रंग आणि आकार!

शरद तरडे
सोमवार, 8 मार्च 2021

चित्र-भान

आतापर्यंत आपण चित्रकलेचा प्रवास आपल्याच घरातून कसा चालू झाला आहे हे पाहिले. घरातील लहान मुले असोत किंवा मोठे माणसे- ज्यावेळेस या ‘कला यात्रेची’ सुरुवात होते त्या आधीच त्यांची रंगांशी, आकारांशी ओळख होते किंवा  झालेली असते.

लहान मुलांना डोळे उघडताच रंगवैभव दिसू लागते आणि काही दिवसातच त्याची भाषाही तयार होते. हे सर्व करतानाचा प्रवास रंजक असतो.

लहानपणी पाळण्याला अडकवलेले रंगीत पक्षी, फुगे किंवा आवाज करणारी रंगीबेरंगी खेळणी असोत वा आजूबाजूला रंगीबेरंगी कपड्यांमधली माणसे, हे सगळे त्या पाळण्यातल्या मुलासाठी रंगांचे, आवाजाचे शिक्षण असते असे म्हणता येईल.

निसर्ग आपल्याला अनेकविध रंगाशी ओळख करून देतो. निळ्या रंगाच्या आकाशामध्ये सुद्धा सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी रंगांच्या अनेक छटा आढळतात. एकच आकाश सगळीकडे असूनसुद्धा त्यातले रंगवैभव बघून आपण सगळेच अचंबित होतो. अगदी वेगळ्या ऋतूंमध्ये सुद्धा एकाच प्रकारचे आकाश तुम्हाला प्रत्येक वेळी अनेक रंगाचे अस्तित्व दाखवत असते. समुद्राचा गहिरा निळा रंग, नदीचा निळा रंग, फुलांमधील रंग हे सगळे आपल्याला त्याची अनेक रूपे दाखवतात आणि त्याचे होणारे परिणाम व्यक्तीपरत्वे वेगळे असतात.

रंगच नसतील तर? तुम्ही जरा विचार करा की रंगविहीन निसर्ग तुम्हाला कसा भासेल? विचारही करायला कसेतरी वाटते ना!

चौकातील सिग्नलला असलेले लाल, पिवळा आणि हिरवा रंग आपण नेहमी बघतो आणि त्याचा अर्थ आपण जाणतो. तेच रंग दुसरीकडे बघितल्यावर त्याचा अर्थ बदलतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वेगवेगळे रंग कुणा शेजारी, कुठल्या आकारात येतात त्यावर त्यांचे अर्थ बदलत असतात.

प्रत्येक रंगाची आपल्या मनावर पडलेली छाप वेगवेगळी असतेच. प्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. तो आपण कुठल्या मनःस्थितीत बघतो, त्याप्रमाणे त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि तो प्रभाव जन्मभर ठाण मांडून बसतो. त्या रंगांमुळे  आठवणी जाग्या होतात. काही रंगांना गंधही असतो तर काही रंग मोहक, मादक असल्याचे जाणवू शकते.

काही रंगांतून पावित्र्य जाणवते उदाहरणार्थ पांढरा रंग. पिवळ्या रंगातून उत्सव, उत्साह प्रतीत होऊ शकतो. हिरवा, पोपटी रंग तर नावीन्याचे प्रतीक वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक रंगाच्या शेजारी कुठला रंग येईल त्याप्रमाणे त्याचे संदर्भही बदलतात. रंगांचा उपयोग वस्तू जवळ किंवा दूर जाणवण्यासाठी करता येतो.

फुलांचे गुलाबी, नारंगी, पिवळा, जांभळा  

असे अनेक विविध रंग आपल्याला नुसते दिसत नाही तर त्याचा गंधही आपणास जाणवू शकतो, आपली मनःस्थिती बदलू शकतो. रंग त्यांच्या रूपाच्या, आकृतीशी निगडित असल्याने आपली मनःस्थिती किंवा ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढलो त्याचाही रंग संवेदनाशी खूप जवळचा संबंध आहे.

