फ्रेंच ओपन स्पर्धेचा करंडक

मृणाल तुळपुळे
गुरुवार, 7 जून 2018

क्रीडांगण
 

पॅरिस या जादुई शहराला कला, क्रीडा, इतिहास अशा अनेक गोष्टींचा वारसा लाभला आहे. याच पॅरिसमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘रोलॉ गॅरॉ’ स्पर्धेला टेनिसचा प्रदीर्घ इतिहास आहे. स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेला प्रत्येक चषक व प्रत्येक पारितोषिक फ्रेंच टेनिस आणि रोलॉ गॅरॉ स्पर्धेचा इतिहास सांगतात. त्यामुळे टेनिस विश्‍वातील जुन्या आठवणींना उजाळा मिळून अनेक प्रसंगांची नव्याने उकल होत जाते.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे रोलॉ गॅरो संकुलातील प्रत्येक गोष्टीला स्वतःची अशी एक ओळख असून त्यामागे काही परंपरा व इतिहास आहे. टेनिसमध्ये वेळोवेळी भरघोस कामगिरी केलेल्या सर्व फ्रेंच खेळाडूंच्या स्मरणार्थ, स्पर्धेच्या चषकांना, रोलॉ गॅरॉ संकुलातील स्टेडियम्सना, वेगवेगळ्या कोर्टसना व रस्त्यांना त्यांची नावे देऊन त्यांच्या विजयाचा गौरव करण्यात आला आहे ही खचितच कौतुकाची बाब आहे. 

रोलॉ गॅरॉ स्पर्धेत पुरुष व महिलांची एकेरी, पुरुष व दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा एकूण पाच विजेत्यांसाठी पाच चषक ठेवलेले आहेत व त्यातल्या प्रत्येक चषकामागे एक वेगळी कहाणी आहे. अतिशय कलात्मक पद्धतीने बनवलेले हे सर्व चषक चांदीचे असून त्यावर प्रत्येक वर्षीच्या विजेत्यांचे नाव कोरले जाते. हे पाचही चषक फिरत्या स्वरूपाचे असून पारितोषिक वितरणाच्या वेळी ते विजेत्यांना व उपविजेत्यांना देण्यात येतात व नंतर त्यांना त्या चषकांची प्रतिकृती दिली जाते. ही प्रतिकृती मूळ चषकापेक्षा आकाराने थोडी लहान असते.

फ्रेंच ओपनसारखी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणे हे खेळाडूसाठी अतिशय भूषणावह व मानाचे असून हे चषक म्हणजे त्यांनी मिळवलेल्या विजयाची साक्ष ठरतात. हे सर्व चषक पॅरिसमधील एका प्रसिद्ध ज्वेलरीच्या/सराफी दुकानात बनवले गेले आहेत. प्रत्येक चषक हा कलेचा अप्रतिम नमुना असून त्यामागे कित्येक कसबी कारागिरांची कित्येक तासांची मेहनत आहे. पुरुष एकेरीच्या विजेत्यांसाठी बनवण्यात आलेला चांदीचा चषक चौदा किलो वजनाचा असून त्याच्या कडेवर द्राक्षाच्या पानांची नक्षी काढली आहे. दोन्ही बाजूंना हॅंडल असलेला हा चषक एका संगमरवरी चौकोनावर बसवला आहे. त्यावर प्रत्येक वर्षीच्या विजेत्यांचे नाव लिहिले जाते. जीन बोरोत्रा, जॅक ब्रुग्नॉन, हेन्री क्रोशे आणि रेने लाकोस्ट हे फ्रेंच टेनिसमधील चार दिग्गज खेळाडू फ्रेंच मस्केटियर्स म्हणून ओळखले जातात. त्या चौघांच्या स्मरणार्थ या चषकाला ‘दी मस्केटियर्स कप’ असे नाव दिले आहे. 

महिला एकेरीच्या विजेतीला १९७९ पासून ‘सुझन लेंग्ले कप’ प्रदान केला जातो. आपल्या टेनिस कारकिर्दीत सुझननी सहा वेळा विंबल्डन व सहा वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होत. याच्या जोडीने त्यांनी बारा दुहेरीची व दहा मिश्र दुहेरीची ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळवली होती. त्यांच्या या भरीव कामगिरीला सलाम म्हणून चषकाला व रोलॉ गॅरॉ संकुलातील एका स्टेडियमला सूझन यांचे नाव दिले आहे. चषकाला व स्टेडियमला नाव दिल्यामुळे सूझन लेंग्ले टेनिस जगतात अजरामर झाल्या आहेत. जॅक ब्रुग्नॉन हे चार मस्केटियर्सपैकी एक अतिशय शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या व दुहेरी खेळात विशेष प्रावीण्य असणाऱ्या जॅकनी आपल्या कारकिर्दीत पुरुष दुहेरीची दहा ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळवली, तर सुझन लेंग्ले यांच्या साथीत रोलॉ गॅरॉ स्पर्धेत मिश्र दुहेरीची दोन विजेतीपदे मिळवली. पुरुष दुहेरीच्या विजेत्यांसाठी १९८९ पासून जॅक ब्रुग्नॉन यांच्या स्मरणार्थ एक चषक दिला जातो व तो ‘जॅक ब्रुग्नॉन चषक’ म्हणून ओळखला जातो. 

