उपविजेतेपदाचेच समाधान

किशोर पेटकर
सोमवार, 16 मार्च 2020

क्रीडांगण
 

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांना पॉवर हाऊस मानले जाते. त्या देशातील महिला क्रिकेटमध्ये व्यावसायिकता ठासून भरलेली आहे आणि त्याचे प्रदर्शन मैदानावर घडते. तुलनेत भारतीय महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. २०१७ मध्ये एकदिवसीय सामन्याच्या विश्वकरंडकात भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली, पण ऐतिहासिक लॉर्डसवर यजमान इंग्लंडकडून नऊ धावांनी हार पत्करावी लागल्यामुळे भारतीय महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तीन वर्षांनंतर भारतीय महिला संघ आणखी एका विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळताना दिसला. यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी प्रभाव पाडला. भव्यदिव्य मेलबर्न क्रिकेट मैदानावर जागतिक महिलादिनी ८६,१७४ क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या अंतिम लढतीत यजमान ऑस्ट्रेलिया संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघास सर्वच क्षेत्रात भारी ठरला. एकतर्फी लढतीत मेघ लॅनिंग हिच्या नेतृत्वाखालील संघ ८५ धावांनी लीलया जिंकला. याच भारतीय महिला संघाने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियास हरविले होते, तसेच न्यूझीलंडवरही 'अ' गट लढतीत मात केली होती, पण अंतिम लढतीचा दबाव भारतीय महिलांना पेलवला नाही. ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा अंतिम फेरी गाठत पाचव्यांदा टी-२० जगज्जेतेपद पटकाविण्याची किमया साधली. हरमनप्रीतच्या संघाने यजमान संघाला नमविले असते, तर ती घटना भारतीय महिला क्रिकेटमधील न भूतो न भविष्यती ठरली असती. कदाचित आठ दिवस मिळालेला ब्रेक भारतीय संघाला नडला असावा. इंग्लंडविरुद्धची उपांत्य लढत पावसामुळे रद्द झाली आणि साखळी फेरीत चार सामने जिंकलेल्या भारताला न खेळताच अंतिम फेरीचे द्वार खुले झाले. ऑस्ट्रेलियाने अंतिम लढतीत आक्रमक फलंदाजीच्या बळावर ४ बाद १८४ धावा केल्या, तर एकाग्रता गमावलेल्या भारतीय महिला संघाचा डाव ९९ धावांतच आटोपला, धावांचे शतकही पार करता आले नाही.

सतरा वर्षांपूर्वीच्या स्मृती ताज्या
 कांगारूंच्या संघाला साखळी फेरीतील पराभवाचाही बदला घ्यायचा होता, त्याच दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय संघावर सुरुवातीपासूनच हल्ला चढविला आणि त्यात त्यांना यश आले. फलंदाजी-गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडू ढेपाळले. अलिसा हिली व बेथ मूनी या सलामीच्या खेळाडूंना डावाच्या प्रारंभीच जीवदान मिळाले, त्याचा त्यांनी यथेच्छ लाभ उठविला. अलिसाने भारतीय गोलंदाजी निष्प्रभ करताना ३९ चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावांची स्फोटक खेळी केली. तिने सहकारी बेथ मूनी हिच्या साथीत ११५ धावांची सलामी देत भारताच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. बेथ हिने ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामी खेळाडू सुरुवातीपासूनच गोलंदाजीवर तुटून पडल्या, त्यामुळे भारतीय गोलंदाजी भरकटली, साऱ्याच जणी दिशा आणि टप्पा गमावून बसल्या. ऑस्ट्रेलियन महिलांच्या कामगिरीने पुरुषांच्या २००३ मधील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या स्मृती जागृत झाल्या. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियमवर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा धुव्वा उडविला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने दे-दणादण फलंदाजीमुळे २ बाद ३५९ धावा केल्या होत्या व नंतर भारताला २३४ धावांत गुंडाळून १२५ धावांनी मोठा विजय मिळविला होता. 

चित्र आशावादी...
  यावेळच्या टी-२० विश्वकरंडकात भारतीय महिला संघ १६ वर्षीय शफाली वर्मा हिच्या बिनधास्त फलंदाजीवर खूपच अवलंबून राहिल्याचे दिसून आले. स्मृती मानधना, हरमनप्रीत या प्रमुख खेळाडूंना फलंदाजीत सूर गवसला नाही. जेमिमा रॉड्रिग्जलाही विशेष पराक्रम बजावता आला नाही. एकंदरीत भारतीय महिला संघ फायनल हरला, तरीही भविष्यातील चित्र आशावादी दिसते. नव्या दमाच्या मुली प्रगती साधताना दिसतात. यावेळचा पराभव त्यांच्यासाठी बोधक असेल आणि कटू अनुभवाने मानसिकदृष्ट्या खंबीर झालेल्या भारतीय महिला भविष्यात विश्वकरंडक जिंकण्याची उणीव भरून काढू शकतात.

महिला टी-२० विश्वकरंडक अंतिम लढती
 २१ जून २००९ (लॉर्डस) : इंग्लंड वि. वि. न्यूझीलंड, ६ विकेट्स
 १६ मे २०१० (ब्रिजटाऊन) : ऑस्ट्रेलिया वि. वि. न्यूझीलंड, ३ धावा
 ७ ऑक्टोबर २०१२ (कोलंबो) : ऑस्ट्रेलिया वि. वि. इंग्लंड, ४ धावा
 ६ एप्रिल २०१४ (ढाका) : ऑस्ट्रेलिया वि. वि. इंग्लंड, ६ विकेट्स
 ३ एप्रिल २०१६ (कोलकाता) : वेस्ट इंडीज वि. वि. ऑस्ट्रेलिया, ८ विकेट्स
 २४ नोव्हेंबर २०१८ (अँटिगा) : ऑस्ट्रेलिया वि. वि. इंग्लंड, ८ विकेट्स
 ८ मार्च २०२० (मेलबर्न) : ऑस्ट्रेलिया वि. वि. भारत, ८५ धावा
 

संबंधित बातम्या