व्हेकेशनची फॅशन

सोनिया उपासनी
सोमवार, 27 जानेवारी 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

रुटीन सोडून तणाव कमी करण्यासाठी वेगळं काहीतरी सगळ्यांनाच हवं असतं. या वेगळ्या काहीतरीमध्ये छोटीशी सहल, अथवा गडावर एखादा विकएंड, अथवा एखादी मोठी सुटी प्लॅन केली जाते. सुटीचं प्लॅनिंग झाल्यावर आपण हे कपडे लागतील, हे पण घेऊया, याची गरज पडू शकेल असं करत कितीतरी अनावश्यक गोष्टी गोळा करतो व बॅगचं वजन वाढवतो. या लेखात आपण पाहूया, की पर्यटनस्थळी जाताना कुठले आवश्यक कपडे बरोबर घ्यायचे, जेणेकरून ओझं वाहण्याच्या त्रासापासून सुटका तर होईलच, शिवाय स्टायलिश आणि फॅशनेबल दिसून छान मिरवताही येईल. 

कुठल्याही समुद्रकाठी सुटी प्लॅन केली असेल, तर जास्तीत जास्त वापर हा पेस्टल कलरचा करायचा. कारण समुद्राकाठी घाम येण्याचं प्रमाण अधिक असतं व पेस्टल आणि पांढरा रंग सूर्याची किरणं परावर्तित करून शरीराचं तापमान थंड ठेवतात. एक गोष्ट कटाक्षानं लक्षात ठेवावी, की कुठलेही नवीन कपडे घेऊ नये. हलका निळा, बेबी पिंक, पांढरा, हलका पिवळा, अबोली, पिस्ता या रंगांचे शर्ट, टॉप, कुर्ते हे काफ लेंथ पँटवर उठून दिसतात. सुती फ्रॉक, वनपीस, शॉर्ट्स, गंजी, स्लीवलेस टीशर्ट, लूज पँट, फ्लोरल प्रिंट हे सर्व वयोगटातील स्त्री व पुरुषांना उठून दिसेल. फुटवेअर रबरचे व पाय खुले ठेवणारे, फ्लॅट सोलचे वापरावेत. जेणेकरून वाळू पायात गेल्यास ती वाळूत रुतणार नाही अथवा पादत्राणं ओली झाल्यास सुकवायला त्रास होणार नाही. गडावर सहलीला जाताना सुती, सैल व कम्फरटेबल कपडे निवडावेत. छोट्याशा सॅकमध्ये आवश्यक तेवढंच सामान बाळगावं, जेणेकरून आपल्याच सामानाचं आपल्यालाच ओझं वाटू नये. बूट अथवा चप्पल जाड सोलची वापरावी, म्हणजे खडकाळ जमिनीवरून जाताना पायास इजा होणार नाही. 

ज्या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणचं वातावरण जर सामान्य असेल तर जॉर्जेट, क्रेप, सुती, सॅटीन यापैकी सर्व कापडाचे प्रकार वापरल्यास हरकत नाही. मध्यम व वॉर्म कलर्स या वातावरणात सर्व वयोगटातील लोकांना उठून दिसतात. प्रत्येकांनं आपल्या आवडीनुसार व शरीरयष्टीप्रमाणं कपडे निवडावेत. 

थंड हवेच्या ठिकाणी जर सुटी प्लॅन केली, तर सगळ्यात जास्त ओझं हे जाडजूड स्वेटर व शालींचं होतं. याला पर्याय म्हणजे अत्यंत पातळ व उबदार वॉर्मर्स. हे सर्व वयोगटातील स्त्री, पुरुषांसाठी बाजारपेठेत उपलब्ध असतात. वॉर्मर्स घातल्यावर त्यावर साडी, जीन्स, स्कर्ट, मॅक्सी, शॉर्ट ड्रेस हे सर्व सुटसुटीतपणे घालू शकता. शालीऐवजी स्टायलिश लुक यायला पाँचो ओढू शकता. थंड हवेच्या ठिकाणी तुम्हाला जर बोल्ड लुक हवा असेल, तर मिनी स्कर्ट आणि टॉप किंवा शॉर्ट डिंगरीबरोबर उबदार स्लॅक्स आणि वूलन निटेड टॉप घालू शकता. ‘मस्ट हॅव’ यादीत विविध रंगांच्या व आकाराच्या कानटोप्या, हात मोजे, पायमोजे, विविध रंगांचे स्कार्फ व मफलर, स्टायलिश व लाइट वेट जॅकेट्स, जाड पँट, जीन्स, अथवा लेदर पँट व गडद रंगांचे टॉप्स, कुर्ते, ब्लाऊज ज्यांनी उबदारपणा टिकून राहील या गोष्टी हव्याच. शॉर्ट ड्रेस असेल तर बूट नी-लेंथ व लेदरचे वापरावेत. इतर ड्रेसेसवर अशीच पादत्राणे सिलेक्ट करावीत, ज्यांनी पाय उबदार व बंद राहतील. 

पर्यटन स्थळ कुठलंही असो सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे, फुटवेअरवर कुठल्याही प्रकारचे प्रयोग करू नयेत. कोरे बूट, चप्पल, मोजडी, स्लिपर अजिबात वापरू नयेत. नेहमी काही काळ वापरलेली पादत्राणंच बरोबर घ्यावीत.   

संबंधित बातम्या