आकार आणि अवकाश

शरद तरडे
गुरुवार, 25 मार्च 2021

चित्र-भान

अवकाश म्हणजे सर्व प्राणिमात्रांची मोकळा श्वास घेण्याची जागा आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. सकाळी डोळे उघडल्यावर जो आसमंत दिसतो ते म्हणजे आपल्या भोवतालचे अवकाश!

एखाद्या विस्तीर्ण वाळवंटात आपण एकटेच उभे राहिलो तर दूरवर एक आडवी रेषा दिसते आणि वर भले थोरले अवकाश दिसते, ते बघूनच केवढ्या मोठ्या अवकाशात आपण एकटेच आहोत अशी जाणीव होते आणि हीच एक चित्र भावना आहे असे लक्षात घेतले पाहिजे. अवकाशातील आपले अस्तित्व खरोखरच नगण्य आहे. पण आपल्याला विचार करायची, स्वप्न पाहण्याची जी एक दृष्टी लाभली आहे ती आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. आणि याचमुळे निसर्गसौंदर्य बघणे, वाचणे, त्यातून सुचलेल्या कल्पना कला माध्यमातून उतरवणे आपल्याला सहज शक्य आहे. हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे हे नक्की.

या अवकाशाची एक वेगळी गंमत आहे. ते स्थिर असते पण एखाद्या आनंदाने विहार करणारा पक्षी साऱ्या अवकाशाला जिवंतपणा देऊ शकतो. दिवाळीत आकाशात संथपणे लहरणारे कागदाचे, विविध आकाराचे आकाशकंदील पाहिले की आजूबाजूचे सर्व अंधारमय जग उजळून जाताना दिसते. स्तब्ध असलेले अवकाश प्रवाही, रंगीत वाटू लागते. त्यातला एक जिवंतपणा आपल्यालाही लक्षात येतो. आकाशदिव्यांनी भरलेला अवकाश बघून डोळ्याचे पारणे फिटते. म्हणजेच थोड्याशा हालचालींमुळे ही आजूबाजूचे स्थिर आकाश आपल्याशी बोलू लागते. दिवाळीमध्ये रात्रीच्या वेळी दूरवर होत असलेली  आतषबाजी तर मन उल्हसित करतेच, पण त्यातला रंग न् रंग आपल्याला ओळखता येतो केवळ काळ्या अवकाशामुळे. चित्रांमध्ये केलेला अवकाशाचा उपयोग खूप महत्त्वाचा असतो. दोन-चार वेगवेगळे आकारही चित्रातल्या अवकाशाला स्थिर करतात किंवा त्याला गतीही देतात. येथे अवकाशाला कसे वापरायचे हे सर्वस्वी चित्रकार ठरवत असला तरीही, जर या चित्रात व्यवस्थित समतोल नसेल तर मात्र चित्र बघताना आपली नजर एके ठिकाणी टिकू शकत नाही. आकाश आणि आकार यांचे नाते खूप वेगळे आणि गहनही आहे. ‘‘आकार आणि अवकाश हे एकमेकांत पूर्णपणे सामावलेले आहेत. त्यांचे काही काळ वेगळे असणे यालाच आपण चित्र म्हणतो म्हणून चित्र हा आभास आहे.’’ असे ख्यातनाम चित्रकार प्रभाकर बरवे म्हणतात.

