संशोधक वृत्तीचा अवलिया उद्योजक

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 18 जानेवारी 2021

एलॉन मस्क नावाच्या अवलिया माणसाला परवाचंही आजच दिसतं. त्यामुळंच त्याच्याकडं उद्याच्या समस्यांवर उपाय तयार असतात. मस्क यांच्या कंपन्यांनी फक्त उत्पादनं आणि सेवाच निर्माण केल्या नाहीत, तर नव्या स्वप्नांनादेखील जन्म दिलाय. ही स्वप्न आहेत कमी स्रोतांमध्ये माणसाला सुपरह्युमन बनविणारी. विज्ञानाच्या अमर्याद तंत्रशक्तीला आपल्या कवेत घेणारी. अफाट संपत्तीपेक्षाही त्यांचं वैभव शोभून दिसतं ते त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणेच नावीन्याच्या ध्यासामुळं.

‘‘कृत्रिम प्रज्ञेला जन्म घालणारी माणसं भविष्यामध्ये तिच्यासाठीच पाळीव प्राणी असतील. माणसांपेक्षा यंत्रमानव अधिक चांगल्या पद्धतीनं कामं करू शकतील. माणसाला त्याचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यानं अन्य ग्रहांवरदेखील वस्ती करायला हवी, येत्या काही वर्षांमध्ये माणसांच्या मंगळावरदेखील वसाहती असतील. येत्या दहा वर्षांमध्ये तुमचा मेंदू हा कॉम्प्युटरशी कनेक्ट होईल.’’ ही कुणा नासातील शास्त्रज्ञाची भाकितं नाहीत. मागील दोन ते तीन दशकांपासून एक संशोधक वृत्तीचा उद्योजक रात्रीचा दिवस करून हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी राबतो आहे. अवास्तव आणि आभासी वाटणाऱ्या आणि तितक्याच आव्हानात्मक अशा संशोधनामध्ये त्यानं कोट्यवधी डॉलर्स गुंतवले असून तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कमावलेतदेखील. आज घडीला १८८ अब्ज डॉलर इतक्या मालमत्तेसह तो जगातील सर्वांत श्रीमंत माणूस बनलाय. ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागं टाकून त्यानं हा किताब पटकावलाय. त्याचं नाव आहे एलॉन मस्क. 

अमेरिकेच्या मुक्त आणि तितक्याच पोक्त अशा भांडवलशाही वातावरणात जी उद्योग साम्राज्यं डौलानं उभी राहिली आणि वाढलीदेखील, त्यात ॲपल, गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या पंक्तीमध्ये मस्क यांच्या कंपन्यांचाही समावेश करावा लागेन. मस्क यांनी फक्त कंपन्या उभारल्या नाही तर त्यांनी अनेक प्रस्थापित उद्योगांच्या पारंपरिक चौकटी मोडीत काढत स्वतःचं वेगळं आर्थिक तत्त्वज्ञान जन्माला घातलं. ज्यात वरकरणी सगळं काही अचाट आणि अतर्क्य वाटत असलं तरीसुद्धा ते अशक्य खचितच नाही. थोर अर्थवेत्ता जेव्हान्सन म्हणतो तसं त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये उपयुक्तता आणि स्वार्थ यांच्यातील मेकॅनिक्स जपत आपलं अर्थकारण उभारलंय. मस्कच्या आठही कंपन्यांनी नव्या स्वप्नांना जन्म दिलाय. सध्या जिची सर्वाधिक चर्चा आहे ती ‘टेस्ला’ इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती करतेय, त्यामुळं जगाचं ‘इंधन’कारण बदलू शकतं. ‘स्पेसएक्स’नं अंतराळ प्रवासावरील खर्च कमी करून अधिक क्षमतेची यानं तयार करण्याचा विडा उचलला आहे. ‘बोरिंग’ आणि ‘हायरलूप’ या कंपन्या पायाभूत सेवा आणि सार्वजनिक वाहतूक यांची परिमाणंच बदलायला निघाल्या आहेत. ‘ओपनएआय’ मशीन लर्निंग आणि कॉम्पिटीटीव्ह गेमिंगचा चेहरामोहरा बदलू पाहते आहे. ‘न्युरालिंक’ ही कंपनी रोबोटिक्स, औषधनिर्माण, कृत्रिम अवयवांची निर्मिती आणि लष्करी उपकरणे या क्षेत्रांमध्ये नवे प्रयोग करतेय, ज्यामुळं वैद्यकीय उपचार स्वस्त तर होतीलच पण त्याचबरोबर त्यांची परिणामकारकता कैक पटीनं वाढेल.

