शिल्पांमधले चित्र

शरद तरडे
सोमवार, 12 जुलै 2021

चित्र-भान

भारतीय शिल्पशैलीत त्या शिल्पाच्या व्यक्तिमत्वाचा, भावनेचा, रस निर्मितीचा प्रामुख्याने विचार केलेला जाणवतो. निसर्गातील अनेक गोष्टींचा प्रतीके म्हणून वापर करण्याची पद्धत आढळते.

स्वप्निलतेने निर्मिलेली चित्रे सगळ्यांनाच आवडतात. वाऱ्यावर उडणारे सोनेरी केस, पऱ्यांसारख्या दिसणाऱ्या सुंदर स्त्रिया, कल्पनेतला स्वर्गलोक चितारणाऱ्या एखाद्या चित्रात हवेत हलकेच तरंगणारी फुले, पाने, फुलपाखरे, एखाद्या सुंदर अप्सरेला कवेत घेऊन उडणारा कोणी युवक, सुंदर निसर्गाचे चित्रण आणि हे सर्व अत्यंत तरलतेने साकारणारा चित्रकार!

अशा प्रकारची अनेक चित्रे, शिल्पे, कथा परदेशात, विशेषतः युरोपात, जन्माला आली तो काळ होता पंधराव्या शतकातला. या काळात लोकांना, चित्रकारांना काही तरी नव्याने हवे होते म्हणून त्या काळातील तयार झालेल्या चळवळीला ‘पुनरुज्जीवन’ (Renaissance) असे संबोधण्यात आले.

यात निसर्गचित्रांबरोबरच शिल्पकलेमध्ये प्रमाणबद्ध शरीररचना, बायबलमधल्या अनेक कथा नव्या शैलीने साकारण्यात आल्या. त्या काळातल्या बिनीच्या कलाकारांमध्ये होते मायकल अँजेलो, लिओनार्दो दा विंची, राफेल इत्यादी कलाकार.

ही सर्व शिल्पे साकारताना शरीरशास्त्राचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरला. त्यावेळी चित्रकार स्वतः अनेक डॉक्टरांबरोबर बसून शरीररचना समजावून घेऊन मानवी शरीराचा अभ्यास करत असत. त्यामुळे त्यांच्या शिल्पकृती, चित्रकृतींमध्येही आमूलाग्र बदल झाला. या सर्व चित्रकार, शिल्पकारांनी चर्चमधील भिंती, छते यावर अतोनात कष्ट घेऊन चित्रे आणि शिल्पे साकारली.

ही सर्व चित्रे शिल्पे अत्यंत वास्तववादी होती. चित्रांचे, शिल्पांचे विषय लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील होते त्यामुळे त्याला रसिकमान्यताही खूप मिळाली. या चित्रांमध्ये प्रथमच त्रिमितीचा अभ्यास केला गेला त्यामुळे ती चित्रे रसिकांना जास्त आवडली. शास्त्रीय पद्धतीने माणसाच्या शरीराचा अभ्यास सुरू झाला होता, त्यामुळे मानवी शरीराची प्रमाणबद्धता शिल्पात महत्त्वपूर्ण रीतीने वापरला गेली. याची साक्ष म्हणजे लिओनार्दो द विंची यांनी साकारलेली शिल्पे. आजही आपण ही शिल्पे बघितली तर त्यातील शरीर सौष्ठव, प्रमाणबद्धता एवढेच नव्हे तर हात, पाय, बोटे, चेहरा यावरील प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईने साकारलेला तपशील पाहून आपण आश्चर्यचकित होतो. या कलाकारांनी चर्चच्या छतावर काढलेली चित्रे अजरामर झालेली आहेत. त्या त्या ठिकाणी ती अजूनही व्यवस्थितपणे जपली आहेत. या चित्रांसाठी सतत मान वाकडी करून चित्र काढणे, रंगवणे आणि तीही त्रिमिती पद्धतीने, हे खूप चिकाटीचे होते. अनेक दिवस, महिने या कलाकारांनी अतोनात कष्ट घेऊनही ते साकारले आहेत. त्यांनी घेतलेल्या कष्टाचा विचारही आपण आता करू शकत नाही. याच काळात फ्रेंच चित्रकार गुस्ताव कार्बेट, जेम्स आबॉट इत्यादी कलाकारांनी सामाजिक विषय, लोकांच्या व्यथा, गरिबांचे प्रश्न, औद्योगिक क्रांतीमुळे त्यावर झालेला परिणाम हे सामाजिक विषय पहिल्यांदाच चित्रात आणले.

शिल्पकलेच्या भारतीय वारशाचा अभ्यास करताना आपल्याला इसवीसनाच्या पार तिसऱ्या चौथ्या शतकापासूनच्या शिल्पकलेचे अनेक पुरावे सापडतात. त्या काळातल्या राजेरजवाड्यांनी आणि धर्मप्रेमी लोकांनी कलाकारांना आणि शिल्पकारांना आश्रय देऊन साकारलेली शिल्पे, देवळे अजूनही दिमाखात उभी आहेत. त्या काळातही भारतीय शिल्पकला अत्यंत पुढारलेल्या अवस्थेत होती असे आपल्याला ती शिल्पे पाहून जाणवते. आपल्या देशात मिळणारा कठीण दगड आणि त्यात खोदलेली कष्टसाध्य शिल्पे बघून डोळे विस्फारतात कारण हे दगड आणि संगमरवर यातील फरक. संगमरवर दगड मऊ आणि काम करण्याच्या दृष्टीने तुलनेने सुलभ होता तर आपल्याकडे मिळणारे बेसॉल्ट किंवा ग्रॅनाईट खूप कठीण! त्या दगडांतून ही शिल्पे आपल्या कलाकारांनी सादर केली होती. त्यात साकारलेल्या नाजूक -साजूक बाबी, त्या कलाकुसरीतून मांडल्या जाणाऱ्या पौराणिक  कथा. 

