जर सूक्ष्मजीव नाहीसे झाले तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 3 मे 2021

‘जर तर’च्या गोष्टी

या कोरोनाच्या काळात, गेल्या वर्षभरात हात धुवायची सवयच लागून राहिलीय आपल्याला. कारण सरकार, डॉक्टर, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी एवढंच काय पण घरची मंडळीही आपल्याला सतत सांगत असतात, की वरचेवर साबणानं हात धुवा. सॅनिटायझरनं हात स्वच्छ करा. सिनेमा, नाट्यगृहं, रेस्टॉरंट सॅनिटायझरचा फवारा मारून शुद्ध करा. कशासाठी? तर कोरोना विषाणूला रोखण्यासाठी. पण सॅनिटायझरच्या वापरानं केवळ कोरोना विषाणूचाच नायनाट होतो असं थोडंच आहे! त्यामुळं तर सगळ्याच सूक्ष्मजीवांना पिटाळून लावलं जातं. तसं केल्यानं आपलं आरोग्य सुरक्षित राहतं, आपलं भलं होतं, असंच सगळे सांगतात. 

जर हे सूक्ष्मजीव नसतेच तर आपलं जगणं अधिक आनंदी झालं असतं का?, या प्रश्नाचं उत्तर सरसकट होकारार्थी देता येणार नाही. आपल्या आरोग्याला धोका पोचवणारे, खास करून संसर्गजन्य रोगांची लागण करून त्यांचा प्रसार करणारे सगळेच रोगजंतू या सूक्ष्मजीवांच्या वर्गात मोडतात, हे खरंच आहे. पण त्यांचेही किमान पाच प्रमुख प्रकार आहेत. कॉलरा, टायफॉईड, क्षय वगैरेसारख्या संसर्गजन्य रोगांची लागण बहुतांशी जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया करतात. पण बुरशी किंवा अमिबासारखे प्रोटोझोआ म्हणजेच अतिसूक्ष्म जीवही काही रोगांची बाधा आणतात. नारू किंवा पोटातले जंत हे तर कृमींच्या जातकुळीतले रोगजंतू आहेत, आणि शेवटचा, सध्या सगळ्यांच्याच परिचयाचा झालेला विषाणू. यातले पहिल्या चार वर्गातले रोगजंतू सजीव आहेत. विषाणू मात्र ना धड सजीव ना निर्जीव. हे सगळे अनादी काळापासून ज्यावेळी मानवप्राण्याचा उदयही झाला नव्हता तेव्हापासून या पृथ्वीवर वावरत आहेत. काही तर अनंत अवकाशातही वास्तव्य करून असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. तेव्हा तसंच पाहिलं तर या जगात राहण्याचा त्यांचा हक्क आपल्यापेक्षा अधिक आहे. तरीही आपण त्यांना तडीपार करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. 

तसं केल्यानं आपलं जगणं अधिक समृद्ध होईल अशी आपली पक्की खात्री झालेली असते. खरोखरीच हे सूक्ष्मजीव जगात पैदाच झाले नसते किंवा आता ते नाहीसे केले गेले तर काय होईल, याचा सखोल विचार केल्यास परिस्थिती वेगळीच असल्याचं ध्यानात येईल. कारण काही सूक्ष्मजीव जरी आपल्या जिवावर उठणारे असले तरी त्यांचे असंख्य भाऊबंद आपल्याला मदतच करत आले आहेत. साधी आपली अन्नपचनाची प्रक्रियाच घ्या. आपण खातो त्या अन्नाचं पचन सुरळीत होण्यासाठी आपल्या आतड्यांमध्ये कायमची वस्ती करून असणारे जिवाणू मदत करत असतात. ते ज्या काही वितंचकांचा, म्हणजे एन्झाईमचा, पाझर करतात त्यामुळं अन्नाचं विघटन होऊन त्यातलं पोषण आपल्याला विनासायास मिळत असतं. कधी कधी त्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर अतिसाराचा त्रास होतो. नाही असं नाही. पण ते क्वचित. बहुतेक वेळा त्यांच्या कारवाईमुळंच आपल्या अन्नाचं सहज पचन होतं. आणि त्यांची संख्या जेव्हा वाढते तीही आपलाच आपल्या जिभेवर ताबा नसल्यामुळंच, हेही सिद्ध झालेलं आहे. 

आपलं मुख्य अन्न वनस्पतीच आहेत. मांसाहार करत असलो तरी ज्याला ‘स्टेपल’ म्हणतात ते पदार्थ वनस्पतींपासूनच मिळतात. या वनस्पतींच्या वाढीसाठी दोन प्रक्रियांची आवश्यकता असते. पहिली म्हणजे प्रकाशसंश्लेषणाची. क्लोरोफिल या हरितद्रव्याच्या मदतीनं सूर्यप्रकाशाचं शोषण करून त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी यांच्यामध्ये विक्रिया करून पिष्टमय पदार्थांची निर्मिती वनस्पती करतात. या प्रक्रियेची दीक्षा काही सूक्ष्मजीवांनीच त्यांना दिलेली आहे. जर सूक्ष्मजीव नसते तर ही प्रक्रिया वनस्पतींच्या ठायी अवतरलीच नसती. त्यांची वाढ खुंटलीच असती. 

