नानाविध मोदक

वैशाली खाडिलकर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

गणोशोत्सव म्हटला, की मोदकांशिवाय बाप्पाचा नैवेद्य पूर्ण होत नाही. म्हणूनच पारंपरिक मोदकांबरोबर काही निराळ्या मोदकांच्या रेसिपीज...

रुचकर मोदक 

साहित्य : दहा कंदी पेढ्यांचा चुरा, अर्धा कप काजू-बदाम पावडर, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा चुरा, प्रत्येकी पाव वाटी भाजलेले पांढरे तीळ व शेंगदाणे यांचे कूट, चार टेबलस्पून दुधात भिजवलेल्या अंजीर व खजूर यांची पेस्ट, अर्धा टीस्पून वेलची पूड, दुधात खलून केशराच्या काड्यांची चिमूट.
कृती : एका बाऊलमध्ये वरील सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित एकजीव करावेत. मोदकाच्या साच्यात भरून दाबून सुबक मोदक करावेत.

मसाला-पान मोदक

साहित्य : अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस, प्रत्येकी पाव वाटी भाजलेले तीळ व शेंगदाणे, ४ उन्हात वाळवलेली विड्याची पाने, अर्धी वाटी गुलकंद, प्रत्येकी १० काजू-बदाम, १ टीस्पून मुखवास, पाव वाटी  खवा, २ टेबलस्पून मिल्क पावडर, दोन-तीन थेंब खायचा हिरवा रंग, तूप. 
कृती :भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस, भाजलेले तीळ व शेंगदाणे, उन्हात वाळवलेली विड्याची पाने, गुलकंद, काजू-बदाम, मुखवास हे सर्व मिक्सरमध्ये घेऊन वाटावे. नंतर बाऊलमध्ये काढून त्यात हलकासा भाजलेला खवा, मिल्क पावडर, ऑरगॅनिक खायचा हिरवा रंग घालून एकजीव करून चांगले मळावे.मोदक साच्यात आतून तूप लावून हे मिश्रण भरून सुबक मोदक करावेत.

व्हॅनिला-कस्टर्ड मोदक

साहित्य :  दोन कप सायीसकट दूध, ४ टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून व्हॅनिला फ्लेव्हर्ड कस्टर्ड पावडर, ४ टेबलस्पून दूध, स्ट्रॉबेरीचे तुकडे, तांदुळाची उकड.
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये दूध सायीसकट मंद आचेवर उकळत ठेवावे. त्यात साखर घालावी. लहान बाऊलमध्ये व्हॅनिला फ्लेव्हर्ड कस्टर्ड पावडर व दूध घालून मिश्रण करून वरील दुधात घालावे. मंद आचेवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर झाले की गॅस बंद करावा. वरील मिश्रण बाऊलमध्ये घेऊन थंड करावे व स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत. फ्रीजमध्ये तासभर ठेवले की सारण तयार झाले. नेहमीची तांदुळाची उकड तयार करून, चांगली मळून समान आकाराचे गोळे करावेत. तेलाच्या हाताने एका गोळ्याची पारी करून त्यात वरील सारण भरावे. पारी मिटवून सुबक मोदक तयार करावेत. मोदक पात्रात चाळणीत हळदीची पाने पसरून त्यावर हे मोदक ठेवावेत. सुकलेल्या गावठी गुलाबपाकळ्यांचे बारीक तुकडे पसरावेत. दहा मिनिटे उकडून घ्यावेत व सर्व्ह करावेत.

डाळिंबी मोदक
साहित्य ः किसलेले पनीर, १ वाटी भाजलेला खवा, प्रत्येकी अर्धी वाटी पिठीसाखर, मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट, १ टीस्पून स्ट्रॉबेरी क्रश, प्रत्येकी २ टेबलस्पून बीटरूट व डाळिंबाच्या दाण्यांचा रस, तूप.
कृती : एका स्टील परातीत किसलेले पनीर घ्यावे. त्यात भाजलेला खवा, पिठीसाखर, मिल्क पावडर व डेसिकेटेड कोकोनट घालून एकजीव करावे. हाताला तूप लावून चांगले मळून मऊसर मिश्रण करावे. याचे दोन भाग करावेत. दुसऱ्या भागात स्ट्रॉबेरी क्रश, बीटरूट व डाळिंब दाणे रस घालून मळून एकजीव करावे. एका मोदक साच्याला तूप लावून अर्ध्या भागात पांढरे मिश्रण व दुसऱ्या अर्ध्या भागात रंगीत मिश्रण घालून घट्ट बसवून साचा बंद करावा. दाबून साचा उघडावा. आत डाळिंबी मोदक तयार असेल.

