‘बूमबूम बेकर’ची दिवाळखोरी 

अमित डोंगरे 
सोमवार, 15 जुलै 2019

क्रीडारंग
 

जागतिक टेनिस क्षेत्रात एकेकाळी अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे जर्मनीचा महान टेनिसपटू बोरीस बेकर हे होय. तो खेळत होता, तेव्हाही त्याचे नाव इतके प्रसिद्ध नव्हते; मात्र आता टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या दिवाळखोरीमुळे त्याचे नाव पुन्हा एकदा घेतले जात आहे. त्याने आपल्या सगळ्या पारितोषिकांचा लिलाव करण्याचे जाहीर केले आणि अवघ्या टेनिसविश्‍वाला आश्‍चर्याचा धक्का बसला. 

‘सोळावं वरीस धोक्‍याचं’ म्हणतात. मात्र त्याने हेच ‘सोळावं वरीस’ यशाने सिद्ध करत मानाच्या विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. आपल्या सोनेरी वाटचालीचा शुभारंभ त्याने असा केला. या एका विजेतेपदाने बेकर जागतिक टेनिसचा नवा हिरो झाला. त्याच्यावर प्रायोजकांच्या उड्या पडायला लागल्या व बघता बघता त्याच्याकडे लक्ष्मीचा ओघ सुरू झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने ४९ विजेतीपदे मिळविली व आपला दबदबा प्रस्थापित केला. या विजेतेपदांबरोबरच त्याने अवघ्या सोळाव्या वर्षीच दोन कोटी युरोची प्रचंड अशी कमाई केली. त्या व्यतिरिक्त त्याने जाहिरातींच्या माध्यमातूनही कोट्यवधींची कमाई करत टेनिसविश्‍वातील सर्वांत श्रीमंत खेळाडू होण्याचा विक्रम केला. पण म्हणतात ना पैसा आला की अक्कल गहाण पडते, तसेच काहीसे झाले. त्याचे खेळत असताना असलेले उच्च राहणीमान त्याला झेपले नाही व त्याला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. पत्नीशी फारकत घेतल्यानंतर त्याला पोटगीदेखील प्रचंड रकमेची द्यावी लागली. शिवाय उच्च राहणीमानाचा खर्च परवडेनासा झाला. त्यातच त्याच्या डोक्‍यावर वेगवेगळ्या बॅंकांचे कर्ज येऊन पडले व त्याचा रसातळाला जाण्याचा प्रवास सुरू झाला. हे सगळे कसे सावरायचे या विचाराने त्याला पोखरून काढले व अखेर आपण मिळविलेल्या पदकांचा, पारितोषिकांचा, बक्षिसांचा, करंडकांचा व तितक्‍याच महत्त्वाच्या गोष्टींचा लिलाव करण्याचे त्याला जाहीर करावे लागले. तो निवृत्त झाला असला तरी त्याचे चाहते काही कमी नाहीत; त्यामुळे अनेकांनी लिलावाच्या आधीच त्याला त्याच्या वस्तूंबाबत विचारणादेखील सुरू केली आहे. त्याला ब्रॅंडेड गोष्टी वापरण्याची सवय होती. त्याच्याकडे जगातील सर्वांत महागडी मनगटी घड्याळे आहेत. तसेच त्याने जिंकलेली पदके, पारितोषिके आहेत व या सगळ्या गोष्टी वाट्टेल त्या किमतीत विकत घेणारे चाहतेदेखील आहेत. लवकरच त्याच्या या वस्तूंचा लिलाव होणार असून त्यातून येणाऱ्या रकमेतून त्याला त्याच्या डोक्‍यावरचे कर्ज फेडता येणार आहे. तसेच उरलेल्या रकमेतून पुढील दिवस ढकलता येणार आहेत. 

नोव्हाक जोकोविच या प्रसिद्ध खेळाडूचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काही काळ काम केले. त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली, की त्याची महानता लगेच लक्षात येते. मात्र क्रीडा क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र, त्यात यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना निवृत्तीनंतर आपले जीवनमान तसेच उच्च ठेवण्यात फारसे यश मिळत नाही. त्यातच व्यसनांचा विळखादेखील अशा खेळाडूंना रसातळाला घेऊन जातो. त्यातूनच बेकरवर जशी वेळ आली तशीच वेळ येते व आधी सकारात्मक प्रसिद्ध असलेले हे खेळाडू बदनामीच्या चक्रव्यूहात सापडतात. 

