जर चंद्र नसताच तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 25 जानेवारी 2021

‘जर तर’ च्या गोष्टी

चंद्राचं आणि आपलं नातं जन्मापासूनच जुळलेलं असतं. लहानपणीच ‘चांदोबा, चांदोबा, भागलास का! निंबोणीच्या झाडामागे लपलास का!’ असं म्हणत आपण त्याच्याबरोबर खेळू लागतो. तारुण्यात तर काय ‘चंद्र आहे साक्षीला’ म्हणत आणाभाका घ्यायला प्रवृत्तच होतो, आणि संध्याछाया भिववू लागल्या की ‘तोच चंद्रमा नभात’ म्हणत त्या पहिल्या प्रीतीच्या आठवणीत रममाण होण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच वाटतं की हा चंद्र जर नसताच तर काय झालं असतं?

आता तुम्ही म्हणाल की तसा तो दर अमावास्येला नाहीसा होतोच की! पण तो खरोखरच गायब झालेला असतो का? असतो आपल्या जागीच, फक्त आपल्याला दिसत नाही एवढंच. सूर्य नाही का, रात्री आपल्या आकाशातून निघून गेलेला असतो. पण म्हणून तो नाहीसा झालेला नसतो. आपल्या नसेल, पण इतर कोणाच्या तरी आकाशात पूर्ण दिमाखानं तळपत असतोच ना. तसंच चंद्राचं आहे. 

पण समजा, म्हणजे कल्पना करा की तो खरोखरच नाहीसा झाला. म्हणजे अजिबात निघून गेला. तर काय होईल? तरुण-तरुणींची पंचाईत होईल आणि कविमंडळी घायाळ होतील, हे खरं. पण तो जर खरोखरीच नाहीसा झाला तर आपली म्हणजे या धरतीची काही खैरियत नाही, असंच समस्त वैज्ञानिक मांदियाळी सांगते आहे. खरं तर चंद्र हे पृथ्वीचंच अपत्य. एका लघुग्रहाशी झालेल्या टक्करीतून पृथ्वीचा जो टवका उडाला तोच चंद्र म्हणून आपल्याला प्रदक्षिणा घालत अंतराळात बस्तान ठोकून बसला. म्हणजे चंद्राची आणि वसुंधरेचीही जन्माचीच साथ आहे. त्याचीच जाण ठेवून चंद्रानंही आपल्या जननीवर अनेक उपकार केले आहेत. 

चंद्राच्या नाहीशा होण्याचा पहिला फटका बसेल तो आपल्या सागरांना येणाऱ्या भरती-ओहोटीच्या चक्राला. तसं पाहिलं तर चंद्राचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कितीतरी कमी आहे. म्हणूनच त्याच्या गुरुत्त्वाकर्षणाची मात्रा आपल्या एक षष्ठांशच आहे. तरीही त्याच्या ओढीचा परिणाम म्हणूनच त्याच्याकडे मोहरा वळवलेल्या समुद्रांना भरती येते आणि इतर ठिकाणी ओहोटी. आता चंद्रच नसेल तर त्याची ओढही जाणवणार नाही. त्यापायी मग भरती येणं अजिबात थांबेल का? तर नाही. कारण भरती येण्यामागे सूर्याच्या गुरुत्त्वाकर्षणाचाही प्रभाव असतो. पण चंद्र तुलनेनं किती तरी जवळ असल्यामुळं सूर्याच्या ओढीचा हिस्सा नगण्य असतो. पण चंद्र नाहीसा झाला तर सूर्याच्या ओढीचा प्रभाव जाणवायला लागेल. आणि भरती-ओहोटीचा खेळ चालूच राहील. मात्र सध्याच्या तुलनेत त्यांची मात्रा जेमतेम एक तृतीयांशच राहील. 

पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात. त्यावेळी चंद्र आणि सूर्य यांच्या ओढीची बेरीज होऊन उधाण येतं. उलट सूर्य आणि चंद्र जेव्हा काटकोनात असतात, म्हणजे साधारण अष्टमीच्या दिवशी, त्यावेळेला भरतीची मात्रा किमान असते. कमाल भरती किमान भरतीच्या दुप्पट मोठी असते. पण चंद्र नाहीसा झाला तर हा बेरीज वजाबाकीचा खेळही संपेल. दिवस कोणताही असो, भरतीची उंची तेवढीच राहील आणि तीही सध्याच्या सर्वसाधारण उंचीपेक्षाही कमीच भरेल. या भरती ओहोटीच्या खेळाचा परिणाम किनार्‍यावरच्या पर्यावरणावर होत असतो. भरती-ओहोटीच्या खेळापायी समुद्राची घुसळण होते. आणि त्यातून कितीतरी खनिजं, इतर पोषक पदार्थ किनाऱ्यावर आणून ओतले जातात. त्यावर खेकडे, स्टारफिश, गोगलगायी, शिंपल्यातले जीव यासारख्या तिथं संसार थाटणाऱ्या सजीवांचं जीवनचक्र चालतं. भरतीचा आवेगच आटला तर मग या सजीवांची उपासमारच होण्याची शक्यता जास्ती. 

