चित्रानुभव

शरद तरडे
सोमवार, 14 जून 2021

चित्र-भान

चित्राकडे पाहात असताना रसिक आपल्या स्वतःच्या नजरेने पाहत असतो, अनुभवत असतो. चित्रकार आणि रसिक या दोघांचा समान धागा चित्रात असणे खूप महत्त्वाचे असते अन्यथा चित्ररसिकांना ते चित्र आपले वाटू शकत नाही. या व्यतिरिक्त एक गोष्ट असणे महत्त्वाचे असते ती म्हणजे आत्मीयता!

आपण कधीतरी योगासनं करून बघितलेली असतात. दोन्ही हात वर करून एका पायावर किती वेळ उभे राहता येते, हे पाहण्याचा याचा अनुभव घेतला असेल. पंधरा वीस सेकंद झाली की बऱ्याच जणांना ज्या एका पायावर ते उभे असतात तो पाय डगमगतो आहे, आपला तोल जातो आहे असे वाटते. चित्रातही असेच असू शकते कारण रंग, आकार, अवकाश यांचा योग्य वापर न केल्यास आपल्याला चित्राचा तोल गेल्यासारखे वाटू शकते. रंगतत्त्व आणि आकार यांची योग्य मांडणी असेल तर ते चित्र समतोल वाटते. तर चित्राचा, चित्रकाराचा आणि रसिकांचा हा तोल खूप महत्त्वाचा आहे; कारण चित्रकार तोल सांभाळू पाहतो, तर रसिक तो तोल ओळखून ‘चित्र छान झाले आहे’ असे म्हणतो.

ज्यावेळी चित्रकार जो अनुभव चित्राद्वारे आपल्यासमोर मांडतो तो सुसंगत असतो त्यावेळी हे सर्व घडते. पण एवढे असणे म्हणजे चित्र चांगले आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण चित्रकाराच्या मनातील विचार, अनुभव आकारातून मांडण्याचा प्रयत्न करीत असतो पण खरेच तसे घडते का?

चित्रकार त्याचा अनुभव चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आवश्यक साधने म्हणजे रेषा, आकार, अवकाश, रंगसंगती ह्यांची सर्व मांडणी तो त्याच्या आवडीनुसार चित्रात करत असतो. तोच विचार त्या रसिकांच्या मनात ते चित्र पाहून येत असेल का? असे फार क्वचित होते. हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. चित्रकार आणि रसिक हे वेगवेगळ्या संस्कृती आणि अनुभवातून चित्राची मांडणी करत असतात. चित्राकडे पाहात असताना रसिक आपल्या स्वतःच्या नजरेने पाहत असतो, अनुभवत असतो. या दोघांचा समान धागा चित्रात असणे खूप महत्त्वाचे असते अन्यथा ते चित्र रसिकांना आपले वाटू शकत नाही. या व्यतिरिक्त एक गोष्ट असणे महत्त्वाचे असते ती म्हणजे आत्मीयता! ज्यावेळेस आत्मीयता आतून येते त्यावेळेस चित्र साकारले जाते आणि त्या वेळी ते रसिकांपर्यंत पोहोचते असे म्हणता येईल.

आता ही आत्मीयता म्हणजे काय?

चित्रकार अनेक रचना तयार करीत असतो, रियाज करीत असतो आणि त्या वेळी उत्पन्न होणाऱ्या भावनांचे, कल्पनांचे विरेचन होत असते असे म्हणता येईल. त्यातून अनेक प्रकारची चित्रे निर्माण होतात. काही वेळा काही सुचत नाही असे वाटले तरी काही चित्ररचना चित्रकाराला तयार करायला लागतात.

इथे तो संबंध आपल्या जीवनातील अनुभवांशी जोडता येईल. कित्येक महिने, वर्ष तेच तेच काम करून, तशीच जीवन पद्धती जगून आपण वैतागलेले असतो, जीवन असेच असावेसे वाटत नाही आणि त्याच त्याच गोष्टी करायचा कंटाळा येतो आणि कंटाळून आपण वेगळे काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि या आपली या बंधनातून सुटका झाल्यासारखे वाटते.

