ट्रेंडी ब्लाऊजची क्रेझ

सोनिया उपासनी
सोमवार, 2 मार्च 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... याविषयी जाणून घेऊया!
 

स्त्रियांचा भारतीय पारंपरिक पेहराव म्हटला, की फक्त साडी अथवा घागरा नजरेपुढे येतो. अगदी पुरातन काळापासून या पेहरावाला स्त्रियांकडून विशेष पसंती व प्राधान्य दिले गेले. या पारंपरिक पेहरावाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो त्यावर घातला जाणारा ब्लाऊज. जर मनापासून साडी नेसायला आवडत असेल, तर वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्नचे ब्लाऊज घालायलाही तितकेच आवडते. 

ब्लाऊज विकत घेण्याआधी अथवा शिवण्याआधी त्याची लांबी, गळ्याचा पॅटर्न, बाह्यांची लांबी आणि पॅटर्न नीट लक्षात घेतले, तर हा ब्लाऊज अगदी साध्या साडीलासुद्धा एक ग्लॅमरस लुक देऊन जातो.

आजकाल सिनेतारकांपासून सर्वसाधारण स्त्रियांपर्यंत सगळ्यांमध्येच मोठ्या गळ्याचे अथवा बॅकलेस ब्लाऊज घालायची क्रेझ आहे. फॅशन करताना काही गोष्टी लक्षात न घेतल्यामुळे मोठे गळे बरेचदा खांद्यावरून उतरतात. फॅशन म्हणून मोठे गळे शिवून तर घेतो, पण ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्ट नसतो. खालील काही टिप्स लक्षात ठेवल्या, तर या सर्व त्रासापासून बचाव होऊ शकतो.

  • सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी टिप म्हणजे योग्य इनरवेअरची निवड होय.
  • ब्लाऊजचा मोठा गळा तेव्हाच शोभून दिसतो, जेव्हा तो मानेचा आकार लक्षात घेऊन त्या हिशोबाने शिवला जातो.
  • मानेची रुंदी व लांबी कमी असेल, तर ‘व्ही’ गळा जास्त उठून दिसेल व मान उंच दिसेल.
  • मानेचा घेर जाड असेल, तर चौकोनी मोठे गळे जास्त उठावदार दिसतील. 
  • सिल्क, कॉटन सिल्क, वेलवेटच्या कापडात बॅकलेस अथवा मोठे गळे शिवले, तर अधिक खुलून दिसतील.
  • मोठे गळे घालण्याआधी पाठीला आणि मानेला पार्लरमध्ये जाऊन योग्यरीतीने स्वच्छ करावे, म्हणजे त्यांचा रंग बाकीच्या स्किन टोनला मॅच होईल.
  • मोठ्या गळ्यामध्ये स्किन एक्सपोजर जास्त होते, त्यामुळे ब्लाऊजला लावण्यात येणाऱ्या ॲक्सेसरीज इथे महत्त्वाच्या असतात. या ॲक्सेसरीज निवडताना त्वचेला कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी.

तुमची उंची, बॉडी फ्रेम व मानेची लांबी आणि रुंदी आणि वर दिलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुमच्या डिझाइनरला ब्लाऊज शिवायला सांगितले, तर तुम्ही ब्लाऊजमधले कुठलेही डिझाईन आणि पॅटर्न सहज कॅरी करू शकाल. 

संबंधित बातम्या