थंडीतही दिसा स्टायलिश!
स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार...
याविषयी जाणून घेऊया!
हिवाळ्याचा ऋतू लग्नकार्य व इतर समारंभांसाठीही खूप सोयीचा मानला जातो. अशावेळेस सर्वात मोठी समस्या उद्भवते ती ‘कपडे कुठले वापरायचे?’ कुठल्याही प्रसंगाला आपण कितीही नटून थटून तयार झालो, कितीही महागडे कपडे घातले, तरी त्यावर तोच स्वेटर अथवा तीच शाल घेतल्याने चांगला स्टायलिश लुक झाकला जातो. इतरवेळीसुद्धा प्रश्न पडतो, थंडीपासून बचावासाठी स्वेटर, तीच शाल, तोच मफलर अथवा स्कार्फ परत परत किती वेळा वापरायचा? सगळ्यांनाच इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे असते. तर या लेखात पाहूया, की अवास्तव खर्च न करता, थोडी जमवाजमव करून हिवाळ्यातसुद्धा स्वतःला कसा स्टायलिश लुक देता येईल व इतरांपेक्षा थोडे हटके कसे दिसता येईल.
- ज्या स्त्रिया साडी परिधान करतात त्यांच्यासाठी या ऋतूत जुटच्या साड्या व त्यावर स्टायलिश कॉट्स वूलचे ब्लाऊज, तसेच दैनंदिन साड्यांवर वूलनचे कोपरापर्यंत अथवा फुल स्लीव्ज ब्लाऊज थंडीपासून बचावही करतात व एक वेगळा लुकपण देतात.
- कुर्तीजमध्येपण आजकाल कॉट्स वूल व लोकरीने विणलेले असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. थंडी कमी असेल तर हाफ बाह्यांचे व्ही नेक शॉर्ट लेन्थ कुर्ते, थंडी जास्त असेल तर फुल स्लीव्जचे टरटल नेक फुल लेंथ कुर्ते व त्याखाली घालायला वूलनचेच लेगिंग्स अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
- जीन्सवर घालायला वूलन क्रॉप टॉपचे पर्याय आहेत. वूलन क्रॉप टॉप व्यतिरिक्त जीन्सवर कॉट्स वूलच्या ट्यूब टॉपवर लेदर जॅकेट वापरू शकता, फ्लॅनेल अथवा फरची जॅकेट्सपण अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. तेही वापरू शकता, ज्याने एक वेगळाच बोल्ड अँड ब्यूटिफुल लुक येतो.
- स्कर्ट घालायचा झाला, तर वूलन क्रोशाने विणलेले स्कर्ट फॅशनमध्ये आहेत. थंडीपासून बचावासाठी त्याखाली वॉर्मरचे लेगिंग घालून त्यावर फुल स्लीव्ज टॉप आणि स्लीवलेस क्विल्टेड जॅकेट घालू शकता.
- पेहरावाला साजेल असे फुटवेअर, म्हणजे ज्यात पाय बंद राहतील अशा मोजड्या, जयपुरी जुती, फरचे अँकल लेंथ शूज घातले की संपूर्ण पेहरावाला एक वेगळाच उठाव येतो.
- फ्लॅनेल अथवा कॉट्स वूलच्या धोतीसुद्धा हल्ली फॅशनमध्ये आहेत. पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा वापर हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी करू शकतात. या धोतीवर शॉर्ट कुर्ता आणि कॉट्स वूलचे क्विल्टेड जॅकेट घातले की मस्त इंडोवेस्टर्न लुक मिरवता येतो.
- स्टाइल स्टेटमेंट वाढवायला वूलन स्कार्फ कुठल्याही वेस्टर्न अथवा इंडोवेस्टर्न पेहरावावर वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नॉट्स वापरून घालता येतो.
चला तर मग, तयार होऊ या या गुलाबी हवेत एका आगळ्यावेगळ्या लुकसाठी...!