चित्राच्या बाबतीतही चित्रकाराचे हेच होत असते. वेगळे काही नसते, फक्त कोणाला ते लवकर करावेसे वाटते तर कोणी घाबरून तेच तेच आयुष्य पुन्हा पुन्हा तसेच जगत असतो. पण चित्रकाराने सर्व गोष्टी झुगारून देऊन नवनिर्मिती करण्याचे ठरवले तर तो आपल्या कल्पना, भावना वेगळ्यारीतीने मांडू शकतो. यामागे मात्र चित्रकाराच्या भवितव्याचा प्रश्न असतो. एखाद्या चित्रातून तो रसिकाच्या मनातील जादूगार होऊ शकतो किंवा त्याला देवत्वही मिळू शकते. चित्र आणि रसिक यांच्यातील दूरत्व संपते तेव्हा हे सर्व घडू शकते. रसिक आणि चित्रकार यांचे मनोमिलन होते त्यावेळी!

या सर्व बाबी रसिकांना समजून द्याव्यात  म्हणून चित्रकाराच्या मनातील स्थिती मी वर्णन केली, जेणेकरून चित्र पाहताना या गोष्टींचे महत्त्व जाणून ते त्यांना पाहता येईल.

खरेतर या कलाकारांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपण कलेची पूजा करत आहोत, कलेशी कधीही प्रतारणा करू नये. आपण देवत्व दिलेल्या कलेची रोज वेगवेगळ्या रीतीने, नव्या कल्पनांनी पूजा केली पाहिजे.

पण एकीकडे कलाकार जर आपले काम उत्तम आहे असे समजू लागला तर तो खरा कलाकार राहत नाही. उत्तम काम जमले आहे असे म्हटले तरी नवीन काही करायची आवश्यकता राहत नाही. कारण तो स्वतः सतत आपल्या कामावर, चित्रावर एकांगी प्रेम करू लागतो. त्याचा अहंकार वाढतो. कलेला  मीच मोठे केले असे तो समजतो आणि तिथेच त्याचा आत्मघात होतो.

दुसरीकडे रसिकांसाठी, त्यांना आवडणारे काम करून खूष करायचा प्रयत्न जेव्हा चित्रकार करतो तेव्हा तो स्वतः कलाकार आहे हे विसरतो आणि तेच तेच काम करून,  आपली सर्जनशीलता संपवितो.

जो कलाकार ‘कला’ या माध्यमाला महत्त्व देतो आणि कायम नवनव्या कल्पनांना जन्म देऊन, तिला वेगवेगळ्या प्रकारांनी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तोच खरा कलाकार असतो. याकडे कलाकारांनी लक्ष दिले तर ‘सर्जनशील कलाकार’ निर्माण व्हायला मदत होईल असे वाटते.

हे करीत असताना कलाकाराला अनेक वर्षे रियाज करावा लागतो आणि रियाज  करतानासुद्धा अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. आपला रियाज एकसुरी होत नाही ना, याकडे फार लक्षपूर्वक पाहावे लागते. वर्षानुवर्षे हे सर्व  करत असताना कधी ते माध्यम तुमच्यावर प्रसन्न होईल याचा काही भरवसा नसतो. पण हा रियाज करतानाच आनंद जर चित्रकाराने घेतला तर त्याला कुठले चित्र हातातून काढले गेले याचा काहीही संबंध राहणार नाही आणि हेच खरे चित्रकाराचे ध्येय असले पाहिजे.

जे हातून घडत आहे ते त्रयस्थासारखे पाहणे, त्यातला आनंद घेणे हे एकदा शिकून घेतले तर चित्रनिर्मितीच्या नवनवीन कल्पनांना कधीच ओहोटी लागणार नाही आणि रसिकांनाही नवनवीन चित्रे नक्कीच पाहायला मिळतील असे वाटते. 

‘कलेला’ आत्मीयतेने स्वतःला अर्पण करण्याचा हा क्षण कलाकाराला ज्यावेळी गवसतो, आणि चित्रातील तोच अर्थ एखाद्या रसिकाला भावला तर तो चित्र‘संवाद’  दोघांना आनंद देऊ शकतो.

संबंधित बातम्या