मांडणी शिल्प

शरद तरडे
सोमवार, 20 सप्टेंबर 2021


चित्र-भान

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विचारांच्या कलाकारांनी प्रेक्षकांना वेगळ्या त्रिमिती पद्धतीचा वापर करून मांडणी शिल्प शैली (इन्स्टॉलेशन आर्ट) तयार केली. मांडणी शिल्पे बहुधा प्रदर्शन, हॉल, संग्रहालये आणि व्यावसायिक केंद्रे येथे साकारण्यात आली. यासाठी अनेक टिकाऊ, टाकाऊ वस्तू, पेपर, कापड, लोखंडी वस्तू यांची विशिष्ट रचनेत बांधणी करून अशी शिल्पे तयार केली गेली.

मांडणी शिल्प शैलीचा प्रारंभ योयोई कोसामा व लुईस बुर्ज आईस या आधुनिक विचारांच्या कलाकारांनी केला. त्यांनी १९६५मध्ये ‘इन्फिनिटी मिरर रूम’ ही संकल्पना तयार केली. एका खोलीत अनेक काचेच्या आरशांचा वापर करून त्यांनी अनेक प्रतिमा निर्माण केल्या. यात अनेकदा एकाच वेळी निर्माण करणाऱ्या प्रतिमा प्रेक्षकांसमोर साकार होताना ते अचंबित होत. त्यामध्ये एका खोलीमध्ये कापडाच्या हजारो छोट्या उशा तयार करून जमिनीवर ठेवल्या. त्या खोलीमध्ये भरण्यात आलेल्या वस्तू आरशांमध्ये अनेक प्रतिमा निर्माण करीत असत आणि या प्रतिमांचा प्रेक्षकांच्या मनावर वेगळाच परिणाम दिसत असे. आपण एखाद्या स्वप्नील जगाचा एक भाग झालो आहोत, आपणाला बाहेर पडता येणार नाही, अशीच भावना निर्माण होऊ लागली. हा अनुभव घेणे हीच खूप वेगळेपणाची गोष्ट प्रेक्षकांसाठी ठरली. तुम्ही ‘एंटर द ड्रॅगन’ हा इंग्रजी चित्रपट पाहिला असेल, तर त्यातील शेवटच्या एका दृश्यात अशाच प्रकारच्या काचेच्या आरशांचा वापर करून अनेक प्रतिमा तयार झालेल्या तुमच्या लक्षात असतील.

सन १९६०पासून मांडणी शिल्पे हा प्रकार आधुनिक कलेमध्ये पाय रोवून उभा आहे. अनेक प्रकारच्या वस्तू, जसे लोखंड, लाकूड, प्लास्टिकचे तुकडे, वाया गेलेल्या वस्तू, टाकून दिलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोजच्या वापरातील वस्तू, कापडाचे तुकडे अशा इतर अनेक वस्तूंची कलात्मकरीतीने उभारणी करून त्याचे प्रदर्शन करणे असे प्रयोग अनेक मोठ्या शहरात सुरू केले गेले. हा प्रकार पर्यावरणपूरक म्हणूनही पहिला गेला.

काही ठिकाणी इन्स्टॉलेशन एवढ्या मोठ्या आकारात केले गेले, की त्यामधून रसिक फिरू शकतो आणि प्रत्येक वेळा वेगळा कला अनुभव घेऊ शकतो; हाच या कला प्रकारचा मूळ उद्देश होता.

अगदी एखादी रिकामी खोली, त्यात पसरलेली शांतता अनुभवणे हादेखील 

वेगळा अनुभव होऊ शकतो अथवा एखाद्या मोठ्या हॉलमध्ये फक्त उघडझाप करणारा दिवा आपल्याला वेगळा अनुभव देऊ शकतो; या गोष्टीचा वापरही ह्या कला प्रकार केला गेला.

 त्याच कालावधीत ‘आर्ट इंटरव्हेंशन’ नावाचा प्रकार उदयास आला. या प्रकारात कोणत्याही रचनेमध्ये संवाद साधण्याची कला असते असे म्हणता येईल. त्यात वापरलेली वस्तू म्हणजे एखादी कलाकृती असेल किंवा एखादा प्रेक्षकही त्यात भाग घेत असेल अथवा एखादी सार्वजनिक जागाही असेल. कलाकृती आणि प्रेक्षक या दोघांमध्ये जो कलात्मक संवाद असेल, त्याची मांडणी या प्रकारात केली जाते. एखाद्या फुटपाथवर पेंटिंगची रिकामी फ्रेम ठेवली गेली असेल व त्यात प्रत्यक्ष माणूस कुठल्यातरी अवस्थेत स्तब्ध होऊन बसला असेल, तर ती सर्व रचना चित्र म्हणून बघणे, त्यातील भाव, संवाद   समजून घेणे हेच या प्रकारचे मुख्य ध्येय होते. गॅलरीच्या बाहेरच्या जगात कला विस्तार करणे आणि त्यासाठी कुठल्याही आस्थापनेची किंवा विशिष्ट जागेची गरज नसून कुठेही ती सादर करता येते, असा या मागचा विचार होता.

