‘खण’खणीत फॅशन

सोनिया उपासनी
सोमवार, 16 मार्च 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

खणाचे कापड म्हटले, की सुंदर पारंपरिक परकर पोलके डोळ्यासमोर येते. लहान मुलींना तर किती शोभून दिसते. धारवाडी खणाच्या कापडाचा वापर फार पूर्वीपासून महाराष्ट्रात होत आला आहे. बायका ब्लाऊज शिवायला खण वापरायच्या, नऊवारी असो किंवा सहावारी; मिक्स मॅच करून घालायची फॅशन फार पूर्वीपण होती. पूर्वी खेड्यातील बायका खणाची चोळी वापरायच्या. काळ बदलत गेला तशी फॅशनही विविध प्रकारे बदलत गेली. पण धारवाडी खण कधीच आऊटडेटेड झाला नाही. 

  • फॅशनप्रेमींनी प्लेन खण घेऊन त्यावर नक्षीकाम करून किंवा कशिदा काम करून सुंदर डिझाईनर लुक दिला. वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज मिक्स मॅच करून पुन्हा वापरात येऊ लागले. एवढेच नव्हे तर खणाच्या साड्याही लगेच ट्रेंडमध्ये आल्या. प्लेन साड्यांचे नूतनीकरण, खणाची बॉर्डर लावून केले गेले. पाहिजे त्या रंगाचे खणाचे कापड घेऊन, त्यावर सुंदर बॉर्डर किंवा एम्ब्रॉयडरी करून सुरेख डिझाईनर साडी तयार केली गेली. 
  • पारंपरिक फॅशनमध्ये धारवाडी खणाचे विविध प्रकार येऊ लागले. फॅशन डिझाईनर्सनी त्या कापडाचे स्टायलिश ब्लाऊज, कुर्ती आणि परकर डिझाईन केले. 
  • खणाच्या विविध वस्तू जसे, पर्सेस, बटवा, ज्वेलरी बॉक्स, स्लिंग बॅग, मोबाईल पाउच, साडी कव्हर, ब्लाऊज कव्हर इत्यादी बऱ्याच गोष्टी फॅशनमध्ये आहेत आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. 
  • इंडोवेस्टर्न ड्रेसेसमध्ये खणाचा वापर करून स्टायलिश ड्रेस थेट इंटरनॅशनल लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर केला गेला.
  • आपल्या या पारंपरिक खणाचा वापर इथपर्यंतच सीमित नाही राहिला, तर त्यापासून खणप्रेमींनी सुंदर ज्वेलरी डिझाईन केल्या. नेकलेस, कडे, पेंडंट इत्यादींची अप्रतिम डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत. 
  • खणाच्या फाईल्स आणि फोल्डर्सचे डिझाईनसुद्धा ट्रेंडमध्ये आहे. होम डेकोरमध्ये खणाचे कुशन कव्हर्स, टेबल मॅट आणि रनर, दारावरचे तोरण, एवढेच नाही तर आकाशकंदीलसुद्धा अतिशय सुरेख दिसतात.

संबंधित बातम्या