टीम इंडियाच्या यशोगाथेचा द्रोणाचार्य

शैलेश नागवेकर
रविवार, 31 जानेवारी 2021

क्रीडा

विजय दोन प्रकारचे असतात. यातील पहिला प्रकार, तुमचा प्रतिस्पर्धी अनेक चुका करत असतो आणि त्यामुळे तुमचा विजय सुकर झालेला असतो. दुसरा म्हणजे तुम्ही केलेली असामान्य कामगिरी. ही कामगिरी यशाच्या शिखरावर नेणारी असते. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेले यश हे दुसऱ्या श्रेणीतील म्हणजेच असामान्य कामगिरी करून मिळवलेले. 

ब्रिस्बेन अर्थात ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगवान आणि बाऊन्स असलेल्या मैदानावर भारतीय संघाने केलेल्या चमत्काराला इतके दिवस झाले तरी त्याची झळाळी अजूनही कायम आहे. भारतीय अजूनही या स्वप्नवत यशाची गोडी चाखत आहेत. केवळ भारतीय कशाला क्रिकेटविश्वातील सर्वच देशांमध्ये भारताच्या या यशोगाथेवर चर्चा सुरू आहे. आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्ये त्यांचे माजी क्रिकेटपटूच नव्हे, तर त्यांचे सामान्य क्रिकेटप्रेमी नागरिकही भारावले आहेत. एरवी भारताने मिळवलेल्या कोणत्याही यशात खुसपट काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय संघाच्या या यशाची भुरळ पडावी, ही टीम इंडियाने केलेली क्रांतीच आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, धूर्त आणि कावेबाज म्हणून ओळखला जाणारा रिकी पाँटिंग अजूनही आपल्या संघाचा पराभव कसा झाला हे न समजल्याचे काल परवापर्यंत जाहीरपणे सांगत होता. यावरून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाने काय दिव्य यश कमावले आहे याची जाणीव होते.

भारताच्या या अभूतपूर्व यशाचे शिलेदार कोण? याचा विचार जेव्हा केला जातो, तेव्हा त्याची सुरुवात प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार अजिंक्य रहाणेपासून नेट गोलंदाज म्हणून संघाबरोबर ऑस्ट्रेलियात गेलेल्या थेट टी. नटराजनपर्यंत येऊन थांबते. इतकेच कशाला फिजिओ आणि मसाजिस्ट यांचेही योगदान मैदानावर लढणाऱ्या खेळाडूंएवढेच मोलाचे होते. कारण एकेक खेळाडू जायबंदी होत असताना, जे शिल्लक राहिले होते त्यांना तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी फिजिओ-मसाजिस्ट यांच्यावर होती. उंचच उंच इमारत बांधली जाते तेव्हा जेवढा कळस अभिमानाने मिरवत असतो, तेव्हा त्याचा पायाही त्या अभिमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. म्हणूनच टीम इंडियाच्या या यशाबाबत बोलले जाते, तेव्हा एका व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय हे वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही. ती व्यक्ती म्हणजेच अर्थात दी ग्रेट वॉल... संयमाचा महामेरू... मिस्टर डिपेंडेबल... राहुल द्रविड!  

‘इंडिया वॉल’ची रचली वीट
अजिंक्य रहाणेचे नेतृत्व, महम्मद सिराजचा त्याग आणि जिगर, शार्दुल ठाकूर तसेच वॉशिंग्टन सुंदर यांचा झुंजार लढा, शुभमन गिलची तेजोमय फलंदाजी आणि रिषभ पंतचा... ‘आ देखे जरा किसमे कितना है दम...’ अशा थाटात केलेला प्रतिहल्ला हे भले यशाच्या पडद्यावर दिसून आले असले आणि रवी शास्त्री यांचे संघ व्यवस्थापन या पडद्यामागचे शिलेदार असले, तरी मैदानावर लढणाऱ्या नायकांना बाळकडू देणारा राहुल द्रविड होता हे कदापि दुर्लक्षित होणार नाही. यश हे एका रात्रीत मिळत नसते किंवा अजिंक्य संघ एका दौऱ्यात तयार होत नसतो. एकेक वीट रचली जाते तेव्हा अशी ‘इंडिया वॉल’ तयार होते आणि ही एकेक वीट राहुल द्रविडने तयार केली आणि रचलीही. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी द्रविडने १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. नंतर तो भारतीय ‘अ’ संघाचा मार्गदर्शक होता. त्याच्या छत्रछायेखाली तयार झालेले खेळाडू आत्ता आपली चमक दाखवत आहेत. विराट कोहलीसारखा महानायक आणि जसप्रित बुमरासारखा तोफखाना संघात नसताना याच युवकांनी अटकेपार झेंडा रोवला. भारतीय संघाने मिळवलेल्या या यशाचा उल्लेख केला जातो, तेव्हा दुसरी फळी सक्षम होती म्हणून हे यश मिळाले असे सांगितले जाते. ही दुसरी फळी कोणी तयार केली? राहुल द्रविडने चार-पाच वर्षांपूर्वी घातलेल्या खतपाण्यामुळे ती रोपटी आता वटवृक्ष होण्याची हिंमत दाखवत आहेत.