अनेक कलाकारांना एकत्र घेऊन त्यांच्या रचना, कलाकृती, विचार लोकांपुढे मांडणे यासाठी जगभर ‘आर्ट बिनाले’ची सुरुवात झाली. पहिला बिनाले व्हेनिस येथे १८८५मध्ये चालू झाला. या प्रकारचा कला महोत्सव भारतात ‘कोची बिनाले’ या नावाने २०१२पासून सुरू झाला. हा महोत्सव बोस कृष्णनामाचारी आणि रियाज कामु या दोघांनी चालू केला. दर दोन वर्षांनी हा उपक्रम केरळमधील कोचीमध्ये भरतो. तसेच तो अन्य शहरांतही सुरू झाला आहे. कलेतील सर्व प्रकारच्या कलाकृती येथे एकत्र बघण्यास मिळतात. या महोत्सवानिमित्त हे शहर संपूर्णपणे रंगवण्यात येते. नव्या जुन्या इमारती, फुटपाथ, भिंती यावर अनेक चित्रकार अथक परिश्रमाने सुंदर कलाकृती रंगवतात. त्यामुळे सर्व शहरच चित्रमय होऊन  जाते. 

चित्र-शिल्प, मांडणीशिल्प, कलाविषयक फिल्मचे या महोत्सवात प्रदर्शन होत असते. या महोत्सवामुळे नवे जुने कलाकार एकत्र येऊन नव्या कलाकृती सादर करतात, त्यामुळे रसिकांना कलेची मेजवानीच मिळते असे म्हणता येईल.

मांडणी चित्र शैलीचा वापर भारतामध्ये होऊ लागलेला आहे आणि कलाकारांनी या मांडणी शिल्पाची उपयुक्तता समजून घेऊन प्रदर्शनात त्याचा वापर केला आहे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे परभणी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले कुलदीप कारेगावकर. त्यांनी २०१८मध्ये जहांगीर गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात आपल्या शेतीवरचे प्रेम मांडणी शिल्पातून दाखवून दिले होते. त्यांनी हाताने शेकडो पोती एकत्र शिवून त्यांच्या वापर जमिनीवर प्रतीकात्मक शेतीचा बांध तयार करण्यासाठी केला होता. त्याच्या बाजूला शेतातली काळी माती आणून पसरली होती. शिल्पाच्या बाजूला मोठा आरसा लावल्यामुळे आपण प्रचंड मोठ्या शेतात एकटे उभे आहोत अशी भावना प्रेक्षकांची होत होती. हा एकटेपणाचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. त्याचा परिणाम आजही माझ्या मनावर कोरला गेला आहे. त्यात त्यांनी समोरच्या बाजूस मोठा टीव्ही स्क्रीन  लावला होता. त्यावर हिरवेगार भरलेली शेती, माळरान, उजाड जमीन, विविध रंगांची माती, उघडे पडलेले डोंगर अशी शेतीशी निगडित अनेक चित्रे डोळ्यासमोरून सारखी सरकत होती. या मांडणी शिल्पाचा संपूर्ण परिणाम प्रेक्षकांच्या मनावर वेगळा होता हे मात्र नक्की.

 एका चार मजली मोठ्या फर्निचरच्या दुकानात याच मांडणी शिल्पाचा आम्ही वापर केला होता. त्यासाठी आम्ही त्याच दुकानातील नको असलेल्या अनेक लाकडी खुर्च्यांचा वापर लिफ्टच्या रिकाम्या जागेत केला होता. अनेक खुर्च्या पाहिजे तशा आकारात कापून त्या एकमेकांवर चार मजल्यांपर्यंत बसविण्यात आल्या आणि त्यांना पांढराशुभ्र रंग देऊन त्यावर प्रकाश झोत सोडण्यात आले. यामुळे तो भाग प्रकाश सावल्यांनी खूप वेगळा दिसू लागला. जणू एखादी शिल्पाकृती तेथे बसवली आहे आणि त्यातून सावल्यांचा खेळ प्रत्येक मजल्यावरून वेगळा दिसत आहे, असेच वाटत होते. असे नवीन कला प्रयोग अनेक ठिकाणी चालू आहेत आणि असतात. 

आपण या ठिकाणी भेट देऊन त्याचा आनंद घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपली 

कलादृष्टी नव्याने तयार होण्यास नक्कीच मदत होईल.

संबंधित बातम्या