आत्ममग्न बाल्यावस्था
मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील; पण पुढं त्यांचं कुटुंब कॅनडाला स्थलांतरित झालं. स्वतःच्या विश्‍वामध्ये रमणाऱ्या या मुलाला शिक्षणाचे पारंपरिक धडे गिरवतानाच विज्ञान साहित्य वाचनाची गोडी लागली. पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्राची पदवी घेतली. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये १९९५ साली त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि पदार्थविज्ञान या विषयांत पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतला खरा पण त्यांचा तिथेही जीव रमला नाही, शेवटी त्यांनी थेट उद्योगाकडं वळण्याचा निर्णय घेतला.

अशीही उद्योगगाथा
मस्क यांची उद्योगगाथा सुरू होते ती झिप-२ (सन १९९५) या वेब सॉफ्टवेअर कंपनीपासून. आधीची एक्स. कॉम आणि नंतरची पेपल (सन १९९९) या ऑनलाइन वित्तीय सेवा आणि इ-मेल पेमेंट कंपन्यांनी त्यांना बख्खळ पैसा कमावून दिला. पुढं २००२ मध्ये ईबेनं  ती १.५ अब्ज डॉलरला विकत घेतली. यामुळं मस्क अब्जाधीश बनले. आधी कमावलेला सगळा पैसा त्यांनी स्पेसएक्स, स्टारलिंक, टेस्ला, सोलरसिटी, न्युरालिंक, बोरिंग कंपनी आणि ओपनएआयमध्ये गुंतविला. अन्य भागधारकांच्या विश्‍वासामुळं पैशाला पैसा जुटत गेला आणि आजमितीस एक अवाढव्य असं उद्योग साम्राज्य उभं राहिलं.

नवसंकल्पनाचा जनक
हा माणूस केवळ उद्योगामध्येच नाही तर मूळ अर्थशास्त्रीय संकल्पना, पारंपरिक शिक्षण तसंच कामाच्या पद्धती बदलू पाहतोय. हे सगळं त्याला जमतंय ते उद्याचं नाही तर परवाचंही आजच पाहण्याच्या संशोधकीय वृत्तीमुळं. त्यामुळंच तात्कालिक अपयशांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. उलट ते अपयशात यशाचा डेटा शोधू लागतात. कदाचित त्यामुळंच असेल; पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अडकलेल्या कॉर्पोरेट गुरूंना ते थेट काम करण्याचा सल्ला देऊ शकतात. अमेरिकेत वाढलेल्या व्यवस्थापन शाखेच्या अभ्यासाचं स्तोम कमी करायला हवं असं नियोजकारांना सुनावू शकतात. त्यांच्या मते पदवीपेक्षाही उत्पादन आणि सेवांचा दर्जा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

सध्या मस्क यांचं तत्त्वज्ञान ट्रेंड मेकर ठरतंय. स्टारलिंकच्या माध्यमातून इंटरनेट सेवांना मोठा बूस्टर पॅक देऊ पाहणाऱ्या हा अचाट वृत्तीचा सीईओ फेसबुकलाही नडलाय. व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी धोरणाला विरोध करत त्यानं जगभरातील यूजर्सना ‘सिग्नल’कडं वळण्याचा संदेश दिलाय. मस्क यांच्या ट्विटनंतर काही क्षणांमध्ये ‘सिग्नल’चे युजर्स झपाट्यानं वाढले. यामुळे फेसबुकची मोठी कोंडी झाली आणि त्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. भविष्यामध्ये याच मुद्द्यावरून अमेरिकेच्या कॉर्पोरेट विश्‍वात नवी स्पर्धा सुरू झाली नाही तरच नवल. मस्क यांचं ट्विट त्याचच सूतोवाच करणारं आहे.

संबंधित बातम्या