट मिळाले नाही. त्यानंतर सारा इटली शोकसागरात बुडाला. इटलीची युरोपियन फुटबॉलमधील ताकद, तसेच तेथील फुटबॉलप्रेम आणि क्‍लब पातळीवरील संघाचा रुबाब पाहता, इटालियन फुटबॉलला मोठा धक्काच बसला आहे. इटलीविना विश्‍वकरंडक स्पर्धा हे सत्य पचविणे या संघाच्या चाहत्यांना कठीणच ठरले आहे. हल्लीच्या काळात जागतिक पातळीवर इटलीला महासत्ता मानले जात नव्हते. २०१० व २०१४ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांचे आव्हान साखळी फेरीत आटोपले होते. युरो करंडक स्पर्धेतही त्यांना वर्षभरापूर्वी उपांत्य फेरी गाठता आली नव्हती, तरीही आठ वेळा विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा संघ म्हणून त्यांना नेहमीच सन्मान मिळाला. अकरा वर्षांपूर्वी त्यांनी शेवटच्या वेळेस जगज्जेतेपद मिळविले होते. १९३० मध्ये इटलीने विश्‍वकरंडक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. १९५८ मध्ये त्यांना पात्रता मिळाली नव्हती. हे अपवाद वगळता इटलीचा संघ प्रत्येक विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला आहे. साठ वर्षानंतर त्यांच्यावर युरोप पात्रता फेरीत गारद होण्याची पाळी आली आहे. कमजोर कामगिरीमुळे इटलीतील फुटबॉलला अब्जावधींचे आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे.

प्रशिक्षकांना डच्चू
रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेस पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर इटली फुटबॉल महासंघाने प्रशिक्षक जियान पिएरो व्हेंतुरा यांना डच्चू दिला. ते अपेक्षितच होते. व्हेंतुरा यांची कारकीर्द अल्पजीवीच ठरली. जुलै २०१६ मध्ये त्यांनी सूत्रे स्वीकारली होती. त्यापूर्वी अंतिनिओ काँते संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. इंग्लिश प्रिमिअर लीगमधील चेल्सी संघाचे प्रशिक्षकपद चालून आल्यानंतर त्यांनी इटलीच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले. गतवर्षी युरो स्पर्धेत काँते यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. व्हेंतुरा यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीला आंतरराष्ट्रीय पातळीवर सूर गवसलाच नाही. पहिल्याच मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लढतीत फ्रान्सकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला होता. विश्‍वकरंडक पात्रता फेरीत युरोप गटात इटलीचा समावेश ‘जी’ गटात होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पेनकडून तीन गोलांनी हार पत्करावी लागल्यामुळे इटलीस गटात दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे या संघाला ’प्ले-ऑफ’ फेरीत खेळावे लागले. 

अनुभवी खेळाडूंची निवृत्ती
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्याने इटलीच्या राष्ट्रीय संघातील अनुभवी आणि मातब्बर खेळाडूंनी भवितव्य ओळखले आहे. चार प्रमुख खेळाडूंना वगळण्याची पाळी येण्यापूर्वी निवृत्तीपत्र सादर केलेले आहे. जियानलुजी बफॉन हा त्यांचा सर्वाधिक अनुभवी गोलरक्षक. २०१० पासून तो संघाचा कर्णधार आहे, तसेच इटलीतर्फे सर्वाधिक १७५ सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इटलीस ब्राझीलमधील मागील विश्‍वकरंडकात साखळी फेरी पार करता आली नव्हती. आपली कारकीर्द संपली आहे हे बफॉनने वेळीच जाणले. यावेळच्या पराभवानंतर त्याला अश्रू आवरले नाहीत. ११७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला डॅनिअल डे रोसी यानेही बूट टांगणीस लावले आहेत. ९६ सामन्यांचा अनुभवी गाठीशी असलेला जॉर्जिओ चिएलिनी व आंद्रेया बार्झाग्ली यांनीही निवृत्ती घेत नवोदितांना संधी देण्याचे ठरविले आहेत. संघातील ज्येष्ठ खेळाडूंची निवृत्ती ही इटलीच्या नव्या संघाच्या बांधणीची नांदी मानली जाते.

विश्‍वकरंडक स्पर्धेत इटली
विजेते ः
१९३४, १९३८, १९८२, २००६
उपविजेते ः १९७०, १९९४
तिसरा क्रमांक ः १९९०
चौथा क्रमांक ः १९७८

संबंधित बातम्या