सिमोन मॅथ्यू या एक लोकप्रिय महिला फ्रेंच टेनिसपटू असून त्यांनी १९३८ व ३९ अशी सलग दोन वर्षे फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्याच्या आधी सहावेळा त्यांनी या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. दुहेरी खेळातील सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमोननी महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशी एकूण तेरा ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळवली. महिला दुहेरीसाठी ठेवलेल्या चषकाला ‘सिमोन मॅथ्यू कप’ असे नाव देण्यात आले आहे. या चषकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला हंस पक्षाच्या आकाराची हॅंडल्स लावली आहेत.

मार्सेल बर्नार्ड यांच्या नावे ठेवलेला चषक मिश्र दुहेरीच्या विजेत्याला दिला जातो. मार्सेल हे मुख्य करून दुहेरी स्पर्धा खेळणारे खेळाडू. पण १९४६ मध्ये त्यांनी फ्रेंच ओपनच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. त्यांच्या नावावर दोन पुरुष दुहेरीची व दोन मिश्र दुहेरीची ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे आहेत. याशिवाय त्यांनी १९६८ ते १९९४ या काळात फ्रेंच टेनिस फेडरेशनचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. गेल्या वर्षी भारताच्या रोहन बोपण्णाने गॅबरिएला डॅब्रोवस्कीच्या साथीत फ्रेंच ओपनची मिश्र दुहेरीचा सामना जिंकून ‘मार्सेल बर्नार्ड चषक’ मिळवला होता.

या चषकाव्यतिरिक्त १९८१ पासून स्पर्धेतील खेळाडूसाठी ऑरेंज, लेमन आणि बड अशी तिने बक्षिसे दिली जातात. स्पर्धेच्या दरम्यान खिलाडू वृत्ती दाखवणाऱ्या खेळाडूची प्रेक्षकांकडून निवड केली जाते व त्याला ‘ऑरेंज प्राईज’ दिले जाते. रोलॉ गॅरॉवरील प्रेक्षकांनी या बक्षिसासाठी २००५ ते २००८ अशी सलग चार वर्ष रॉजर फेडररची या ऑरेंज प्राईजसाठी निवड केली होती. player with the strongest nature ‘लेमन प्राईज’ असते व त्या खेळाडूची निवड प्रेक्षक व पत्रकार असे दोघे मिळून करतात. ज्या खेळाडूच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे अशा उदयोन्मुख खेळाडूला ‘बड प्राईझ’ दिले जाते. व विजेत्याची निवड पत्रकार करतात.

प्रत्येक स्पर्धेची अंतिम फेरी झाल्यानंतर थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभ होतो. टेनिसमधील प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांत प्रथम उपविजेत्याला चषक प्रदान करण्यात येतो. अंतिम सामन्यानंतर कोर्टवर एक रॅंप आणला जातो. विजेता व उपविजेता त्या रॅंपवर येऊन आपला चषक स्वीकारतात. विजेता आपला चषक घेऊन नंतर तसाच पुढे जातो. व रॅंपच्या टोकापर्यंत जाऊन प्रेक्षकांना अभिवादन करून आपला चषक दाखवतो. टाळ्यांच्या कटकडाटात हा समारंभ पार पडतो. त्यानंतर कोर्टवरून बाहेर पडताना विजेत्या व उपविजेत्या भोवती सह्या घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची झुंबड उडते.

ग्रॅंड स्लॅम असो नाहीतर इतर कोणती ही स्पर्धा असो, त्यावेळी काही ना काही गमतीदार प्रसंग घडणे ही अगदीच नित्याचीच गोष्ट आहे. २०१४ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या चषकांच्या बाबतीत अशीच एक गमतीशीर गोष्ट घडली. त्या वर्षी राफेल नदालने जोकोविचला हरवून फ्रेंच स्पर्धा जिंकली.  पारितोषिक वितरण समारंभात नियमाप्रमाणे सर्वप्रथम जोकोविचला उपविजेत्याची प्लेक प्रदान करण्यात आली. 

फ्रेंच ओपनमधील उपविजेत्याला दिला जाणारा चषक म्हणजे चौकोनी आकाराची प्लेक असते; पण चुकून जोकोविचला त्याऐवजी चेअर अंपायरची गोलाकार प्लेक दिली गेली. समारंभ सुरू असताना काही क्षणातच कोर्टवर उपस्थित असलेल्या काही चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. झाल्या चुकीबद्दल त्यांनी जोकोविचची माफी मागून प्लेक्‍सची अदलाबदल करण्यास सांगितले.

चेअर अंपायर मारियाला जोकोविचच्या हातातली गोल प्लेक देण्यात आली आणि चौकोनी प्लेक जोकोविचला देण्यात आली. खरंतर नियमाप्रमाणे उपविजेता आणि विजेत्यानंतर अंपायरला प्लेक दिली जाते. पण यावेळी घडले असे, की या अदलाबदलीत उपविजेत्याच्या आधीच चेअर अंपायर मारियाला प्लेक दिली गेली. 

आधीच सामना हरल्यामुळे उपविजेता खट्टू झालेला असतो. त्यात अशी चूक! पण जोकोविचने हे सगळे हसतमुखाने मान्य केले. त्याच्या खिलाडूपणाला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली हे वेगळे सांगायला नको.

संबंधित बातम्या