ग्रिगोर दिमित्रोवची प्रगती

किशोर पेटकर
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सची अंतिम फेरी गाठून बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने साऱ्यांनाच चकित केले. यापूर्वी त्याने एकाही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती, मात्र जागतिक पुरुष टेनिस स्पर्धेची त्याची उपस्थितीची दखल निश्‍चितपणे घेतली जात होती. सहा फूट तीन इंच उंचीचा हा २६ वर्षीय खेळाडू. जबरदस्त फोरहॅंड व बॅकहॅंड फटके, वेगवान सर्व्हिस आदी त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. लंडनमधील स्पर्धेपूर्वी तो जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर होता.

लंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सची अंतिम फेरी गाठून बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने साऱ्यांनाच चकित केले. यापूर्वी त्याने एकाही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती, मात्र जागतिक पुरुष टेनिस स्पर्धेची त्याची उपस्थितीची दखल निश्‍चितपणे घेतली जात होती. सहा फूट तीन इंच उंचीचा हा २६ वर्षीय खेळाडू. जबरदस्त फोरहॅंड व बॅकहॅंड फटके, वेगवान सर्व्हिस आदी त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. लंडनमधील स्पर्धेपूर्वी तो जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर होता. या वर्षी तो प्रथमच एटीपी वर्ल्ड टूर्स फायनल्स स्पर्धेत पात्र ठरला, मात्र अंतिम लढतीपर्यंत मुसंडी मारेल ही अपेक्षा नव्हती. एटीपी फायनल्स स्पर्धेत खेळणारा तो पहिला बल्गेरियन पुरुष टेनिसपटू आहे. त्याची खेळण्याची शैली काही प्रमाणात रॉजर फेडररशी मिळतीजुळती आहे, त्यामुळे कौतुकाने त्याला ‘बेबी फेड’ असेही म्हटले जाते. बल्गेरियात हा खेळाडू चांगलाच मान्यताप्राप्त आहे. २०१३ मध्ये त्याने स्टॉकहोम ओपन स्पर्धा जिंकली. त्याचे सीनियर गटातील पहिले मोठे यश ठरले. एटीपी स्पर्धा जिंकणारा तो बल्गेरियाचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला. २००८ मध्ये ज्युनिअर पातळीवर त्याने विंबल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत किताब जिंकला होता. प्रतिस्पर्धी त्याला नेहमीच धोकादायक मानतात.  

लहानपणीच हाती रॅकेट
ग्रिगोरच्या हाती अगदी लहानपणीच टेनिसचे रॅकेट आले. वयाच्या तिसऱ्या वर्षी टेनिस रॅकेटशी त्याची मैत्री झाली. दोन वर्षानंतर तो दररोज टेनिसचा सराव करू लागला. त्याचे वडील सुरवातीचे प्रशिक्षक. त्याची आई व्हॉलिबॉलमध्ये पारंगत. मुलाची उपजत गुणवत्ता पाहून वडिलांनी ग्रिगोरला टेनिस अकादमीत भरती केले. ज्युनिअर पातळीवर त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरू लागली. वयाच्या चौदाव्या वर्षी ग्रिगोरने पहिली प्रमुख स्पर्धा जिंकली. २००६ मध्ये १४ वर्षांखालील गटात तो युरोपियन विजेता बनला. वयाच्या सतराव्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनल्यानंतर तो पॅरिसमधील पेट्रिक मोराटोग्लू यांच्या अकादमीत दाखल झाला. याच कालावधीत त्याची टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिच्याशी मैत्री झाली व त्यांची जवळीक पाच वर्षांपूर्वी खूपच गाजली होती. त्याच्या मैत्रिणीही खूप आहेत, माजी अव्वल टेनिसपटू मारिया शारापोवाही त्यापैकी एक होती.

प्रतीक्षा ग्रॅंडस्लॅम किताबाची
ग्रिगोर दिमित्रोवने ज्युनिअर पातळीवर दोन वेळा ग्रॅंडस्लॅम किताब मिळविला, सीनियर पातळीवर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत त्याची झेप उपांत्य फेरीपलिकडे गेलेली नाही. २०१४ मध्ये त्याने विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. तेव्हा त्याला नोव्हाक जोकोविचने हरविले होते. यावर्षी त्याची सुरवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपांत्य फेरीत खेळला. पराभूत होण्यापूर्वी राफेल नदालला त्याने पाच सेट्‌समध्ये झुंजविले होते. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी त्याने ब्रिस्बेन येथील स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात त्याने केई निशिकोरी याला हरवून २०१४ नंतर प्रथमच एटीपी किताब जिंकण्यात सफलता मिळविली. फ्रेंच ओपनमधील मातीच्या कोर्टवर त्याने या वर्षी तिसऱ्या फेरीपर्यंत प्रगती साधली होती. सिनसिनाटी येथे विजेतेपद मिळवून त्याने प्रथमच एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० दर्जाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. अंतिम सामन्यात त्याने निक किर्गिओसला नमविले. विशेष म्हणजे एकही सेट न गमावता तो या स्पर्धेत अजिंक्‍य ठरला. सहा नोव्हेंबरला त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदविताना जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. वर्षभरापूर्वी तो जागतिक क्रमवारीत सतराव्या स्थानी होता. एटीपी फायनल्सची अंतिम फेरी गाठल्यामुळे दिमित्रोव आता क्रमवारीत आणखी प्रगती साधणार आहे. लंडनला त्याने उपांत्य लढतीत जॅक सॉक याला हरविले. त्यामुळे २०१७ वर्षअखेरीस तो नदाल व फेडरर यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी येईल हे पक्के झाले. 

ग्रिगोर दिमित्रोवविषयी...

  • जन्मतारीख ः १६ मे १९९१
  • खेळण्याची शैली ः उजव्या हाताने 
  • ग्रॅंडस्लॅममध्ये सर्वोत्तम कामगिरी ः उपांत्य फेरी
  • २००५ मध्ये सर्वोत्तम बल्गेरियन युवा टेनिसपटू
  • २०१४ मध्ये बल्गेरियातील सर्वोत्तम क्रीडापटू

संबंधित बातम्या