जर काळ उलटा फिरला तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

‘जर तर’च्या गोष्टी

आमचा ग्यानबा म्हणजे एक भन्नाट गडी आहे. तसा बुद्धिमान पण चाकोरीतून जायला तो तयार नसतो. त्यामुळेच त्याला अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरं देता देता पालक आणि शिक्षक दोघांनाही घाम फुटतो. त्यामुळं मग घरी त्याचा आवाज दडपून टाकला जातो. शाळेत तर काय शिक्षक त्याला वर्गाबाहेर जाण्याची शिक्षा देतात. त्याचे प्रश्न तसे वरवर विक्षिप्त वाटले तरी त्यापाठीमागे काही तर्कसंगती असते याचा विचारच कोणी करत नाही. 

परवा असाच आला आणि भिंतीवरल्या घड्याळाकडे एकटक पाहत राहिला. थोड्या वेळानं त्यानं विचारलं, ‘हे घड्याळाचे काटे असे डावीकडून उजवीकडेच का फिरतात?’

‘म्हणजे, म्हणायचंय काय तुला?’

‘म्हणजे ते उलटे, उजवीकडून डावीकडे, का नाही फिरत?’

‘अरे, पण मग आपल्याला वेळ कशी कळणार?’

‘का नाही कळणार? ते तासांचे आकडे आहेत ना त्यांचीही अदलाबदल करायची, उलटे लावायचे.’

त्याचं म्हणणं तसं बरोबरच होतं. तसं केलं तरी वेळ व्यवस्थित समजली असतीच. काटे डावीकडून उजवीकडे फिरण्याची पद्धत पडली, सवय झाली एवढंच. ते उलटे असले तरी घड्याळ वेळ दाखवण्याचं काम चोख बजावेलच.

घड्याळाचं ठीक आहे. त्याचे काटे असे उलटेसुलटे करता येतील. पण काळही असाच उलटा फिरू शकेल का? तसं झालं तर काय होईल? आपण पाहतो, काळाचा प्रवास एकाच दिशेनं होत असतो. भूतकाळाकडून भविष्याकडे. कालकडून उद्याकडे. उलटा नाही. तोही एक प्रघात आहे म्हणूनच की त्यापाठीही काही तत्त्व आहे?

भौतिकशास्त्रज्ञांना हाच प्रश्न पडला होता. काय होईल काळ असा उलटा वाहायला लागला तर? त्यांनी या विश्वाचा कारभार ज्या काही नियमांनुसार चालतो त्यांचा वेध घेतला. ते नियम ज्या गणिती समीकरणांमध्ये बांधून टाकले आहेत ती सगळी तपासून पाहिली. त्यात काळाला उणे चिन्ह लावून ती गणितं केली. काही फरक पडला नाही. सगळी समीकरणं सुसंगत उत्तरंच देत होती. म्हणजे काळ उलटा चालायला लागला तरी त्या नियमांनुसार चालणारा विश्वाचा गाडा अडकून पडणार नाही याची त्यांना खात्री पटली. 

पण याला एक अपवाद त्यांना सापडला. एक नियम काळाच्या उलट्या फिरण्यापायी मोडून पडेल हे दिसून आलं. एरवी त्याची फारशी फिकीर केली गेली नसती. पण तो नियम अतिशय कळीचा आहे. मूलभूत आहे. सारा डोलारा त्याच्यावरच अवलंबून आहे म्हणाना. कारण हे विश्व ज्या अणुरेणूंचं बनलेलं आहे त्यांच्या मूळ प्रवृत्तीचंच वर्णन तो नियम करतो. 

