संशोधनाचा झेंडा उंचावरी

दीपा कदम
सोमवार, 25 जानेवारी 2021

‘ती’ची लढाई

कोविड-१९च्या विळख्यातून सुटण्यासाठी लस हे वरदान ठरणार आहे. जगभरातल्या संशोधकांच्या गेल्या काही महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, रशियासह भारतातही लस देण्यास आता सुरुवात झाली आहे. संशोधन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये चिकित्सक बुद्धीला पडणाऱ्या कोड्याचा, आव्हानांचा पाठलाग करत राहणारी, अंतिम उत्तराची आस धरणारी विजिगीषू वृत्ती आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिज्ञासेचा महिलांमध्ये अभाव असतो असे एक गृहीतक सरसकट  मांडले जाते. कोविड ही जशी २१व्या शतकाची ओळख असेल (एखाद्या रोगाची जागतिक साथ साधारण शंभर वर्षांतून एकदाच येते हे खरे ठरले तर..) तर कोविडवर लशीचा उतारा शोधून काढण्यासाठी या शतकात महिला संशोधकांनी बजावलेल्या कामगिरीचीही नोंद इतिहासात ठळक अक्षरांत नोंदवली जाणार आहे. विसाव्या शतकात सर्वच आघाड्यांवर महिलांनी आपले वर्चस्व मिळवले मात्र संशोधनाच्या क्षेत्रात त्या काहीशा मागे राहत असल्याचे दिसत होते, मात्र २१व्या शतकाचा उत्तरार्ध मात्र वेगळा असेल अशी अपेक्षा ठेवता येईल अशी सुरुवात झाली आहे.

फायझर ॲण्ड बायोएनटेकसह (Pfizer & BioNTech) लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संशोधकांच्या चमूंमध्ये महिला संशोधकांची कामगिरीही महत्त्वाची आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) ही भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने तयार केलेली लस विकसित करण्यात डॉ. के. सुमती यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, तर हंगेरीच्या कॅटलिन कॅरिको यांचा फायझर ॲण्ड बायोएनटेकवने निर्माण केलेली लस विकसित करण्यात महत्त्वाचा सहभाग आहे. अमेरिकेतील मेरीलँड येथे मुख्यालय असलेल्या नोवावॅक्स (Novavax) या लसनिर्मिती कंपनीत आघाडीच्या मॉलिक्युलर सायंटिस्ट असलेल्या डॉ. नीता पटेल या संपूर्ण महिला संशोधकांसह काम करत आहेत.

डॉ. नीता मूळच्या गुजरातच्या. बत्तीस वर्षांपूर्वी विवाह झाल्यावर त्या लग्न झाल्यावर अमेरिकेत गेल्या. संसर्गजन्य आजारावरील औषधाचे संशोधन करण्यात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी शालेय जीवनातच घेतला होता. त्या पाच वर्षांच्या असतानाच क्षयरोगाने त्यांच्या वडिलांचा बळी घेतला होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. महाविद्यालयात जाण्यासाठीदेखील उधारीने पैसे घ्यावे लागत. इतक्या बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाई असणे, आर्थिक विवंचना असल्या कुठल्याच अडथळ्यांनी न अडखळता संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. नीता पटेल यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. 

पण अशी चिकाटी दुर्मीळ असते. विसाव्या शतकात महिला संशोधकांचे प्रमाण भारतामध्ये पाच टक्क्यांपेक्षाही कमी होते. अजूनही हे प्रमाण २० ते ४० टक्क्यांच्यामधे आहे. जगभरातील महिला संशोधकांचे प्रमाण एकूण संशोधकांच्या संख्येत ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर कोविड लस निर्मितीमध्ये डॉ. नीता पटेल, डॉ. कॅटलिन कॅरिको, डॉ. के. सुमती यांसारख्या महिला शास्त्रज्ञांनी बजावलेली भूमिका आणि भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्स सरकारने नुकताच जाहीर केलेल्या ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च सन्मान ह्या गोष्टी किती मोलाच्या आहेत हे लक्षात येते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पाबरोबरच, मूलभूत विज्ञान संशोधनाचे कार्य आणि महिलांनी संशोधन क्षेत्रात यावे यासाठी सरकारी धोरण महिला केंद्रित असावे यासाठी डॉ. रोहिणी गोडबोले यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गेल्याच वर्षी पद्मश्री सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले आहे. भौतिक शास्त्रातल्या संशोधक म्हणून पद्मश्री सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला संशोधक आहेत. पदार्थ विज्ञान म्हणजे काय तर दोन विटांना सिमेंट जोडते तर त्यासाठी जे कण असतात, त्याचा भार असतो त्याचा शोध, इतक्या सोप्या शब्दात त्या पदार्थ विज्ञान या अवजड विषयाची उकल करून सांगतात. 

