नदालला हवेय सुरक्षित टेनिस

किशोर पेटकर
शुक्रवार, 19 जून 2020

क्रीडांगण
 

महान टेनिसपटू राफेल नदाल याने नुकताच ३४ वा वाढदिवस साजरा केला. या डावखुऱ्या दिग्गज खेळाडूस सध्या विक्रम खुणावत असून कोरोना विषाणू महामारीमुळे त्याला प्रतीक्षेत रहावे लागले आहे. स्वित्झर्लंडचा लिजंड खेळाडू रॉजर फेडरर याने एकूण २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत, तर नदालने १९. फेडररला गाठण्यासाठी स्पॅनिश खेळाडूस फक्त एक ग्रँडस्लॅम करंडक जिंकणे आवश्यक आहे. मातीच्या कोर्टवरील नदालचा दबदबा पाहता, तो यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतच फेडररला गाठेल ही अपेक्षा होती, पण कोविड-१९ मुळे रोलाँ गॅरोवरील स्पर्धाच लांबणीवर टाकावी लागली. त्यापूर्वी, विंबल्डनच्या आयोजकांनी ब्रिटनमधील स्पर्धा कोरोना विषाणूमुळे रद्द केली होती. आता वर्षातील दोनच ग्रँडस्लॅम स्पर्धा बाकी आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धा ३१ ऑगस्टपासून, मे महिन्यात होणारी फ्रेंच ओपन स्पर्धा २० सप्टेंबरपासून नियोजित आहे. पण त्यांचे भवितव्य कोविड-१९ संसर्गावर अवलंबून आहे. युरोप, अमेरिकेसह जगभरात कोरोना विषाणूने हाहाःकार माजविला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठरल्यानुसार अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन खेळली जाईल का याबाबत साशंकता आहे. जरी सामने बंद दरवाजाआड घेतले, तरी प्रश्न खूपच आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासही सुरळीत व्हायला हवा. अमेरिकेतील स्थिती पूर्वपदावर आलेली नाही, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून न्यूयॉर्कमध्ये ठरल्यानुसार ऑगस्टअखेरीस स्पर्धा होण्याबाबत स्पष्टता नाही. नावाजलेल्या टेनिसपटूंनीही सुरक्षित टेनिसची गरज व्यक्त केली आहे. साऱ्याच खेळाडूंची `थांबा आणि पाहा', हीच भूमिका आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण कदापि न्यूयॉर्कला जाण्यासाठी प्रवास करणार नाही अशी स्पष्ट भूमिका नदालने घेतली आहे.

नदालचा आग्रही मुद्दा
ऑगस्टअखेरीस अमेरिकन ओपन स्पर्धा असल्यामुळे, त्याअगोदर काही काळ खेळाडूंना सरावास सुरुवात करावी लागेल. कदाचित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय टेनिस सुरू होऊ शकेल. मार्च महिन्यापासून स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय टेनिस बंद आहे, त्यामुळे सुमारे पाच महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीचा परिणाम खेळाडूच्या शारीरिक तंदुरुस्तीवर होऊन मोठा ब्रेक खेळाडूंना सतावू शकतो. कोराना विषाणूचा पृथ्वीवरील विळखा पाहून नदालने मागे यंदाचा मोसम सुरू होण्याबाबत संशय व्यक्त केला होता. अजूनही त्याचे मत बदललेले नाही, फक्त आता त्याने सुरक्षित टेनिसचा आग्रह धरला आहे. टेनिस हा शरीरसंपर्क खेळ नाही, त्यामुळे बंद दरवाजाआड सामने खेळण्यास हरकत नसल्याची वकिली होते, पण नदालने नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलेय आणि ते पटण्यासारखे आहे. त्याच्या मते, ग्रँडस्लॅम स्पर्धेनिमित्त प्रेक्षक वगळता सुमारे ६००-७०० जणांचा सहभाग असतो, यामध्ये एकेरी-दुहेरीतील पुरुष-महिला खेळाडू, प्रशिक्षक, स्पर्धा कर्मचारी यांचा समावेश असतो. परिस्थिती पूर्णतः सुरक्षित नसेल, तर पंचांनी सामना सुरू करणे अजिबात योग्य ठरणार नाही, असे या डावखुऱ्या खेळाडूस वाटते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, काही मोजक्याच खेळाडूंसह स्पर्धा घेणे नदालला पटत नाही. ग्रँडस्लॅम स्पर्धेत जगातील प्रत्येक भागातील खेळाडू सहभागी व्हायला हवा, तसे शक्य नसेल, तर टेनिस खेळण्यात काही अर्थ नाही असे नदालचे म्हणणे आहे. काही जण नदालच्या या मताशी सहमत नसतील, तर काही जण नक्कीच पाठिंबा दर्शवतील. स्पर्धेत खेळून विषाणूस आमंत्रण देण्याऐवजी त्यावर औषध येऊ द्या, प्रवास सुखकर होऊ द्या आणि मनात अजिबात धास्ती नसावी, तरच टेनिसचा आनंद लुटता येईल हे नदालचे मत सर्वसामान्य आहे. कोणालाही कोरोना बाधित व्हायचे नाहीये.

तिरंगी लढत
कोरोना विषाणू महामारीच्या सावटामुळे अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा ठरल्यानुसार होण्याबाबत पूर्ण खात्री नाही, तरीही आशावाद कायम आहे. पुरुष टेनिसपटूंत सध्या तिरंगी चुरस आहे. एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणि नवा विक्रमवीर होण्यासाठी चढाओढ आहे. ३८ वर्षीय फेडररने सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून पराक्रम केला आहे. त्यानंतर नदालने १९ करंडक जिंकले आहेत, त्यांपैकी १२ वेळा तो फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर अजिंक्य ठरला आहे, तर ३३ वर्षीय सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने १७ करंडक पटकावून आव्हान कायम राखले आहे. फेडररला गाठण्याची किंवा मागे टाकण्याची नदालला चांगली संधी आहे, पण ती यावर्षी, की पुढील वर्षी साधतोय याची उत्सुकता आहे. त्यादरम्यान, वयाला झुकवत फेडररने आणखी एक करंडक जिंकल्यास रंगत आणखीनच वाढेल.

संबंधित बातम्या