अवकाश आणि आकार हे खूप वेळा आपल्या मनात गोंधळही निर्माण करू शकतात. एखाद्या चित्रात अवकाश हाच एक आकार असतो. तर आकारामधील छोटा आकार म्हणजे त्या भोवतालचे अवकाशही असते. ही सर्व योजना चित्रकाराने खूप कलात्मक रीतीने मांडली असेल तर ते चित्र जिवंत उभे राहते, त्या चित्राला योग्य अवकाश मिळाले तर ते चित्र मोकळा श्वासही घेऊ शकते, ते चित्र जिवंत आहे असे आपल्याला नक्कीच जाणवते. खिडकीतून पाहत असताना जर एखादे पीस तरंगत तरंगत खाली येत असलेले आपण पाहत असू तर त्या पिसाच्या तरंगण्याकडे लक्ष जाते. आपले मनही त्याबरोबर तरंगू लागते आणि मग त्या भोवतीच्या मोकळ्या अवकाशाकडे आपले लक्ष जात नाही. त्याचा आपल्याला विसर पडतो. पिसाच्या आकाराचे तरंगणे हे आपल्याला भावते. भोवताली रिकाम्या असणाऱ्या अवकाशामुळे घडते हे मात्र नक्की! जर गच्च झाडी असेल तर हे तरंगणे थांबणार हेही नक्की!

आपल्या मनातील अवकाशाचा विचार केल्यास तेथे अनेक गूढ, अतर्क्य गोष्टी, कल्पना विहार करत असतात आणि या गोष्टींचा वापर कलाकार आपल्या चित्रांमधून मुक्तपणे चित्रित करत असतो. हे सर्व आकार एकमेकांचा हात धरून चित्रांमध्ये अवतरतात आणि मगच चित्र जन्म घेते. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते चित्र जन्माला घालते असे म्हणता येईल. मग यात आकारांची रचना, त्यांचे रंग, रंगांची एकमेकांशी असलेले नाते, त्यांची घनता हे सर्व लक्षात घेऊन चित्रकार आकार आणि अवकाश याचा समतोल साधत असतो. रसिकही चित्र बघताना त्याला आवडणारे आकार, अवकाश आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहून, मनात येणाऱ्या कल्पनांना आकार देऊ शकतो. त्या दृष्टीने नव्याने ते चित्र पाहू शकतो. हे स्वतंत्र पाहणे हेच खरं रसिकांचे ‘स्वातंत्र्य’ आहे असे मला वाटते.

माझ्या अनेक चित्र प्रदर्शनातील चित्रे रसिकांनी मला नवनव्या अर्थांनी, विचारांनी समजावून सांगितली आहेत. त्यामुळे माझीच चित्रे मला नव्याने मला समजली आहेत, असे वाटते. कुठल्याही कलाकाराला रसिकांनी दिलेली ही देणगी असते असे मला वाटते कारण त्यांच्या नजरेने, विचाराने, कल्पनेने चित्रकार कधीही आपले ‘चित्र’ अनुभवू, पाहू  शकत नाही हे नक्की!

चित्रांमध्ये अवकाश आणि आकार यांचे नाते जर योग्य जमले तर ते चित्र तुम्ही उलटेसुलटे कसे पहा तेथे तुम्हाला नव्याने वेगळी दृष्टी देते, नवा अर्थ देते हे मी अनुभवले आहे.

मध्यंतरी एका प्रदर्शनात मांडलेली चित्रे पाहण्यासाठी एक चित्ररसिक रोज यायचे. त्यांना रोज ती चित्रे नव्याने मांडली आहेत असा भास व्हायचा. शेवटी त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही खूप चित्र घेऊन आला आहात का? रोज मला चित्र नवीनच वाटते, असे कसे? त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, मी इथे तीच चित्रं जरा वेगळ्या पद्धतीने मांडून बघतो. कधी ती उलटी करून पाहतो तर कधी आडवी ठेवून बघतो. ही चित्रे अमूर्त पद्धतीचे असल्याने तुम्हाला ती नवी आहेत असे वाटते एवढेच!’’ त्यानंतर मात्र ते आणखीनच बारकाईने चित्र पाहायला लागले. त्या सर्व चित्रांमध्ये आकारांचा, रंगांचा, अवकाशाचा वापर योग्य रीतीने केल्याने हे जमले. आकार आणि अवकाश यांचे नाते इतके घट्ट आहे की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. अवकाश हाच एक आकार आहे तर आकार हेच कधीकधी अवकाशासारखे वाटू शकते.

संबंधित बातम्या