पृथ्वी दुप्पट मोठी झाली तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

खरोखरच पृथ्वी सध्यापेक्षा दुप्पट आकाराची झाली तर त्याचे कोणते व्यापक परिणाम संभवतात याचं गणितही वैज्ञानिकांनी केलं आहे. आपल्या धरतीचा व्यास आहे जवळजवळ १३ हजार किलोमीटर. तो जर दुप्पट झाला तर २६ हजार किलोमीटर होईल. तिच्या घनतेत कोणताही बदल झाला नाही तर वजन मात्र चक्क आठपटीनं वाढेल. गुरुत्वाकर्षणही दुप्पट होईल.

जगातील निरनिराळ्या देशांमध्ये आज जी जीवनशैली अंगीकारली गेली आहे आणि ती सांभाळण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा जसा वापर केला जात आहे, ती तशीच चालू ठेवायची असेल तर पृथ्वी कितीपट मोठी असायला हवी, याचं गणित अलीकडेच एका जागतिक स्तरावरच्या पर्यावरण संस्थेनं केलं आहे. यात बहुतांश विकसित देशांचा जास्ती विचार केला होता. त्यात अग्रिम स्थानावर अर्थात अमेरिका आहे. त्यानुसार अमेरिकन नागरिक सध्या ज्या प्रकारे जगताहेत आणि त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती जवळजवळ ओरबाडत आहेत, ते पाहता पृथ्वी सध्या आहे तिच्यापेक्षा पाचपट मोठी असण्याची आवश्यकता आहे. इतर देशही तसे फार पाठीमागे नाहीत. भारताचाही विचार या संस्थेनं केला आहे. आपल्या जीवनरहाटीसाठी सध्याच्या पाऊणपट पृथ्वीही पुरेशी असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. 

या सर्वेक्षणातून काय धडा घ्यायचा तो निरनिराळे देश घेतीलही कदाचित. पण खरोखरच पृथ्वी सध्यापेक्षा दुप्पट आकाराची झाली तर त्याचे कोणते व्यापक परिणाम संभवतात याचं गणितही वैज्ञानिकांनी केलं आहे. आपल्या धरतीचा व्यास आहे जवळजवळ १३ हजार किलोमीटर. तो जर दुप्पट झाला तर २६ हजार किलोमीटर होईल. तिच्या घनतेत कोणताही बदल झाला नाही तर वजन मात्र चक्क आठपटीनं वाढेल. गुरुत्वाकर्षणही दुप्पट होईल. 

जगातल्या कोणत्याही वस्तूचं वजन गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतं. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक षष्ठांश असल्यामुळं तिथं वस्तूचं वजन एक षष्ठांशच भरतं. पृथ्वी जर दुप्पट मोठी झाली तर तिच्या वधारलेल्या गुरुत्वाकर्षणापायी आपलं वजनही दुप्पट होईल. तो भार पेलायचा तर आपले पायसुद्धा भरभक्कम असायला हवेत. एखाद्या गलेलठ्ठ खांबासारखे. शिवाय त्यातली हाडंही अधिक बळकट असावी लागतील. सध्या ती ज्या पदार्थांची बनलेली आहेत, त्याला तो भार सहन करणं कदाचित कठीण होईल. त्यामुळं मग लोखंडासारख्या कोणत्या तरी पदार्थांची हाडं बनवावी लागतील. 

आपले मणके अधिक ताकदीनं खालच्या दिशेनं ओढले जाऊन आकसतील. साहजिकच आपल्या उंचीतही घट होईल. सध्या जागतिक स्तरावर सरासरी उंची पावणेसहा फूट आहे. पण दुप्पट गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी तिच्यात लक्षणीय घट होईल. सर्वसाधारण व्यक्ती बुटबैंगण होण्याचीच शक्यता आहे. याची प्रचितीही अंतराळवीरांकडून मिळालेली आहे. जेव्हा ते अंतराळात वावरतात तेव्हा तिथल्या कमी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली त्यांच्या मणक्यातील द्रव पदार्थ अधिक मोकळेपणानं वाहू शकतो. त्यांची उंची जवळजवळ दोन इंचांनी वाढते. त्यांनी घालायचा अंतराळपोशाख तयार करतानाच तो वाढीव अंगाचा बनवला जातो. अर्थात अंतराळातून ते परत जमिनीवर उतरले की इथलं वाढीव गुरुत्वाकर्षण त्यांना मूळपदावर आणून सोडतं. 

हृदयातून शरीरभर होणाऱ्या रक्ताभिसरणावरही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो. शरीराच्या खालच्या भागात वाहून नेल्या जाणाऱ्या रक्ताला गुरुत्वाकर्षणाचा फायदाच होतो. पण ते जर दुप्पट झालं तर त्याच्या वाहण्याचा वेगही वाढेल. तो सहन करण्यासाठी रक्तवाहिन्याही अधिक बळकट असाव्या लागतील. पण या वाढीव गुरुत्वाकर्षणाचा नकारात्मक परिणाम वरच्या भागाकडे वाहणाऱ्या, विशेषतः मेंदूला होणाऱ्या रक्ताच्या पुरवठ्यावर होईल. कारण आता हृदयाला त्यासाठी अधिक जोर लावावा लागेल. त्यापायी हृदयावर अधिक ताण पडेल. तो सहन करणं कठीण झाल्यामुळं एकंदर आयुर्मानावरही अनिष्ट परिणाम संभवतो. आपल्या डोक्यावर पडणाऱ्या वाढीव भाराचा फटका बसून दृष्टीही काही प्रमाणात अधू झाल्याशिवाय राहणार नाही. 