ऋतुचक्र हे धरतीचं वैशिष्ट्य अव्याहत चालू असतं. वर्षभर एकच ऋतू ठाण मांडून बसलाय असं होत नाही. याचं कारण म्हणजे पृथ्वी कललेली आहे. सूर्याभोवती ज्या पातळीत ती प्रदक्षिणा घालते तिच्याशी पृथ्वीचा आस साडेतेवीस अंशाचा कोन करतो. हा धरतीचा कल तसाच स्थिर राहील याची खबरदारी चंद्राचं गुरुत्वाकर्षण घेतं. चंद्रच नसेल तर मग धरतीला असं स्थैर्य कसं मिळेल? चंद्र नसेल तर मग वसुंधरेच्या या कलात वेडावाकडा बदल होत राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे साडेतेवीस अंशांऐवजी तो कमी होईल, कदाचित शून्यावरही येईल. तसं झालं तर मग वर्षभर एकच ऋतू असेल. उलट धरतीचा कल वाढूही शकेल. तसं झालं तर मग ऋतुचक्र पार उलटं पालटं होऊन जाईल. हवामान बदलाला काही ताळतंत्रच राहणार नाही. हिमयुगही अवतरू शकेल. त्यापायी सगळीच सजीवसृष्टी धोक्यात येईल. बापडा चंद्र आहे राखणीला म्हणून तर सगळं आलबेल आहे. ऋतुचक्रच नाही तर दिवसरात्रीचं चक्रही बिघडून जाईल. हे चक्र पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळं तयार झालंय. चोवीस तासात धरती स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हा जो तिचा वेग आहे तोही चंद्रानंच आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीतून निर्धारित केलेला आहे. आता चंद्रच नसता तर मग ती ‘संथ वाहते कृष्णामाई’ सारखी हळुवारपणे फिरत राहिली नसती तर, ‘तुझी चाल तुरूतुरू’ म्हणावं अशी सुसाट गिरकी घेत राहिली असती. खरं तर काही अब्ज वर्षांपूर्वी ती तशीच वागत होती. त्या काळात दिवस नऊ दहा तासांचाच होता. एवढंच कशाला डायनासॉर जेव्हा जगाचे राजे होते त्या कालखंडातही दिवस बावीस तासांचा होता. चंद्रानं आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीनं धरतीला लगाम घालत तिला चौखूर उधळण्यापासून रोखलं आहे. 

चंद्रानं ही वेसण घातली नसती तर स्वतःभोवतीची एक फेरी संपवून धरती चारसहा तासातच मूळपदावर येत राहिली असती. सूर्य उगवला म्हणता म्हणता मावळायलाही लागला असता. अंथरुणातून उठायचा आळस केला तर सूर्योदयाऐवजी सूर्यास्तच नजरेला पडला असता आणि दिवस केवळ सहा तासांचा झाल्यामुळं वर्ष झालं असतं हजाराहून जास्ती दिवसांचं. आता सहा तासांचा दिवस म्हटलं तरी खरं म्हणजे सूर्यप्रकाश असणारा ‘दिवस’ तीनच तासांचा होईल. तसं झालं तर मग कामाचे तास किती ठेवायचे? आणि झोपेचे? सगळाच गोंधळ. आणि ग्रहणांचं काय! चंद्र नाही म्हणजे चंद्रग्रहण तर मुळातूनच बाद झालं. पण सूर्यग्रहणही होणार नाही. खग्रास तर नाहीच, पण खंडग्रास नाही, कंकणाकृतीही नाही. डायमंड रिंग पाहण्याची संधीच नाही. कारण सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आडवा येतो म्हणून सूर्याला ग्रहण लागतं. चंद्रच नसेल तर सूर्यप्रकाशाला कोण रोखून धरणार! 

चंद्र आहे म्हणून आजची ही पृथ्वी आहे. तिचं सजीवसृष्टीला पूरक पर्यावरण आहे. तो नसता तर सजीवसृष्टीही धरतीवर अवतरली असती का, एवढी फोफावली असती का, हाही विचार तुमच्या मनात येतोय ना! तेव्हा केवळ कोजागिरीच्या किंवा करवा चौथच्या रात्री पुरतंच चंद्राचं कौतुक करून थांबू नका. 

सतत त्याचे आभार माना.

संबंधित बातम्या