चित्र पहावे वाचून-२

शरद तरडे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

चित्र-भान

एखादा विषय घेऊन जेव्हा चित्रकार चित्र काढतो त्यावेळी तो विषय मग ते व्यक्ती चित्र असो निसर्ग चित्र किंवा अमूर्त चित्र, त्यामधील सौंदर्य जाणवल्याशिवाय तो ते चित्र काढत नाही. नुसते विषयानुरूप  चित्रण करणे त्याच्या मनातही नसते. चित्रातील विषय आणि त्यातील त्याला दिसणारे सौंदर्य, कल्पकता, प्रतीके यांचा मिलाफ करून तो चित्र काढत असतो. मात्र, चित्र पहाणाऱ्या प्रत्येक माणसाची सौंदर्याची जाणीव वेगळी असते. चित्राकडे बघण्याची प्रत्येकाची मनःस्थिती, सौंदर्यदृष्टी, त्याचे विश्लेषण करण्याची पद्धतही वेगवेगळी असते.

चित्रकारास जर विचारले की तुम्ही चित्रीकरण करणार आहात ती वस्तू कशी आहे किंवा कशी दिसावी म्हणून करणार आहात? की तुम्ही चित्र काढताना त्या वस्तूकडे पाहिल्यावर तुम्हाला उमगणारा अनुभव अधिक स्पष्टपणे जाणवावा, कळावा यासाठी चित्र काढणार आहात?

दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ चित्रकाराला कळला तर तो महत्त्वाचा आहे कारण एखाद्या विषयाकडे किंवा चित्राकडे सर्वसाधारण माणूस जसा पाहत असतो, त्यापेक्षा कलाकाराची नजर वेगळी असते. कलाकार त्या विषयातील सौंदर्य भाव, त्याला आलेला अनुभव याची काल्पनिक सांगड घालीत असतो. पण, असे जर घडले नाही तर कलाकार आणि सर्वसाधारण माणूस या दोघांमध्ये काहीही फरक राहणार नाही.

एखादा कलावंत ज्यावेळी चित्र काढण्यास प्रारंभ करतो त्यावेळेस तो जे चित्र काढणार आहे त्यातील सौंदर्यस्थळे शोधून ती चित्रात त्याच्या कल्पनेनुसार कशी मांडता येतील याचा विचार करतो. यामुळेच तो त्यावेळी चित्र काढायचा प्रयत्न करतो असे म्हणले तरी चालेल. अशावेळी चित्र काढण्याची प्रक्रिया सुरू झाली तर तो चित्रविषय त्याला जसा चित्रित करायचा आहे त्यामध्ये तो अंतर्मनाने उतरतो. त्यावेळी तो विषय त्याला पहिल्या विचारापेक्षा वेगळ्या रीतीने जाणवू शकतो. आणि त्याचे वेगळेपणाने बघणे, जाणवणे हे त्याच्या कल्पनारम्यतेचे प्रतीक असते. जर तो कलाकार हुबेहूब पद्धतीने चित्र काढणारा असेल तर हे जाणणे त्याला मुळीच कळणार नाही. तो त्याच चित्रांमध्ये समोरील वस्तूचे हुबेहूब चित्र काढेल पण त्यात त्या वस्तूचे व्यक्तिमत्त्व, जिवंतपणा, कल्पनारम्यता, चैतन्य जाणवणार नाही.

कोणताही चित्रकार ज्यावेळेस नवनव्या कल्पना आजमावीत असतो, नवनवे प्रयोग करीत असतो तेव्हा तो जे काही चित्रण करीत असतो ते कुठल्या स्वरूपात अंतिम रूप घेईल, हे तो कधीच सांगू शकत नाही, कारण चित्र काढीत असतानाच त्याला अनेक नवनव्या कल्पना सुचत असतात, त्यातच तो रमत जातो आणि त्या कल्पना चित्रात योग्य रीतीने मांडून बघतो. हे सर्व करीत असताना नुसत्या सरावाने, वारंवार विचार करून, अभ्यास करून चित्र काढता येत नाहीत. चित्र काढण्याचा संबंध जाणिवेशी असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. तो ज्यावेळी चित्र काढत असतो त्यावेळी ते त्याच्या मनाला जे जाणवले आहे ते समजून घेऊन, ती जाणीव चित्र भाषेत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात दृश्य नसणाऱ्या अनेक गोष्टींचे अस्तित्व त्याला चित्रांमध्ये साकारायचे असते. या चित्रणातून त्याला जाणवणारा आनंद, गूढता, गोंधळ, सुखदुःख, शांतता, एकाकीपणा अथवा सामाजिक भान, स्वप्ने इत्यादी गोष्टींची जाण त्या चित्रात येत असते. त्याचवेळी ते चित्र जिवंतपणाचे प्रतीक ठरू शकते. या सगळ्या संवेदना तो आपल्या नवकल्पनेद्वारे चित्रित करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व भावना कदाचित एका चित्रात एकमेकांशी संवाद साधत असतात किंवा एकाकी राहून त्याचे अस्तित्व, वेगळेपण दाखवीत असतात.

