कला माणसाला समृद्ध  करते!

शरद तरडे
सोमवार, 11 जानेवारी 2021

या रंग, रेषा,आकार,पोत , अवकाश  यांची वेगळी भाषा असते आणि ती  चित्रकार मांडतो आणि ती  समजण्याचे काही संकेतही आहेत, तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

आपल्या संवेदना, विचार, भावना, दुःख, आनंद व्यक्त करण्यासाठी माणसाने कलेचा आधार घेतला असे म्हणता येईल. त्याला मिळालेली देणगी म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया. या देणगीतूनच अनेक कला निर्माण झाल्या आणि या कलेतून व्यक्त होण्याचे भाग्य  काही लोकांमध्ये आले. यालाच आपण सर्जनशीलता म्हणतो या सर्जनशीलतेतून माणसाचा विकास बहू अंगाने होऊ लागला आणि जसजसे हे आविष्कार बहरू लागले, फुलू लागले तशा नवकल्पना जन्म घेऊ लागल्या. जिथे शब्दही अपुरे ठरतात तिथे कला माध्यम बरेच काही सांगून जाते हे लक्षात आले.

माणसांच्या जीवनातील सौंदर्य, प्रेमभावना, गुंतागुंत,गुण-दोष, स्वार्थ-निःस्वार्थ अशा अनेक गोष्टी अनेक माध्यमातून इतरांसमोर मांडल्या जातात. काही वेळा स्वतःसाठीही अशी मांडणी करून माणूस मनःशांती मिळवितो. माध्यम कुठलेही असू शकते. चित्र, लेखन, काव्य, नृत्य, शिल्प, संगीत इत्यादी. आपले विचार या माध्यमांद्वारे मांडून सर्जनशील माणूस समाजप्रबोधनही करत असतो. अगदी रामायण, महाभारतासारखे ग्रंथही जीवनातील अनेक प्रसंगावर भाष्य करीत समाजाचे प्रबोधन करतात हे आपल्या लक्षात येते.

खरंतर जन्म घेतल्यापासून प्रत्येकजण अनेक दृश्य, माणसं, रंग, निसर्गातील हालचाली बघत असतो, अनुभवत असतो, समजून घेत असतो. पण शब्दांचे माध्यम आल्यावर त्याला तीच दृश्य शब्दांकीत करून समजून घेण्याची प्रक्रिया चालू झाली आणि आपण ‘दृश्य- समज’ गमावून  बसलो.

या रंग, रेषा, आकार, पोत, अवकाश यांची वेगळी भाषा असते आणि ती  चित्रकार मांडतो आणि ती  समजण्याचे काही संकेतही आहेत, तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कलावंत आपली सर्जनशीलता वेगवेगळ्या मार्गाने  मांडण्याचे काम कलेच्या माध्यमातून करतो. आणि त्याद्वारे सर्वसाधारण लोकांना त्या कला माध्यमाचा परिचय करून देतो. त्यातील बारकावे दाखवतो. जशी जशी कला बहरते तशी बघणाऱ्यांचीही संवेदनशीलता वाढते. कलाकाराने किंवा रसिकांनी चित्र काढताना किंवा बघताना डोळ्याने दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडेही पाहायला शिकले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकाराने ती  बघण्याची शक्यता निर्माण होते आणि याचा उपयोग  
जाणता, संवेदनशील  समाज निर्माण करण्यासाठी ही होतो.

आदिमानवाने ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने निसर्ग, प्राणी यांची चित्रे माती किंवा वाळूत गिरवली आणि मग ती गुहेमध्ये कोरली. या चित्रांमध्ये त्याकाळातल्या रोजच्या जीवनातील काही गोष्टी येऊ लागल्या; उदाहरणार्थ प्राण्यांच्या शिकारीची चित्रे, डोंगर, झाडे, मानवी आकृत्या, सूर्य, चंद्र. तिथेच चित्रकलेचा जन्म झाला असे म्हणता येईल.

अनेक वेळा आपल्या अवतीभोवती मुलं त्यांना  जमेल तशी चित्रे काढून व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी काढलेल्या अनभिज्ञ आकारातील चित्र प्रत्येकजण स्वतःच्या नजरेने पाहत असतो. आई-वडिलांना वाटते की मुलानी किंवा मुलीनी आपले चित्र काढले आहे. तर आजीला त्या चित्रात तिच्या मनातला देव दिसतो. आपल्या मनाच्या ठेवणीनुसार आपण त्या चित्राचा अर्थ शोधत असतो. आपल्या भावना त्याच्याशी जुळवून बघतो, हे नैसर्गिक आहे. अशावेळी त्या मुलाला जर विचारले की तू काय काढले आहे? तर तो वेगळेच उत्तर देतो. त्यामुळे ज्याची जशी दृष्टी तयार झालेली असते तसेच ते चित्र त्याला दिसते हे नक्की.

हा अनुभव प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने घेतलेला असतो आणि तोच खूप महत्त्वाचा असतो.

प्रत्येकाला कलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडतेच. पण अनेकदा कसे  व्हावे याबद्दल माहिती नसते. एवढेच काय पण आपण लहानपणापासून एखादे माध्यम वापरून व्यक्त होत असतो पण तेच ‘माध्यम’ आहे, हे सुद्धा कदाचित उमगत नाही.
लहान असताना मलाही देवाची पूजा करताना फुलांच्या रंगाप्रमाणे, आकाराप्रमाणे देवघर सजवायला खूप आवडायचे!  देवांच्या आकारानुसार मांडणी करायचो, त्यांची रंगीत वस्त्रेही मी खूप बारकाईने पाहायचो आणि मला आता कळते आहे तेच माझे व्यक्त व्हायचे, आनंदी व्हायचे माध्यम होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात पण त्याच्याकडे डोळस नजरेने बघणे, त्यातला आनंद घेणे हीच एक कला आहे! ती एकदा आत्मसात केली की मग जे काही समोर येते याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला कलेमध्ये वाटचाल करण्यास मदत करतो.

आपण  खरेतर निसर्गातील गोष्टींनाच आपल्या चित्रातून पुन्हा पुन्हा आठवू पाहतो. त्यातील भाव चित्रात आणतो. या भाव संवेदनेलाच आपण  चित्राचा ‘आत्मा’  म्हणू शकतो. तो भाव योग्य रीतीने कसा आणता येईल किंवा त्याकडे रसिकांनी कसे पाहिले तर ‘रंग संवेदना’ लक्षात येईल याचा विचार आपल्याला या पुढच्या काळात करायचा आहे.

संबंधित बातम्या