साधारण २५,०८०,९५६ अमेरिकन डॉलर इतकी प्रचंड कमाई त्याने केली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस परतविण्यासाठी त्याची ती वाकून खेळण्याची शैली आजही त्याचे चाहते विसरलेले नाहीत. डोळ्यांच्या पापणीचे केसदेखील सोनेरी रंगाचे असलेला हा खेळाडू खरोखरच राजबिंडा दिसायचा. त्याने जरी आपली वाटचाल जर्मनीसाठी केली असली, तरी तो आता इंग्लंडचा नागरिक झाला आहे. केवळ बेकरच नव्हे, तर जागतिक क्रीडाक्षेत्रात असे अनेक खेळाडू आहेत, की त्यांच्यावर आता दिवाळखोरीची वेळ आली आहे. प्रसिद्धीच्या शिखरावरून रसातळाला जाण्याची नामुष्की या खेळाडूंवर ओढवली आहे. दिएगो मॅराडोना, माईक टायसन, डेव्हिड जेम्स, अरीक जेम्बा, जॉन रेस, मार्क बर्नेल, ली हॅंडली या व अशा आणखी काही खेळाडूंवर बेकरसारखी दिवाळखोरी जाहीर करण्याची नामुष्की आली आहे. मॅरडोनासारखे खेळाडू व्यसनांच्या आहारी जाऊन आज कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींना घटस्फोटानंतर आपल्या पत्नीला भरघोस पोटगी द्यावी लागल्याने गरिबीचा चटका बसलेला आहे. 

एक काळ होता, की केवळ बेकरला एकदा पाहण्यासाठी जागतिक स्तरावरची टेनिस कोर्ट, चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे भरत होती आणि आज याच टेनिस कोर्टवर येताना बेकरवर स्वतःचा चेहरा लपवावा लागत आहे. 

बेकरचा जन्म जर्मनीच्या लेमन या गावात झाला. त्याची आई कॅथलिक आहे, तर वडील कार्ल हेन्ज हे आर्किटेक्‍ट आहेत. त्यांनीच त्यांच्या गावात टेनिस कोर्ट बांधले व तिथेच बेकरने आपल्या टेनिसचा श्रीगणेशा केला. २२ नोव्हेंबर १९६७ मध्ये जन्मलेल्या बेकरने पहिल्याच विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद मिळवीत जागतिक टेनिस क्रमवारीत पहिले स्थान पटकावण्याचा विक्रम केला. त्याने कारकिर्दीत इतकी विजेतीपदे मिळविली आहेत, की त्याच्या जवळपासदेखील कोणी खेळाडू आजही नाही. विंबल्डन तीन वेळा, ऑस्ट्रेलियन ओपन दोन वेळा, अमेरिकन ओपन एकदा जिंकले आहे. मात्र फ्रेंच ओपनमध्ये तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही एकदाही त्याला ते विजेतेपद मिळविता आलेले नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत ७१३ एकेरीचे सामने जिंकले असून २१४ सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला आहे. डेव्हिस कप, हॉपमन करंडक तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरची विजेतीपदे त्याने मिळविली आहेत. त्याचबरोबर त्याने बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये दुहेरीचे पदकदेखील पटकावण्याचा विक्रम केला आहे. बेकरने वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारदेखील अनेकदा मिळविलेला आहे. 