‘डेव्हिड’ हे संगमरवरामध्ये साकारलेले शिल्प बघून सर्व जग अचंबित झाले होते. त्याच्यातील बारीक-सारिक गोष्टींचे अभ्यास आणि शरीरशास्त्राचा अभ्यास, चेहऱ्यावरचे भाव यामुळे ते खूप प्रसिद्ध आहे. परंतु त्याचवेळी आपल्याकडची नुसते शरीरसौष्ठव असलेल्या मूर्तीच नव्हे तर केवळ एका पाच इंच उंचीच्या आणि तीन-चार फूट लांब दगडी पट्टीत महाभारत किंवा रामायणाची संपूर्ण कथा कोरण्याची पद्धत पाहिली तर आश्चर्याला पारावार उरत नाही. त्या शिल्पातील वेगवेगळ्या लोकांचा आकृत्या, काही संदर्भांमुळे या गोष्टी आपल्याला पूर्णपणे कळतात. ग्रॅनाईट मधून अत्यंत कुशलतेने साकारलेली ही शिल्पे बघून आपल्या पूर्वजांना त्या काळातही अनेकविध गोष्टींचा वापर करून अत्यंत अनगड शिल्पे कोरण्याची कला अवगत होती, हे अगदी सहज लक्षात येते.

भारतीय शिल्पकला आणि पाश्चिमात्य शिल्पकला यातील काही महत्त्वाचे फरक आपण या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजेत. भारतीय शिल्पकलेत हुबेहूब वस्तू, शिल्पकला दाखवणे अशा गोष्टी कधीच केल्या गेल्या नाहीत. भारतीय शैलीत त्या शिल्पाच्या व्यक्तिमत्वाचा, भावनेचा, रस निर्मितीचा प्रामुख्याने विचार केलेला जाणवतो. निसर्गातील अनेक गोष्टींचा प्रतीके म्हणून वापर करण्याची पद्धत आढळते.

पाश्चिमात्यांच्या शिल्पकलेत अंगावरचे वस्त्र दाखवायचे असेल तर ते जसे पडले असेल तसेच शिल्पात दाखवायचे यावर खूप भर दिलेला दिसतो. उदाहरणार्थ ते वस्त्र अंगावर असेल तसेच दिसेल, परंतु भारतीय शिल्परचनेत ते वस्त्र एका लयीमध्ये दाखविले जाते. निसर्गातल्या वेलींमधून जाणवणारी लयबद्धता त्यातून जाणवत राहते. आपण जर गौतम बुद्धांच्या मूर्ती पाहिल्या तर त्यांच्या अंगावरचे वस्त्र आपल्याला एका खांद्यावरून अलगद दुसऱ्या खांद्यावर लयीमध्ये पसरले आहे, हे लक्षात येईल. एवढेच नव्हे तर त्यांचे डोळे कमलपुष्पासारखे व ओठांची रचना फुलासारखी केलेली दिसते. यामुळे आपले लक्ष बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्याकडे आकर्षिले जाते, म्हणजे ज्या शांत भावनेने भगवान बुद्ध बसले आहेत तीच भावना आपल्यापर्यंत पोहोचते.

पाश्चिमात्य शिल्पप्रकारात सर्वच कोरीवपणा आणि हुबेहूब चित्रण या पद्धतीमुळे एके ठिकाणी लक्ष केंद्रित करता येत नाही. अर्थात असे सर्व शिल्पांच्या बाबतीत म्हणता येणार नाही, पण भारतीय आणि पाश्चिमात्य शिल्पकामात मुळातच विचारधारणेत  वेगळेपण आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे.

बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करायचा म्हटला तर वेरूळ येथील रावणाच्या गर्वहरणाचे शिल्प! रावणाची उभे राहायची  पद्धत, संपूर्ण भार त्याच्या शरीरावर आलेला आहे, त्यामुळे पायाचा एक अंगठा थोडा दुमडलेला असून त्या भाराने चेहऱ्यावर दिसणारा त्रास, कष्ट  इथपर्यंतचे भाव आपण शिल्पांमध्ये साकारू शकतो हे त्या शिल्पकारांनी दाखवून दिले आहे.

हंपी येथील विठ्ठल मंदिराच्या खांबातून  सप्तसूर ऐकू येतील अशी किमया केलेली आहे. त्यामध्ये दगडांमधील पोकळीचा पूर्ण अभ्यास करून त्यावर किती जोराने आघात केला असता कुठला सूर निघेल याचाही शास्त्रोक्त अभ्यास कलाकाराने केलेला आहे, हे जाणवत राहते.

अनेक शतकांपासून आपल्या देशात आणि पाश्चिमात्य देशांतही ज्ञात-अज्ञात शिल्पकारांनी अत्यंत कौशल्याने शिल्पकला आपल्यासमोर सादर केली आहे. त्यातील संदर्भ, विषय त्या त्या काळातल्या सांस्कृतिक कल्पनांप्रमाणे बदलत राहिले. आज त्या शिल्पांचा आनंद घेताना मात्र त्या काळाचे भान ठेवून त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या