हे जे आंतरिक पाहणे आहे आणि काल्पनिक चितारणे आहे हे दोन्ही अनुभव चित्रात एकाच वेळी येत असतात. त्यामुळे चित्र केवळ रचनात्मक अनुभव नसतो तर त्याच्या कल्पनाशक्तीचे ते प्रतीक असते.

वास्तव, कल्पनाशक्ती आणि जीवन अनुभव यांची अनेकविध प्रकारे गुंफण चित्रकार चित्रात करीत असतो आणि त्यांचे नाते आपल्या समोर मांडत असतो. हे करत असताना त्या चित्रकाराची त्यावेळेची मनःस्थिती खूप कारणीभूत असते. एखाद्या चित्रकृतीतून पूर्वी मांडलेला अनुभव पुन्हा काही दिवसांनी जर चित्रकाराने मांडला तर तो वेगळा असतो हे मात्र नक्की. त्यामुळेच प्रत्येक क्षणी जाणवणाऱ्या जाणिवेचे रूपांतर संवेदनेत होते तेही वेगवेगळ्या स्वरूपात. 

कलाकार चित्र काढत असताना तो स्वतःशी संवाद साधत असतो, तो संवाद वेगवेगळ्या रूपाने कल्पनेने चित्रात मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यावेळी कोणी आपले चित्र पाहणार आहे, या जाणिवेशी त्याचा काहीही संबंध नसतो.

जेव्हा कलाकृती पूर्ण झाली असे त्याला वाटते, त्या क्षणी तो त्याच्या चित्रापासून मुक्त होतो!  त्याच्या मनाची घालमेल अस्वस्थता संपते आणि त्याचे मन शांत होते. आता ते चित्र, त्याचे राहत नाही असे म्हटले तरी चालेल.  त्या चित्राला ‘स्वतंत्र अस्तित्व’ प्राप्त झालेले असते. उलट चित्राला असे ‘स्वतंत्र अस्तित्व’ प्राप्त व्हावे याकडेच कलाकाराची मानसिक ओढ असते.

हे जे चित्र ‘कळणे’ आहे ते चित्रकाराच्या मानसिकतेशी जुळेलच हे मात्र कधीच सांगता येत नाही. त्यामुळेच प्रत्येकाने चित्र पाहून स्वतःच्या कल्पना, स्वप्ने, आठवणी यात रमणे, आनंद घेणे हे खूप महत्त्वाचे वाटते.

हे निसर्ग चित्र वाटू शकते. या चित्रात पृथ्वीच्या गर्भातल्या हालचाली फारच मनमोहक पद्धतीने दर्शविल्या आहे. आणि त्या दाखवताना रेषांचा लहरींसारखा वापर केल्यामुळे सर्व लक्ष लाल ठिपक्याकडे आकर्षित होते. हा खरे तर त्या चित्राचा केंद्रबिंदू आहे. अवकाश चित्रित करतानासुद्धा त्या तंत्राचा वापर करून चित्राला एक गती मिळेल, डोळ्याला आल्हाददायक वाटतील अशी रचना दिसून येते. 

दुसऱ्या रीतीने देखील हे चित्र पाहता येते- मानवी जीवनातील चलबिचल, गोंधळसुद्धा या चित्रातून प्रतीत होतो. ज्यावेळी चित्ररसिक हे चित्र पाहतो त्यावेळी ते पाहणे हे चित्रकाराच्या पद्धतीपेक्षा वेगळे असते. म्हणजेच चित्रकार प्रथम चित्र काढण्याच्या मनःस्थितीत आला की तो त्याच्या संवेदना, कल्पना यांचे चित्रण सुरू करतो आणि एका अवस्थेत ते चित्रण संपते.

जेव्हा रसिक चित्र पाहू लागतो तेव्हा त्यातील रंगसंगती, आकार यातून त्याला काही बोध होतो का? ते चित्र मनोवेधक आहे, आवडले आहे असे वाटले तर तो या चित्राची समरस होऊ शकतो. ते चित्र बघून त्याच्या संवेदना, आठवणी जागृत होतात आणि मग ते पाहणे विसरुन स्वतःच्या मनातील कल्पनेमध्ये तो रमून जातो.

या चित्रात उभ्या रेषांचा वापर केल्याने इमारतींचा भास होत आहे. लाल-पिवळ्या, नारंगी रंगांमुळे संपूर्ण चित्रामध्ये स्वच्छ प्रकाशमय वातावरणाची निर्मिती झाली आहे आणि रिकामे अवकाश असले तरी इमारतींच्या रचनेकडे लक्ष जाते.

संबंधित बातम्या