मँगो-क्रॅम्बेरी मोदक 
साहित्य ः अर्धी वाटी तूप, १ वाटी हापूस आंब्याचा दाटसर रस, १ टेबलस्पून क्रॅम्बेरी फळांचा रस, १ वाटी खवा, दळलेली साखर, काजू-बदाम पावडर, पाव टीस्पून वेलची पूड, चिमूटभर जायफळ पावडर.   
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत अर्धी वाटी तूप तापवावे व त्यात हापूस आंब्याचा दाटसर रस आणि क्रॅम्बेरी फळांचा रस घालून मंद आचेवर उकळावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात एक वाटी खवा व दळलेली साखर घालून ढवळावे. नंतर त्यात काजू-बदाम पावडर घालून गॅस बंद करावा. वेलची पूड व चिमूटभर जायफळ पावडर घालून मिश्रण थंड होऊ द्यावे.  
मोदक साच्याला आतून तूप लावून हे मिश्रण भरून सुबक मोदक तयार करावेत.

रसगुल्ला स्टफ्ड पंचामृती मोदक 

रसगुल्ल्याकरिता साहित्य व कृती : एक वाटी ताजे किसलेले पनीर परातीत घ्यावे. त्यात २ टीस्पून आरारूट व चिमूटभर खायचा सोडा घालून चांगले मळून मऊसर गोळा तयार करावा. त्याचे समान आकाराचे गोळे तयार करावेत. गॅसवर स्टील टोपात एक वाटी साखर व चार कप पाणी घालून कच्चा पाक तयार करावा. त्यात हे गोळे घालून मिनीटभर उकळावे. नंतर प्लेटमध्ये काढावेत. 
पारीसाठी साहित्य व कृती : गणरायाचे आवडते पंचामृत घेऊन पारी करायची आहे. एका स्टील परातीत अर्धी वाटी दूध, २ टेबलस्पून दही, प्रत्येकी १ टेबलस्पून तूप-मध व साखर घेऊन एकजीव करावे. त्यात मावेल एवढा भाजलेला बारीक रवा, गव्हाची पीठ व कणभर मीठ घालून एकजीव करून पुऱ्यांसाठी मळतो तशी कणीक मळावी. याचेही समान भाग करावेत. एका भागाची नेहमीप्रमाणे पारी करावी. त्यात एक रसगुल्ला घालावा व पारी मिटवून मोदक करावा. असे सर्व मोदक करावेत. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून १८० डिग्री से. प्रीहिटेड ओव्हनमध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवून बेक करावेत. प्लेटमध्ये काढून प्रत्येकावर तूप घालावे.

पारंपरिक उकडीचे मोदक

साहित्य : पारीसाठी : चार कप बासमती तांदळाची पिठी, पाणी जरुरीप्रमाणे, एक टीस्पून तूप व कणभर मीठ.
सारणासाठी : दोन कप ओल्या नारळाचा चव, दोन कप किसलेला गूळ, चार टेबलस्पून मिल्क पावडर,  अर्धा टीस्पून वेलची पावडर, प्रत्येकी सात-आठ काजू-बेदाणे.
कृती : एका स्टील टोपात नारळ व किसलेला गूळ घालून अर्धा तास ठेवावे. नंतर गॅसवर टोप ठेवून मंद आचेवर सारखे ढवळत राहावे व पाच मिनिटे परतावे. गॅस बंद करून थंड होऊ द्यावे. नंतर त्यात मिल्क पावडर, वेलची पूड, काजू-बदाम घालून सारण तयार करावे. गॅसवर जाड बुडाच्या स्टील कढईत पाणी उकळत ठेवावे. तूप व कणभर मीठ घालावे. चांगली उकळी आल्यावर खाली उतरवून पिठी घालावी व कालथ्याने ढवळावे. पुन्हा मिनीटभर गॅसवर ठेवून चांगली वाफ आणावी. कढई खाली उतरवून झाकण ठेवावे. नंतर उकड पसरट थाळीत घेऊन तेलाच्या हाताने चांगले मळून समान गोळे करावेत. एकेक गोळा घेऊन तेलाच्या हाताने गोल पारी करावी व त्यात सारण भरून कडा चिमटीने मिटवून मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व करून मोदक पात्रात किंवा इडली कुकरमध्ये पाच ते सात मिनिटे वाफवून ताटात काढावेत.