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी नायट्रोजनचीही आवश्यकता असते. तसं पाहिलं तर हवेत नायट्रोजन मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. पण त्याचं शोषण करून त्याला संयुगांच्या रूपात बंदिस्त करणं वनस्पतींना शक्य होत नाही. त्यासाठीही त्यांना त्यांच्या मुळांवर वाढणाऱ्या काही सूक्ष्मजीवांची मदत लागते. रायझोबियम जातीचे काही सूक्ष्मजीव हवेतल्या नायट्रोजनला वनस्पतींच्या शरीरात जखडून टाकण्याची कामगिरी पार पाडतात. त्या नायट्रोजनचा वापर मग वनस्पतींना आपल्या निकोप वाढीसाठी करता येतो. 

आपलं शरीर अनेक पेशींचं बनलेलं आहे. यातली प्रत्येक पेशी तिच्यावर सोपवलेली कामगिरी बिनबोभाट पार पाडते तेव्हाच आपलं जगणं सुसह्य होतं. पण या पेशींना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागतेच. ती पुरवली जाते या पेशीत असलेल्या मायटोकॉन्ड्रिया या उपांगाकडून. त्याला म्हणूनच पेशींचं पॉवरहाऊस असंच म्हटलं जातं. हे उपांग तसं पाहिलं तर पेशींमध्ये स्वतंत्र बेटासारखंच वावरतं. ते आलं कुठून याचा शोध वैज्ञानिकांनी घेतलेला आहे. त्यातून हेच ध्यानात आलं की उत्क्रांतीच्या ओघात आपल्या शरीराच्या पेशींनी एका जिवाणूलाच गिळंकृत करून टाकलं. तोच आता या मायटोकॉन्ड्रियाच्या रूपात आपली ऊर्जेची गरज इमानेइतबारे भागवत असतो. 

फळाच्या करंडीतलं एखादं नासकं फळ सगळ्या करंडीलाच बदनाम करतं. काही मूठभर भ्रष्ट अधिकाऱ्यांपायी सगळ्याच प्रशासनयंत्रणेला काळिमा लागावा, तसंच या जिवाणूंचं झालं आहे. त्यातले काही दुष्टजन रोगराई पसरवतात हे खरं आहे. पण त्यांच्यापासून बचाव कऱण्याची कामगिरी त्यांच्या शतपटीनं असणारे जिवाणू पार पाडत असतात, याकडे आपण काणाडोळा करतो. अॅन्टिबायोटिक्स म्हणजे रोगावर मात करणारी जादूची गोळीच असं आपण मानतो. ही औषधं आपल्याला कोण पुरवतं? काही सूक्ष्मजीवच. काट्यानं काटा काढण्याचाच प्रकार झाला हा.

आपण इतक्या निष्काळजीपणे वागतो की आपला परिसर आपण कचऱ्यानं, टाकाऊ पदार्थानं, मलमूत्रानं भरून टाकतो. त्यांचं विघटन करून त्यातल्या विध्वंसक रोगजंतूंना वेसण घालण्याचं कामही सूक्ष्मजीवच करतात. मृत शरीर सडतं याचं कारण हे सूक्ष्मजीव आपलं काम विनातक्रार करत असतात हेच आहे. ते नसते तर मग आपल्याला या कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं वेढूनच टाकलं असतं. 

रोगजंतू तर असंख्य आहेत. त्यांच्या बरोबर आपल्याला सतत लढावं लागतं. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे अक्षरशः ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. पण हे युद्ध पूर्ण तयारीनिशी लढण्यासाठी निसर्गानंच आपल्याला सक्षम रोगप्रतिकार यंत्रणा बहाल केली आहे. आप-पर भाव हे तिचं पायाभूत सूत्र आहे. त्यातही सूक्ष्मजीव आपल्या मदतीला येतात. आपला कोण आणि आपमतलबी परका कोण, हे ओळखण्याची शिकवण सूक्ष्मजीवांकडूनच आपल्या शरीरातल्या सैन्याला मिळत असते. तेच जर नाहीसे झाले तर मग सैन्य पंगू झाल्याशिवाय कसं राहील!

कोरोनाच्या त्रासाला आपण सगळेच कंटाळलो आहोत हे खरंय. स्वाभाविकच आहे ते. पण त्यापायी वैतागून जर सूक्ष्मजीवच नसते तर असा विचार करणं 
आत्मघातकीच ठरेल, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या