रंग रेषेची भाषा!

शरद तरडे
सोमवार, 5 एप्रिल 2021

चित्र-भान

लहानपणी कधी कॅलिडोस्कोप पाहिल्याचे आठवतेय? लहानमोठ्या कोणालाही वयबिय विसरायला लावून कितीही काळ गुंतवून ठेवणारे, रंगवून टाकणारे असे ते खेळणे असायचे. एक डोळा मिटून, तीन आरसे लावलेल्या त्या दंडाकृती नळीला दुसरा डोळा लावून ती नळी थोडीशी फिरवली की असंख्य वेगवेगळे रंगीत, प्रकाशमय आकार बघणाऱ्यासमोर सादर व्हायचे. प्रत्येकवेळी कॅलिडोस्कोपची नळी थोडी जरी हलवली की प्रत्येत हालचाली बरोबर वेगळा प्रकाश आणि रंगांची वेगळी रचना! सगळे कसे अद््भुत वाटायचे त्यावेळी! आकार आणि रंगांकडे आपले त्यावेळचे बघणे एखाद्या स्थितप्रज्ञासारखे असायचे. कुठलाही विचार, त्याचा संदर्भ मनात नसायचा. निव्वळ मजा घेत असू आपण त्यावेळी रंग प्रकाशाच्या खेळाचा!

बा  गेतील फुलाचे सौंदर्य बघताना किंवा सूर्यास्त, सूर्योदय बघताना आपण त्या दृश्याच्या सौंदर्याकडे बघून स्तंभित होतो. त्या सौंदर्याची कारणमीमांसा करण्याकडे लक्ष देण्याचे आपल्याला सुचत देखील नाही. त्याच पद्धतीने जर आपण चित्राकडे बघून त्यातला भाव समजून घेतला तर त्या भावना नक्कीच लक्षात येतील. पण मग जसे जसे आपण मोठे होऊ लागलो तसे एकेक संदर्भ मनात घट्ट घर करून राहिले आणि संदर्भरहित पाहणे, जगणे आपण विसरून गेलो.

रंग संवेदनाचा आपल्या भावनांशी असलेला संबंध जेव्हा पक्का होतो, त्याच वेळी ते रंग, त्याच भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न करतात किंवा असे म्हणता येईल की तो रंग आपल्या भावनांसकट मनाच्या कोपऱ्यात घट्ट रुतून बसतो. तुम्ही त्या रंगाला मोकळे सोडलेत, त्याला मोकळा श्वास घेऊ दिलात तर तो रंग वेगवेगळ्या रीतीने आपल्या भावनांचे अस्तित्व दाखवू शकतो. काही चित्रांतील रंगसंगती आपल्याला आवडत नाही किंवा काही रंगांचा आपण तिटकारा करतो, त्यामुळे नव्या कल्पनांचा शोध कायमचा थांबतोच!

कलावंत हा चित्रातून वरवरचे स्वरूप दाखवीत नसतो, तर तो त्या चित्राचा ‘आत्मा’ दाखवायचा प्रयत्न करीत असतो. एखाद्या रेषेतून तो कठोरपणाही दाखवू शकतो तर एखाद्या रेषेतून तो मृदुपण दाखवतो. हे सर्व अवलंबून असते त्याच्या सर्जनशीलतेवर! चित्रकलेतील प्रवासामुळे चित्रकार प्रत्येक चित्रात जिवंतपणा आणतो. यासाठी नुसते कष्टच नव्हे तर दरवेळेस नवीन कल्पनांना जन्म द्यावा लागतो, पुनर्निर्माण टाळावे लागते आणि जेव्हा कलाकार क्षणाक्षणाला स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करत असतो तेव्हाच ही सारी प्रक्रिया घडून येऊ शकते. 

रंगांशी, रंगांमध्ये नुसतेच खेळून चित्र होऊ शकत नाही. निसर्गात हिंडून, त्यातील रंग तत्त्वे समजून घेऊन, अनेकांशी संवाद साधून, जीवनानुभव घेऊन समृद्ध झाल्यावरच थोडेफार कलाकार ‘चित्रकार’ होऊ शकतात. एखादी रेषा किंवा रंगांचा फटकारा जेव्हा भाव दाखवू शकतो त्यावेळी ते चित्र म्हणजे एक ‘रूपक’ होते.