आपण चालतो किंवा पळतो त्यावेळी प्रत्येक पाऊल उचलताना आपण गुरुत्वाकर्षणाच्या ओढीच्या विरुद्ध काम करत असतो. आपले स्नायू आपल्याला त्यासाठी आवश्यक ते बळ पुरवतात. दुप्पट गुरुत्वाकर्षणावर मात करण्यासाठी स्नायूंनाही कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल. तो सतत करत राहिल्यामुळं आपल्याला लवकर थकवा तर जाणवेलच, पण कालांतरानं आपला वेगही कमी होईल. कदाचित त्या भाराची सवय होऊन आपले स्नायू आणि हाडं अधिक बळकट होण्याचीही शक्यता आहे. पण त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. 

‘ताडमाड उंची’ असा शब्द प्रयोग आपण वापरतो. कारण नारळाची, पोफळीची झाडं आकाशगामी असतात. पण दुप्पट गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापासून वृक्षांचीही सुटका होणार नाही. त्यांची उंचीही खुंटेल. झाडांची वाढ होताना त्यांची उंची वाढली तरी त्यांना पोषण, पाणी जमिनीतूनच घ्यावं लागतं. ते शेंड्यापर्यंत पोचवावं लागतं. त्यासाठी झाडांमधली ऊर्जा खर्च करावी लागते. वाढीव गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात त्यांना अधिक ऊर्जा खर्च करावी लागेल. तिच्यात बचत करण्यासाठी कमाल उंचीवर मर्यादा येईल. अधिक उंचीची झाडं कोलमडून पडतील किंवा कदाचित झाडांची वाढही खुंटेल.  

उत्क्रांती वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, पृथ्वी काही एकाएकी किंवा आताच दुप्पट मोठी होईल, असं नाही. ती जन्माला आली तेव्हाचं तिचं आकारमान वाढलेलं असेल. अर्थात प्रत्येक सजीवाची वाढ, विकास आणि उत्क्रांती त्या वातावरणातच होईल. उत्क्रांतीचा नियम आहे की बदललेल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता असलेले सजीव तग धरून राहतात, त्यांचा वंशविस्तार वाढतो. त्यामुळं काळाच्या, आणि अर्थातच उत्क्रांतीच्या प्रवाहाच्या ओघात त्या वाढीव गुरुत्वाकर्षणाला सरावलेली सजीव सृष्टीच टिकून राहील. तिची सरासरी उंची, वजन, बळकटी आता आपल्याला दिसते त्यापेक्षा वेगळी असेल. पण ते गुणधर्म तिच्या जगण्याला अटकाव करणारे नसतील.

हे झाले सजीव सृष्टीवरचे काही संभाव्य परिणाम. पण दस्तुरखुद्द पृथ्वीही या वाढीव वस्तुमानाच्या परिणामांपासून मुक्ती मिळवू शकणार नाही. धरतीच्या गाभ्यात द्रव रूपातला शिलारस आहे. तो अतिशय गरम आहे. त्यात जे प्रवाह वाहतात त्यापायी त्याच्यावर तरंगणाऱ्या विविध भूखंडांच्या हालचाली होत असतात. त्या द्रवात अनेक चंचल मूलद्रव्यांचंही वास्तव्य आहे. दुप्पट गुरुत्वाकर्षणापायी हा द्रव पदार्थ गोठून तो घन अवस्था धारण करण्याची शक्यता आहे. तसं झालं तर त्यावरच्या भूखंडांच्या हालाचालीवरही प्रभाव पडून सध्या जे सात खंड पृथ्वीवर आहेत त्यांच्या रचनेत आणि ठिकाणातही दूरगामी बदल होऊ शकतात. तसंच त्या गाभ्याचं तापमान वाढून एकंदरीतच जागतिक तापमान वाढीला चालनाच मिळण्याची शक्यता आहे. 

हा द्रवरूप गाभा पृथ्वीला चुंबकत्व मिळवून देतो. पण त्यानंच जर घन अवस्थेत रूपांतर केलं तर पृथ्वीच्या चुंबकत्वावरही घातक परिणाम होतील. सूर्यावरच्या वादळांपोटी जे सौरवारे वाहतात त्यांच्यामध्ये विद्युतभारधारी मूलकणांचा समावेश असतो. पृथ्वीचं चुंबकत्व एका प्रकारे तिच्याभोवती संरक्षक कवच उभं करून या सौरवाऱ्यांना थोपवून धरतं. तेच जर नाहीसं झालं तर मग हे सौरवारे वेगानं पृथ्वीवर येऊन आदळतील आणि भयानक विध्वंस घडवून आणतील. 

तेव्हा ‘गड्या आपुला गाव बरा’च्या चालीवर म्हणावं की ‘गड्या आहे ती पृथ्वीच बरी’!

संबंधित बातम्या