त्या नियमाला वैज्ञानिक भाषेत उष्मागतिकीचा दुसरा नियम म्हणतात. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय सांगतो हा नियम? तो सांगतो की या अणुरेणूंना सुसंबद्ध स्थितीऐवजी गोंधळाची स्थितीच आवडते. नीटनेटकेपणाऐवजी पसाराच पसंत असतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर जेव्हा कोणतीही घटना घडते तेव्हा त्या एकंदरीत संकुलाची एन्ट्रॉपी वाढते. आता एन्ट्रॉपी म्हणजे काय असा प्रश्न पडत असेल तर तो विसरा. कारण त्याचं सहजतेनं समजेल असं उत्तर भल्याभल्या दिग्गजांना देता आलेलं नाही. गणिताच्या भाषेत ते सांगता येतं. पण गणिताचं आणि तुमच्याआमच्या सारख्या येरागबाळ्यांचं तर जन्मजात वाकडंच. तेव्हा नीटनेटकेपणा म्हणजे सर्वात कमी एन्ट्रॉपी आणि पसारा होणं म्हणजे एन्ट्रॉपी वाढणं एवढं आपल्याला समजायला पुरेसं आहे. आणि ही या विश्वाची मूलभूत प्रकृती आहे याची प्रचिती आपल्याला आपल्या नेहमीच्या व्यवहारात कितीतरी वेळा मिळते. तुमच्या हातात एक अंडं असतं. नीटनेटकं. त्याला एक सुसंबद्ध घाट असतो. त्यातला पांढरा द्रव पिवळा बलक आपापल्या जागी व्यवस्थित असतात. पण बघता बघता ते हातातून निसटतं आणि जमिनीवर पडून फुटतं. त्याच्या कवचाचे बारीक बारीक वेगवेगळ्या घाटाचे आणि निरनिराळ्या आकारमानाचे तुकडे होतात. पांढरा द्रव वेडावाकडा पसरायला लागतो. पिवळा बलकही थोडाफार ओघळायला लागतो. एक सुघटित व्यवस्थेकडून अस्ताव्यस्त स्थितीकडे प्रवास सुरू होतो. आपल्याच वेंधळेपणाला दोष देत आपण तो गोंधळ आवरण्याचा आणि जमीन पुसून स्वच्छ करण्याचा विचार करायला लागतो. पण अंड्याचं ते फुटणं आणि फुटल्यावर असा गोंधळ होणं यात आपल्याला काही विचित्र वाटत नाही. ते नैसर्गिक आहे हे आपल्याला पटलेलं असतं. तो सारा पसारा परत एकत्र येत त्याच्यापासून परत ते अंडं तयार होईल अशी भन्नाट कल्पना जरी आपल्या मनात आली तरी ते शक्य नाही याची जाणीव आपल्याला असतेच. अंडं 

आधी एकसंध असतं आणि फुटल्यानंतरच ते असं विभागलं जातं. 

अंड्याचं एकसंध असणं हा भूतकाळ तर फुटून ते विखुरणं हा भविष्यकाळ. प्रवास भूतकाळापासून भविष्याकाळाकडेच होतो. काळ असाच पुढंपुढंच जातो. त्याच्या उलट व्हायचं तर मग काळही उलटा फिरला पाहिजे. अंडं फुटणं हा भूतकाळ आणि त्याचं एकसंध असणं हा भविष्यकाळ. असं होत नाही. काळ असा उलटा फिरत नाही. कारण या विश्वाची नैसर्गिक धारणाच मुळी तशी आहे. भांड्यातल्या पाण्याचा सुविहित आकृतिबंध असतो. ते लवंडलं की कसंही वाट फुटेल तसं पसरत जातं. ते उलटं फिरून एकत्र येत परत त्या भांड्यात जाऊन बसत नाही. आपण तशी अपेक्षाही धरत नाही. कारण तशी अपेक्षा करणं म्हणजे काळ उलटा फिरावा अशी अपेक्षा कऱण्यासारखंच आहे. 

तसा तो फिरला तर गोंधळ माजणार नाही. उलट अस्ताव्यस्तपणाकडून नीटनेटकेपणाकडे प्रवास होईल असं आपण म्हणू कदाचित. पण तसं झालं तर या विश्वाचं काय होईल याचाही विचार करा जरा. या विश्वाची उत्पत्ती एक महाविस्फोटातून झाली हे आता सर्वमान्य आहे. तो होण्यापूर्वी सगळं कसं एक बिंदूत सामावलेलं होतं. महाविस्फोट झाल्यानंतर ते सारं उधळलं गेलं, विखुरलं गेलं, प्रसरण पावत गेलं. अजूनही ते प्रसरण पावतंच आहे. पण त्यातूनच या विश्वाला काही आकार आला. निरनिराळ्या आकाशगंगा तयार झाल्या, ग्रहतारे निर्माण झाले, सजीवांची उत्पत्ती झाली. काळ उलटा फिरायला लागला तर मानवजात परत वानरप्रजातीकडे प्रवास करेल आणि तसाच मग डायनोसॉरपर्यंत आणि त्याही पलीकडे निर्जीव पृथ्वीकडे वाटचाल होईल. तशी होण्याची शक्यता नाही हे वैज्ञानिकांनी गणित मांडून तसंच काही प्रयोग करून दाखवून दिलं आहे. 

त्यांचं म्हणणंच खरं ठरो आणि काळ उलटा न फिरो अशीच आशा आपण करूया.

 

संबंधित बातम्या