‘ट्रॅम्प’ची शताब्दी!

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 1 मार्च 2021

विशेष

हॉलिवूडमधला पडद्यावर तुरुतुरु चालणारा, हातात छोटी काठी असलेला, गबाळा कोट परिधान केलेला, कसेनुसे हसून कारुण्याचा सडा टाकणारा, कुरतडल्यासारख्या मिशीचा माणूस कोण? असे विचारले तर एकच उत्तर येईल; ते म्हणजे चार्ली चॅप्लिन. ‘ट्रॅम्‍प’ ही त्याची जगप्रसिद्ध व्यक्तिरेखा पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर आली; त्याला जानेवारीमध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. 

‘ट्रॅम्प’ ही मानवतेला साद घालणारी व्यक्तिरेखा लाखो प्रेक्षकांसमोर आली. ती ‘द कीड’ या चित्रपटाद्वारे याची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय सबकुछ चार्ली चॅप्लिनच्या नावावर आहे. ‘द सर्कस’, ‘सिटी लाईट्स’ आणि ‘मॉडर्न टाइम्स’ हे त्याचे या व्यक्तिरेखेचे पूर्ण लांबीचे आणखी तीन चित्रपट. पण त्याचा संपूर्ण चित्रपट प्रवास पाहिलात तर असे लक्षात येईल की ‘ट्रॅम्प’ ही भूमिका त्याच्या मर्म बंधातली ठेव होती. या भूमिकेने त्याला इतके झपाटले होते की आरंभीच्या काळात अशा पंचेचाळीस छोट्या, अगदी एखाद्या रिळाच्या फिल्म्स त्याने अवघ्या दीड वर्षात तयार केल्या. या फिल्म्स पाहिल्या की तुटपुंज्या साधनसामुग्रीत दिग्दर्शनाची, अभिनयाची गोपुरे उभारणे म्हणजे काय असते याचे सुभग दर्शन आपल्याला होते.

जेव्हा चित्रपट बोलत नव्हता तेव्हा याने आपल्या मूक अभिनयातून पडदा जिवंत केला. मुद्रा अभिनय, देहबोली, एवढेच काय आपल्या सादरीकरणाच्या विविध शैलीदार आविष्कारातून त्याने व्यक्तिरेखांच्या व्यक्तिमत्त्वातही रंग भरले. त्याची पडद्यावरची केवळ उपस्थिती ही अभिनयाची शाळा असते. हातभर लांबीचे संवाद, ठेवणीतला आवाज हे सारे वापरूनही अपेक्षित परिणाम साधू न शकणाऱ्या अनेक तारे-तारका आपण पाहतो, तेव्हा या चतुरस्र कलावंताचे मोल आपल्या लक्षात येते. 

याचे साधे चालणे पाहा. पाय फताडे फाकून तो चालतो तेव्हा आपल्याला क्षणभर हसू येते खरे, पण हेच पाय जेव्हा जड होऊन चालू लागतात तेव्हा दुःख आणि वेदनांचा दंश आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. तुरुतुरु चालणारा हा ट्रॅम्प जगाच्या वेगाबरोबर जुळवून घेऊ पाहणारा एक सामान्य माणूस म्हणूनही आपल्याला भेटला आहे. तुम्ही नीट पाहिलात तर तो कधी प्राण्यासारखाही चाललेला आहे. कधी दोन पायावर पक्षी कसा चालेल तसाही चालला आहे. एका पोरक्या मुलाचा सांभाळ करणारा एक सर्वसामान्य माणूस त्याने ‘द किड’मध्ये रंगवला आहे. आखूड कोट, विटलेला शर्ट, ढगळ विजार सावरत कधी हबकल्यासारखा, तर कधी खोटे अवसान घेऊन चालला आहे. मुलाच्या शोधात हताश होऊन, तर कधी दुःखावेगाने पाय ओढत, ढकलत चालला आहे. त्याच्या शरीराच्या एकूण एक अवयवाचे फार मोठे योगदान त्याच्या अभिनयात आहे. त्याचे केवळ चालणेच बोलत नाही, तर त्याने कंबरेवर, खिशात ठेवलेले हातही बरेच काही सांगून जातात. एका बाजूला पक्के कथानक आणि जोडीला म्हटले तर कथाबाह्य असे हास्याची निर्मिती करणारे प्रसंग यांनी नटलेला ‘द किड’ हा चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला यात नवल ते काय?