संशोधनाच्या क्षेत्राकडे महिला वळत का नाहीत? नेमके कोणकोणते अडथळे संशोधनाच्या रिंगणातून त्यांना बाहेर पडायला लावतात? याचे भौतिक शास्त्राच्या पलीकडे जाऊन मार्मिक विवेचन डॉ. गोडबोले यांनी ‘विमेन इन सायन्स’ या विषयावरच्या शोधनिबंधामध्ये केले आहे. 

शाळेपासून महाविद्यालयापर्यंत गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या महिला शिक्षिका किंवा प्राध्यापिका असतात. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये पदव्युत्तर आणि त्यानंतरच्या पीएचडीपर्यंतदेखील विद्यार्थिनी दिसतात. त्यानंतर मात्र अपवादानेच मुली विज्ञानातील संशोधनाकडे वळतात. हाडाच्या संशोधक असणाऱ्या डॉ. रोहिणी गोडबोले यांनी ‘हे असे का?’ याचा शोध घेऊन थांबलेल्या नाहीत, तर धोरणांमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. डॉ. गोडबोलेंनी यामागे नोंदवलेली निरिक्षण साधारणपणे इतर क्षेत्रातील महिलांनाही लागू व्हावीत अशीच आहे. त्यामुळेच उच्च विद्याविभूषित संशोधक महिलांनाही हे लागू व्हावेत हे अचंबित करणारे आहे. 

डॉ. गोडबोलेंच्या अभ्यासानुसार, विज्ञान शाखेत अभ्यास करणाऱ्या मुलींचे पीएचडीपर्यंतचे शिक्षण अनेकदा सुलभ होते. मात्र मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी खर्च येत असल्याने तिथेही घरातील मुलीपेक्षा मुलाला झुकते माप दिले जाते. पीएचडीपर्यंत शिक्षण झालेल्या मुलीवर कुटुंबाकडून लग्न करण्याचा दबाव अधिक असतो. संशोधनासारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ कुटुंबव्यवस्थेत महिलांसाठी नाकारला जातो. त्यामुळे याच टप्प्यावर अनेक तरुणी पीएचडीनंतर शिक्षकी पेशाकडे वळतात. ही चौकट ज्यांना मान्य नाही त्यापैकी अगदी मोजक्या जणी संशोधनाकडे वळतात. संशोधनाच्या क्षेत्रात आल्यानंतर १४ टक्के संशोधक महिलांचे विवाह झालेले नाही किंवा त्यांनी न करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्या तुलनेत केवळ २.५ टक्के पुरुष संशोधक अविवाहित आहेत. ही आकडेवारीच फार बोलकी आहे. लग्न हा महिलेच्या करिअरमध्ये अडथळा ठरू शकतो पण पुरुषाच्या करिअरमध्ये नाही. पुरुषप्रधान संस्कृतीमधल्या या अडथळ्यांचा मागोवा डॉ. गोडबोलेंनी घेतला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन यामध्ये महिला संशोधकांना कुटुंबाला प्राधान्य द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला संशोधकांना करिअरकडे परत वळवण्यासाठीचे मार्ग उपलब्ध असण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संशोधक भारतात प्रमुख संस्थांचे नेतृत्व करत असल्याकडेही त्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष वेधले आहे. 

बाईने संसाराचे विमान उडवावे आणि केवळ स्वयंपाकघरातल्याच विज्ञानात रमावे हा पितृसत्ताक पद्धतीने घालून दिलेला शिरस्ता अजून किती शतक बाईच्या पायात अडकून पडणार. अशा प्रकारचे विचार कायम स्वरुपी निकाली निघावेत आणि संतुलित समाज निर्माणासाठी संशोधनाच्या क्षेत्रात महिलांनी अधिकाधिक प्रमाणात येण्याची म्हणूनच नितांत आवश्यकता आहे. कोरोना लस निर्मितीतला महिलांचा सहभाग म्हणूनच सुखावणारा आहे.

संबंधित बातम्या