मोदकाचे आइस्क्रीम 
साहित्य : प्रत्येकी १ वाटी बासमती तांदुळाची पिठी व दूध, अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क, अर्धा टीस्पून तूप, २ दुधात खलून केशरकाड्या.
टॉपिंगसाठी : एक वाटी ताजा नारळ चव, अर्धी वाटी किसलेला गूळ, पाव वाटी स्ट्रॉबेरी जाम, काजू-बदाम व स्ट्रॉबेरीचे तुकडे सजावटीसाठी.
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालावे व मंद आचेवर तांदूळ पिठी भाजून घ्यावी. मग त्यात दूध घालून सारखे ढवळत उकड तयार करावी. नंतर त्यात हळूहळू कंडेन्स्ड मिल्क घालून केशरकाड्या घालाव्यात व ढवळावे. बासुंदीसारखे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. थंड होऊ द्यावे व ॲल्युमिनिअम ट्रेमध्ये ओतावे. सिल्व्हर फॉईल लावून झाकावे व सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दहा तास ठेवावे.
टॉपिंगसाठी : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये नारळ चव व गूळ घालावा. सारखे ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात स्ट्रॉबेरी जाम घालून एकजीव करावे. गॅस बंद करावा व थंड होऊ द्यावे.
प्रत्येक काचेच्या बाऊलमध्ये स्कूपने आइस्क्रीम घालावे व तयार टॉपिंगने सजवावे. आवडीप्रमाणे काजू-बदाम व स्ट्रॉबेरी तुकडे घालावेत.

चटपटीत पाणीपुरी मोदक 

साहित्य : 
पारीसाठी ः एक वाटी रवा, अर्धी वाटी ज्वारी लाह्यांचे पीठ, २ टेबलस्पून बेसन, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.
सारणासाठी ः प्रत्येकी १ मूठ मूग व हिरवे चणे, प्रत्येकी १ टीस्पून चाट मसाला व छोले मसाला, चिंचगुळाची व हिरवी चटणी आवडीप्रमाणे, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, चवीनुसार मीठ व कोथिंबीर. 
कृती : 
पारीसाठी ः एक वाटी रवा, अर्धी वाटी ज्वारी लाह्यांचे पीठ, बेसन, हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ हे सर्व परातीत घेऊन एकजीव करावे. कणीक मळण्यासाठी साधे पाणी न वापरता पाणीपुरीचे झणझणीत पाणी वापरावे. त्यासाठी कोथिंबीर, पुदिना व हिरवी मिरची यांचे वाटण, भाजलेली जिरे पावडर अर्धा टीस्पून, पाणीपुरी मसाला दोन टीस्पून, चाट मसाला एक टीस्पून आणि चवीनुसार मीठ हे सर्व बाऊलमध्ये दोन वाट्या पाण्यामध्ये घालून एकजीव करावे. या पाण्याचा उपयोग कणीक मळण्यासाठी करावा.
सारणासाठी ः मूग व हिरवे चणे प्रत्येकी एकेक मूठ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर बाऊलमध्ये घेऊन त्यात चाट मसाला व छोले मसाला प्रत्येकी एक टीस्पून, चिंचगुळाची व हिरवी चटणी आवडीप्रमाणे, चिमूटभर हिंग, हळद पाव टीस्पून, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून मॅशरने रगडा करावा. वरील भिजवलेल्या कणकेचे समान गोळे करावेत. एका गोळ्याची तेलाचा हात घेऊन पारी करावी. सारण भरून पारी मिटवताना मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व करून तेलात तळून प्लेटमध्ये पेपर नॅपकिनवर काढून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या