 सामान्य माणूस या प्रतिमेला प्रतिष्ठा मिळवून देणारा कलावंत, लेखक म्हणून त्याची नोंद आपण घ्यायला हवी. हा सामान्य माणूस आपल्याला आर. के. लक्ष्मण यांच्या हास्यचित्रातून भेटतो, चिं. वि. जोशी यांच्या चिमणरावमधून साकार होतो, तर कधी पु. लं. यांच्या ‘असा मी असामी’चा नायक धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी याच्या माध्यमातून समोर येतो. ‘वागळे की दुनिया’चा नायक म्हणून छोटा पडदा व्यापतो तेही सामान्य माणूस म्हणूनच. राज कपूरने तर चार्लीची नक्कल करतच आपले बरेचसे सिने आयुष्य व्यतीत केले. सामान्य माणूस कायम पिचलेला, खस्ता खाणारा, गरिबीतही छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारा, प्रसंगी धोरणी, पापभीरू, कायद्याला घाबरणारा; साधेपणा, प्रामाणिकपणा, माणुसकी या गुणांनी युक्त माणूस आपण चार्लीच्या रूपाने पाहिला. तो हुशार आहे, त्याचे सामान्य ज्ञान चांगले आहे, जगण्यातले ताणेबाणे तो ओळखून आहे, त्याला जगाच्या उलाढालीचा अचूक अंदाज आहे, पण हे त्याचे असामान्यत्व जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी पुरसे नाही हेच याच्या ट्रॅम्पने आपल्याला दाखवून दिले.

 ‘द सर्कस’मधील त्याचा उंच बांधलेल्या दोरीवरचा चित्तथरारक खेळ (पाठीला बांधलेली दोरी निसटून गेल्यावरही) कोण विसरेल? आजूबाजूने छोट्या माकडांनी घेरल्यावर झालेली त्याची अवस्था, त्याचा मुद्राभिनय पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो खरा, पण आपल्या समोर मात्र ते अचाट साहसी खेळ  होऊन येतात. सर्वसामान्य माणसाची अनेक संकटे झेलत जगण्यासाठी चाललेली धडपड समाजाला मात्र वेगळ्याच अर्थाने भावत असते, हे वास्तव अतिशय जोरकसपणे या दृश्यातून चार्ली चॅप्लिन मांडतो. मुळाक्षरे, वाक्ये, परिच्छेद या बोलीभाषेच्या प्रारूपाला त्याने आपल्या हावभावांनी, निःशब्द अभिनयाने एक नवा आयाम दिला. आपल्या प्रत्येक हालचालीला, कृतीला तार्किक असे अधिष्ठान देणारा हा विरळा कलावंत म्हणता येईल. 

रे बर्डव्हिस्टेल या मानव वंश शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून असे मांडले आहे, की सर्वसाधारणपणे माणूस दिवसभरात जेमतेम १० मिनिटे बोलतो. प्रत्येक वाक्य साधारण अडीच सेकंदाचे असते. याहून महत्त्वपूर्ण निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे ते म्हणजे, माणूस सुमारे अडीच हजार प्रकारे मुद्राभिनय, हावभाव करू शकतो आणि ओळखूही शकतो. चार्ली चॅप्लिनची चित्रपट कारकीर्द पाहिली तर या संशोधनाची विश्वासार्हता पटते. न बोलताही सगळे सांगणाऱ्या त्याच्या या शैलीचे अनेक चाहते होते. त्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचाही समावेश होता. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या लॉस एन्जलिस येथील प्रीमिअर शोच्या वेळी ते म्हणाले, ‘तुझ्या अभिनय ताकदीविषयी मला राहून राहून आश्चर्य वाटते, ते तिच्या सर्वव्यापीपणाबद्दल. तू पडद्यावर एकही शब्द बोलत नाहीस, पण संपूर्ण जग तुला काय म्हणायचंय ते समजू शकते.’ यावर चार्ली लगेच म्हणाला, ‘अहो, तुम्ही तर अधिक महान आहात. तुम्ही जे बोलता ते लोकांच्या आकलनापलीकडचे असते, तरीही जग तुमची वाहवा करते.’ तर असा हा हजरजबाबी चार्ली चॅप्लिन. विन्स्टन चर्चिलसारखे धूर्त राजकारणीही त्याचे मोठे चाहते होते.

 ज्या चित्रपटाचा सलामीचा खेळ पाहून आइन्स्टाईन यांनी हे उद्‍गार काढले, तो ‘सिटी लाईट्स’ हा चॅप्लिनच्या अंगभूत कौशल्याचा एक सहज सुंदर आविष्कार होता. यात एका फुले विकणाऱ्या दृष्टिहीन तरुणीची आणि ट्रॅम्पची डोळस प्रेम कहाणी रंगवली आहे. यात दारुडा माणूस हा मद्याच्या अमलाखाली कसा प्रेमळ आणि एरवी कसा पाषाणहृदयी असतो हे अतिशय हसत खेळत तो सांगून जातो. मुष्टियुद्धाच्या एका प्रसंगात एका पैलवानाची एका कांडीवर असलेली श्रद्धा तो जवळून पाहतो. तो गेल्यावर तो ती कांडी नकळत आपल्या चेहेऱ्यावर फिरवून ठेवतो. काही वेळाने पाहतो ते काय, तो बलदंड मल्ल हार पत्करून स्ट्रेचरवरून परतत असतो. हे बघितल्यावर त्याची पाचावर बसलेली धारण आणि त्या फिरवलेल्या कांडीचा प्रभाव पुसून टाकण्याचा निष्फळ प्रयत्न पाहताना प्रेक्षकांची हसून मुरकुंडी वळते. या प्रसंगातून विनोद निर्मिती करता करता अंधश्रद्धेवर त्यांनी ओढलेला हलकासा आसूड आपल्या मनावरही छोटासा वळ उमटवल्याशिवाय राहत नाही. एका बिल भरून गेलेल्या ग्राहकाच्या टेबलावर बिल आणि शिल्लक रक्कम परत येते. तिथेच हा बसलेला असतो. याचे खाणे झाल्यावर हा तीच रक्कम पुढे करतो. यात याची हातचलाखी तर दिसतेच, पण ती रक्कम याचे बिल भागवायला पुरेशी असते हे वास्तव समाजातील दोन टोकाच्या राहणीमानावरही भाष्य करते. 