तांबडा, निळा, पिवळा हे मूलभूत रंग असले तरी त्यांच्यापासून शेकडो रंग छटा तयार होत असतात. रंगाची योग्य संगत आणि त्याचे एकमेकांशी असलेले नाते सुंदर चित्र निर्माण करू शकते. हे नाते जमले तर चित्रातले रंग चित्रकाराशी नव्हे तर   रसिकांशी संवाद करतात. एवढेच नव्हे तर त्या रंगातील गंधही आपल्या आठवणी ताज्या करतात. आपण त्या चित्रातील रंगात, आकारात इतके रमतो की जणू हे आकार एका एका रंगाचा हात धरून, मित्रांशी गप्पा मारीत त्या चित्रातून चालले आहेत असाच भास होतो. हे चित्रातून जमून आले की ते मनात घर करून बसते.

या रंगांना जर आकार नसेल तर मात्र त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. आकार बघितला की त्या रंगांच्या भावना आपल्यापर्यंत पोचतात कारण तो रंग आकार  आपल्या मनातील संवेदनाशी जुळता मिळता असतो.

नुसत्या लाल रंगानी रंगवलेले चित्र आपण बघितले तर त्याचा प्रभाव आपल्या मनावर जेवढा पडेल, त्या तुलनेत त्याशेजारी निळ्या, पिवळ्या रंगाचे आकार आले तर पडणारा प्रभाव नक्कीच वेगळा असेल कारण रंग हे अमूर्त आहेत. त्यांना आकार मिळाला तरच त्यातून वेगळा अर्थ चित्राला मिळू शकतो. अगदी साधे उदाहरण घेऊ, आकाशात मस्त घिरट्या घालणारा पक्षी बघितला की ते आकाश जिवंत वाटते, भारलेले वाटते त्या क्षणी! आणि एखादा किलबिलाट करणारा थवा बघितला तर चैतन्य वाहू लागते. तसेच चित्रामधील अवकाशाचे, त्यातील आकारांचे नाते आहे. अमूर्त  चित्रांमध्ये आकार अमूर्त असतात त्यामुळे रंगही अमूर्त भासतात.

या आकारांची वेगळी मजा आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त  दिसू लागले तर त्या चित्रात काय पहायचे हेच कळत नाही. चित्रात आणि मनात दोन्ही ठिकाणी गोंधळ निर्माण होतो. आणि कमी असतील तर अजून काही तरी हवे आहे असे वाटू शकते. त्यामुळे आकार आणि अवकाश यांचा समतोल चित्रात जमला तरच ते चित्र नीट संवाद साधू शकते असे मला वाटते.

आकारांची चित्रात जी योजना केलेली असते त्यात मोकळी जागा, अवकाश, 

नीट सोडावी लागते अन्यथा ते चित्र समतोल साधू शकत नाही. रसिकांनी ते चित्र बघताना त्यातील आकार आणि रंग यांचे एकमेकांशी असलेले नाते समजून घेतले तर ते चित्र उत्तम संवाद करू शकते. एखाद्या खोलीच्या खिडकीतून  दिसणारे आकाश, झाडाच्या फांद्या, चंद्र, आकाश ,आसमंत  हे सगळे मिळून झालेले एक चित्रच असते. या चौकटीचा वापर निसर्ग बघताना कसा करायचा हे एकदा कळले की त्यातून दिसणारी प्रत्येक फ्रेम म्हणजे एक जिवंत चित्रच असते. चित्रकारही हेच तंत्र वापरून चित्र काढत असतो मग ते निसर्गचित्र असो वा व्यक्तिचित्र. 

एकदा या चौकटीचे माहात्म्य कळले की कोणीही आपल्या आवडत्या विषयाचे 

चित्र काढू शकतो, पाहू शकतो. 

संबंधित बातम्या