तुम्ही कधी तरी जंगलात गेला असाल तर तिथल्या गर्द सावल्यांचा खेळ लक्षात राहिला असेल. कदाचित खूप घनदाट जंगल असेल तर तिथे आपण एकटे आहोत अशा जाणिवेने मग मनात भयही वाटले असेल! हे जे सर्व अनुभवणे आहे, त्या अनुभवण्यातून जाणे आहे, हे खूप महत्त्वाचे आहे! कधी तुम्ही एखाद्या चित्रातसुद्धा या वातावरणाचा अनुभव घेतला असेल. हे जे साम्य तुम्ही अनुभवता, मग ते चित्रातले असो वा निसर्गातले, तो अनुभव खूप महत्त्वाचा असतो. (पहा चित्र १)

लहान मुलाने काढलेला डोंगरातला सूर्य किंवा आई-वडिलांचे चेहरे बघितले की या भाव विश्वाचे दर्शन आपल्याला लवकर होते. त्यांच्या रेषा एवढ्या कमीत कमी आणि जोरकस मारलेल्या असतात की त्या चित्रातले भाव आपल्याला जाणवतात. त्याच्या नजरेतून त्याने वस्तू किंवा आकार यांचे खरे नाते ओळखलेले असते. त्यामुळे तो ज्या बेभानपणे चित्र रेखाटतो, तेव्हा त्या रेषा आपल्याला थेट वस्तूंचा ‘आत्मा’ दाखवू शकतात.

गोलाकार काढलेल्या सूर्याच्या आजूबाजूला काढलेल्या रेषा आपल्याला सूर्यकिरण वाटतात तर दोन त्रिकोणी रेषा डोंगर वाटू शकतात. हे जे मूळ आकार आहेत तेच आपल्या भावनांना खरे स्वरूप दाखवतात. महात्मा गांधींची रेषा चित्र बघितली तर केवळ चष्म्याचे दोन गोलाकार आकार आणि त्याला जोडणारी वळणदार काडी किंवा हातात घेतलेली काठी यामुळे आपल्याला गांधीजी आठवू शकतात. हे सर्व आठवते ते त्यांचे व्यक्तिमत्त्व तो गोलाकार चष्मा आणि काठीशी जोडले गेले आहे म्हणून. 

मध्यंतरी सत्यजित रे यांचे चित्रपट पाहत असताना ‘पथेर पांचाली’ या चित्रपटात एका दृश्यामध्ये तलावातील गवताच्या पातीचे चित्रण मला खूप आवडले. चित्रपट कृष्णधवल असल्याने त्या गवताच्या पात्याचे रूप रेषेसारखेच भासत होते. गवताच्या पात्याचे तलावाच्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब त्यांनी दाखवले होते. या दोन्ही रेषा एकमेकांच्या विरुद्ध उभ्या होत्या तरीसुद्धा पाण्यामुळे एका रेषेला जिवंतपणा आला होता तर दुसरी गवताच्या पात्याची रेषा स्थितप्रज्ञासारखी  स्वतःला निरखत होती. या छोट्याशा चित्रणातून त्यांनी माणसाचे जीवनातील स्वतःला निरखणे असा ‘चित्रभाव’ दाखवला असेच मला वाटले. (पहा चित्र २)

शेवटी चित्र पाहणे म्हणजेच काय तर रसिकाने कुठल्याही पूर्वदूषित नजरेशिवाय, मन मोकळे करून ‘चित्रभावना’ आपल्या नजरेत सामावून घेणे असते. ह्या गोष्टींची सवय लावून घेतली तर स्वच्छ नजरेने कुठलीही गोष्ट अनुभवता येते, मग ते चित्र असो वा व्यक्ती!

एखादा फोटो काढताना आपण जर त्या वस्तूवर फोकस केला नाही तर तो फोटो अंधूक दिसू लागतो. तसेच जर आपण चित्राकडे वरवर पाहिले तर ते चित्र आपल्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही. त्यासाठी त्या चित्रातील प्रत्येक आकार, उकार, रंग समजावून घेऊन त्याचा आपल्या मनावरील परिणाम लक्षात घेतला तरच ते चित्र स्वच्छ भाव उमटवू शकते. त्या चित्रातील रंग भावनेशी तुम्ही एकदा जवळीक साधली की त्यातील रस भावनाही तुमच्या मनात उतरतील त्यासाठी त्या चित्राला शरण जाणे, त्याचेच होऊन जाणे अवलंबिले पाहिजे.

एकदा त्याच्याशी जवळीक साधली की त्या रस भावनेमध्ये तुम्ही चिंब होऊन जाल हे नक्की!

संबंधित बातम्या