द्रविडचे शिलेदार
राहुल द्रविडच्या तालमीत आणि त्याच्या विचाराने तयार झालेले सहा ते सात खेळाडू भारतीय संघात आहेत किंवा संघाबरोबर गोलंदाज म्हणून आहेत. २०१५ ते २०१९ या काळात द्रविडने १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. २०१६ मध्ये विश्वकरंडक स्पर्धा खेळले, त्या संघात रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू होते. २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ होता. त्याच संघातून शुभमन गिलने प्रभावशाली कामगिरी केली होती. त्या संघात असलेले ईशान पॉरेल, कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी आता सराव गोलंदाज म्हणून का होईना भारतीय संघाबरोबर आहेत. महम्मद सिराज आणि नवदीप सैनीसारख्या खेळाडूंना १९ वर्षांखालील संघातून द्रविडच्या तालमीत तयार होण्याची संधी मिळाली नाही, परंतु द्रविड भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक असताना ते या संघात होते. दोन वर्षांपूर्वी मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यांत सिराज-सैनी खेळले होते आणि चमकलेही होते. त्या ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघातील काही खेळाडू आता मुख्य संघात खेळत आहेत. अर्थात सेनापती अजिंक्य रहाणे हा तर द्रविडला गुरुवर्य मानतो; एकलव्याप्रमाणे त्याने द्रविडचे अनुकरण केलेले आहे. रहाणेचा कमालीचा संयम आणि आदरयुक्त वर्तन हे द्रविडची कॉपी आहे असे म्हटले तर रहाणेसाठी अभिमानाचे असेल. आयपीएलमध्ये द्रविड राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर होता, त्यावेळी रहाणे त्या संघाचा कर्णधार होता. म्हणजेच गुरू-शिष्याचे हे नाते तेथूनच तयार झालेले आहे.

वर्तनातही रुजला द्रविड
शुभमन गिलपासून ते अजून संधी मिळण्याचा अवकाश असलेल्या कमलेश नागरकोटीपर्यंत हे खेळाडू आपापल्या गुणवत्तेमुळे १९ वर्षांखालील संघापर्यंत प्रगती करत पुढे आले. त्या त्या वेळी त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षक असतील, पण भारताच्या मुख्य संघाचा मार्ग जेथून सुरू होतो, त्या १९ वर्षांखालील वयोगटाच्या संघात द्रविडसारखा मार्गदर्शक मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बॅट कशी पकडावी किंवा चेंडू कसा स्विंग करावा याचे मार्गदर्शन द्रविड करत नसेल, पण तो जी मानसिकता तयार करतो, कणखरपणा आणतो, लढण्याची जिद्द फुलवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम, खिलाडूवृत्ती तसेच जे आदर्श शिकवतो, यामुळे लहान वयातच या खेळाडूंना परिपक्व होण्याचे बाळकडू मिळते. याचे सोपे उदाहरण द्यायचे म्हणजे, सिडनी कसोटीत जसप्रित बुमरा आणि महम्मद सिराज यांना उद्देशून वांशिक शेरेबाजी करण्यात आली. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यावर पंचांनी सामना अर्धवट सोडून द्यायचा पर्याय दिला होता, पण द्रविडचा चेला असलेल्या कर्णधार रहाणेने खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याने क्रिकेट धर्म जपला होता आणि ऑस्ट्रेलियाचीही नाचक्की होऊ दिली नाही.

क्रिकेटविश्वासाठी आदर्श
ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे आता प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत आहे आणि बोधही घेत आहे. पहिल्या कसोटीत खेळलेले अवघे दोन खेळाडू चौथ्या सामन्यात खेळत होते, तरीही भारतीय संघाने हे यश कसे मिळवले याचा शोध आणि बोध घेतल्यावर त्याची सुरुवात द्रविडपासून होते, हा उगम आता सर्वांना कळून चुकला आहे. म्हणूनच पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी द्रविडसारखीच व्यक्ती आपल्याही तरुण खेळाडूंसाठी हवी अशी मागणी करत आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसारख्या क्रिकेट मंडळानेही बोध घेतला आहे. खेळत असताना द्रविडने आपल्या फलंदाजीतून अनेक आदर्श निर्माण केले, आता तो मार्गदर्शक म्हणून तीच परंपरा कायम राखत आहे. एरवी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर प्रत्येक जण खेळाशी निगडित राहण्याबाबत बोलत असतो, समालोचक किंवा प्रशासनात पुढची इनिंग सुरू करण्यावर भर देत असतो. पण ज्या खेळाने आपल्याला मोठे केले त्या खेळाचे ऋण मैदानावर घाम गाळून फेडण्याबरोबर पुढची पिढी तयार करण्याचा पर्याय निवडतो, तो खरा द्रोणाचार्य असतो. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू झाल्यावर त्या मालिकेची चर्चा अधिक प्रमाणात सुरू होईल. काळानुसार प्राधान्यक्रम बदलत राहील, पण पिढी घडवण्याची प्रक्रिया अनंतकाळापर्यंत सुरू राहील आणि चर्चेतही राहील. नव्या पिढीची ‘टीम इंडिया’ म्हणून सध्याच्या भारतीय संघाबाबत बोलते जाते, तसेच विराट कोहलीही नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून जाहीरपणे बोलतो, पण ही पिढी घडवणारा द्रविड द्रोणाचार्याच्या रूपात असतो हे विसरून चालणार नाही.

विनम्रपणे संधी नाकारली
अनिल कुंबळे यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासून दूर व्हावे लागले आणि नव्या प्रशिक्षकासाठी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा विराट कोहलीच्या आग्रहामुळे रवी शास्त्री अर्थातच आघाडीवर होते. पण त्या शर्यतीत राहुल द्रविड आला असता तर त्याचे पारडे निश्चितच जड झाले असते. कारण ती निवड सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती करणार होती, पण द्रविडने विनम्रपणे त्या ऑफरला नकार दिला. मलाही मुख्य संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल, परंतु त्या अगोदर मला भारतीय क्रिकेटचा पाया मजबूत करायचा आहे, हेच खेळाडू पुढे जाऊन मुख्य संघात खेळणार आहेत, असे द्रविडने त्यावेळी सांगितले होते.

संबंधित बातम्या