ग्रास कोर्टवरचा बादशहा असलेल्या बेकरला मातीच्या कोर्टचे - फ्रेंच ओपन स्पर्धेचे तसेच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळविता आलेले नाही. आज पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी आणि भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना जसे ‘बूमबूम’ या टोपणनावाने चाहते संबोधतात, त्याआधी बेकरला ‘बूमबूम बेकर’ असे संबोधले जायचे. त्याने १९९२ च्या बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. मात्र त्यानंतर त्याला क्‍ले कोर्टवर पुढे एकही विजेतेपद मिळविता आलेले नाही. बेकरने निवृत्तीनंतर बीबीसीसाठी टेनिस समालोचक म्हणूनही काम केले. त्याचबरोबर त्याने स्वतःची वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. मात्र त्याचवेळी त्याचा घटस्फोट झाला व तिथूनच त्याच्या अपयशाच्या फेऱ्यांची सुरुवात झाली. खेळत असताना ज्या उच्च राहणीमानाची त्याला सवय होती, ती तशीच ठेवण्यासाठी त्याची तारांबळ उडू लागली व खर्च झेपेनासा झाला. त्यातच बॅंकांकडून घेतलेल्या रकमेची परतफेडदेखील त्याला करता आली नाही. अखेर त्याने दिवाळखोरी जाहीर केली व जर्मनीला बाय करत इंग्लंडमध्ये आश्रय घेतला. 

कोणतीही व्यक्ती, मग ती खेळाडू असो वा आणखी कोणी सेलिब्रिटी; त्यातील बहुतांश जणांचे पाय जमिनीवर राहात नाहीत. त्यांचे जेव्हा सुगीचे दिवस असतात तेव्हा त्यांचे राहणीमान उच्च असते, मात्र निवृत्तीनंतर हेच राहणीमान त्यांचा शत्रू ठरते. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन अशा दिग्गजांना अत्यंत नम्रपणे राहताना आपण पाहतो; पण जे त्यांना जमते ते सगळ्यांनाच जमते असे नाही आणि मग बेकरसारखे अनेक खेळाडू अपयशाच्या आणि दिवाळखोरीच्या संकटात सापडतात. सगळी सोंगे घेता येतात, मात्र पैशांचे सोंग घेता येत नाही असे म्हणतात ते अगदी खरे आहे. बेकरने कायदेशीर कचाट्यात सापडू नये यासाठी स्वतःला दिवाळखोर जाहीर केले व लिलावाचा निर्णय जाहीर केला. मात्र त्याच्या डोक्‍यावर प्रचंड रकमेचे ओझे असून त्याच्या वस्तूंच्या लिलावातून जी रक्कम त्याला मिळेल त्यातून त्याची परिस्थिती निश्‍चितच सुधारेल. मात्र त्याला पूर्वीसारखे उच्च राहणीमानात राहता येणार नाही. 

बेकरने चौदा देशांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलॅंड्‌स, कतार, स्वीडन, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका या सगळ्या देशात त्याने आपल्या कामगिरीतून दबदबा प्रस्थापित केला. जेव्हा तो सातत्याने अपयशी ठरायला लागला तशी त्याची निराशा सामन्यादरम्यान दिसू लागली. जॉन मॅकेन्रोप्रमाणे बेकरदेखील संतापी झाला. त्यासाठी त्याच्यावर अनेकदा कारवाईदेखील झाली. या कारवाईदरम्यान त्याला लाखो रुपयांचा दंडदेखील बसला. त्यामुळेच त्याच्या खेळावर विपरीत परिणाम होऊ लागला व त्याने १९९९ मध्ये अखेर निवृत्ती घेतली. एका साध्या कुटुंबातून आलेल्या बेकरने एकेकाळी जागतिक टेनिसवर राज्य केले, मात्र स्वतःच्याच चुकांमुळे हेच राज्य खालसा होतानादेखील त्याला पाहावे लागले. या सगळ्याचा त्याच्यावर खूप परिणाम दिसायला लागला. एक सामान्य खेळाडू ते महान खेळाडूचा प्रवास ज्या जिद्दीने बेकरने यशस्वी केला, त्याच दृष्टिकोनातून त्याला निवृत्तीनंतर संयम राखता आला नाही. एकीकडे कमाई काही नाही आणि खर्च तर अफाट अशा विवंचनेत सापडल्यानंतर त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यातून बाहेर येण्यासाठी त्याला कोणताच मार्ग दिसत नव्हता म्हणून अखेर त्याने त्याच्या सुवर्णकाळात मिळविलेल्या पदकांचा, पारितोषिकांचा व विविध वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. टेनिस ‘हॉल ऑफ फेम’ बनलेल्या या शैलीदार, संयमी आणि महान खेळाडूला आता नामुष्कीचा सामना करावा लागतो आहे. एका जगन्मान्य खेळाडूसाठी यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय असणार!

संबंधित बातम्या