चार्ली चॅप्लिनने लहान मोठे ८२ चित्रपट केले. त्यातील केवळ पाच बोलपट होते. आपले समाधान होईपर्यंत तो चित्रीकरण करत असे. याचे उदाहरण म्हणजे, ‘सिटी लाईट्स’मध्ये नायिकेच्या ‘फ्लॉवर्स सर!’ या दोन शब्दांच्या वाक्याचे ३४२ रिटेक्स घेतले होते. विशेष म्हणजे सिनेमा बोलू लागल्यानंतरही मूकपटाचा आपला आग्रह त्याने कायम ठेवला. ‘मॉडर्न टाइम्स’ हे त्याचे खणखणीत उदाहरण आहे.

 ‘मॉडर्न टाइम्स’ हा त्याचा ट्रॅम्पची भूमिका असलेला शेवटचा चित्रपट. पाच फेब्रुवारी १९३६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्यालाही ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. औद्योगिकरणाची सुरुवात, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या नोकऱ्या, कामगार वर्गात पसरलेला असंतोष याचे पडसाद यात जागोजागी उमटतात. बेकारी आणि दारिद्र्य यातून निर्माण होणारी व्यसनाधिनता, गुन्हेगारी असे गंभीर विषय हाताळताना आपला प्रसन्नपणाचा बाज चॅप्लिन सोडत नाही. चित्रपटाची सुरुवातच होते मेंढ्याच्या कळपाच्या दृश्याने आणि पाठोपाठ येते माणसांची तुडुंब गर्दी. या रूपकातून चार्ली चॅप्लिन यांनी माणसाचे मेंढरासारखे होत जाणारे आयुष्यच सांगून टाकले आहे. जेवणाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून अन्न भरवणारे मशीन, यंत्रावर एकसारखे काम करताना, काम न करतानाही तशीच होणारी हालचाल दाखवत माणसात भिनणारी यांत्रिकता तो मांडतो. रस्त्यात ट्रक मधून पडलेले लाल निशाण उचलून तो त्या ड्रायव्हरचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेवढ्यात एक मोठा जमाव निदर्शने करत, घोषणा देत येतो. हा यांच्या पुढ्यात आल्याने पोलिसांना हाच त्यांचा पुढारी वाटतो आणि त्याला तुरुंगात टाकतात, हे दृश्य अतिशय सफाईदारपणे चित्रित करून त्यातील नैसर्गिकता दिग्दर्शकाने टिकवून ठेवली आहे. पोलिसांना मदत केल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होणार असते तेव्हा ‘मला अजून काही दिवस इथे राहता येईल का,’ हा त्याचा निरागस प्रश्न बाहेरील जग हे तुरुंगापेक्षा भयंकर आहे, या त्यावेळच्या वास्तवावर शिक्कामोर्तब करते.

विनोद हा प्रांत साहित्य, कला क्षेत्रात कायमच दुय्यम समजला जातो. त्यामुळे त्याच्या निर्मात्यांचे योग्य मूल्यमापन फारसे होत नाही, याला चार्ली हाही अपवाद ठरला नाही. अर्थात ‘टाइम’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकाने ६ जुलै, १९२५च्या मुखपृष्ठावर त्याची छबी प्रसिद्ध करून या कलाकाराचा योग्य सन्मान केला होता. ‘लाईम लाईट’ या चित्रपटासाठी त्याला १९७३ साली संगीताचे ऑस्करही मिळाले. पण दिग्दर्शन, लेखन, अभिनय याबद्दल ऑस्कर पुरस्कार मात्र या महान कलावंताला कधी मिळाला नाही. अकादमीने १९७२ साली जीवन गौरव पुरस्कार देऊन त्याचे प्रायश्चित्त घेतलेही. या समारंभात उपस्थित रसिक प्रेक्षकांनी बारा मिनिटे उभे राहून, टाळ्या वाजवून या महान कलाकाराला मानवंदना दिली होती. ऑस्करच्या इतिहासातील हा दुर्मीळ आणि हृद्य असा प्रसंग मानला जातो. आज शंभर वर्षे होऊनही हा ट्रॅम्प आपल्या मनातून जाता जात नाही; मला वाटते याहून दुसरा कोणता मोठा पुरस्कार असू शकतो?  

संबंधित बातम्या