सदाबहार पोलका डॉट्स

सोनिया उपासनी
सोमवार, 13 एप्रिल 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... याविषयी जाणून घेऊया!
 

भारतात फॅशनचा ट्रेंड परदेशाप्रमाणे कधीच रॅम्पवर असणाऱ्या फॅशननुसार ठरला नाही. आपल्याकडे रॅम्पवर मॉडेल काय घालतात, यापेक्षा सिनेमातले नट आणि नट्या काय घालतात याचेच अनुकरण जास्त होत गेले. फॅशन जरी दर सहा महिन्यांनी बदलत असली, तरी सत्तरच्या दशकातील कपड्यांची स्टाइल व ॲक्सेसरीजची फॅशन कधीच लोकांच्या मनातून उतरली नाही. 

ही सदाबहार फॅशन परत ट्रेंडमध्ये आलेली दिसतेय. अर्धा चेहरा झाकणारे मोठे गोलाकार गॉगल्स लोकप्रिय आहेत. स्त्री वर्गाची पसंती विशेष करून मागे गाठ घातलेले चोळी स्टाइल ब्लाऊज, कंचुकी स्टाइल ब्लाऊज, फुग्याच्या मोठ्या बाह्या असलेले वन पीस ड्रेस, ब्लाऊज आणि कुर्ते, बेल स्लीव असलेले आणि बलून टॉप्स व त्या खाली स्कर्ट, जंप सुट्स, मिनी ड्रेसेस विथ अँकल लेंथ लेगिंग्स, कॉलरवाले ब्लाऊज, शिफॉन साडी या कपड्यांना मिळते आहे. 

पुरुषांच्या फॅशनचा विचार केला, तर त्या दशकातले प्रिंटेड शर्ट्स, स्ट्रेट अथवा बूट कट ट्राउझर, कैरीच्या आकाराचे प्रिंट्स, मोठे फ्लोरल प्रिंटचे शर्ट्स, मोठ्या फ्रेम्सचे सनग्लासेस सध्या अगदी ‘इन थिंग’ आहेत. 

बाकी कुठल्याही प्रकारच्या कपड्यांच्या व ॲक्सेसरीजच्या फॅशन फेरबदलाने येत असल्या, तरी पोलका डॉट्स अथवा ज्या टाइपला आपण सगळे बॉबी प्रिंट्स म्हणून ओळखतो, ते मात्र नेहमीच ट्रेंडमध्ये राहिले. दशक कुठलेही असो पोलका डॉट्स प्रिंटने कायमच फॅशन जगतावर हुकमत गाजवली. ऋतुमान कुठलेही असो, त्यानुसार कॉटन, लिनन, जूट, शिफॉन, जॉर्जेट, कॉट्स वूल, सॅटिन, क्रेप या कपड्यांवर विविध रंगछटेत बारीक अथवा मोठे पोलका डॉट्स कायमच सर्वांच्या पसंतीस उतरले. 

या पोलका डॉट्सचे शर्ट्स, टाय आणि ट्रॅडिशनल कुर्ते पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये मस्ट हॅव लिस्टमध्ये आलेत.

पोलका डॉट्सच्या साड्या, कॉलरचे लाँग स्लीव ब्लाऊज, टॉप्स, कुर्ते, क्रॉप टॉप्स, लेअर्ड स्कर्ट हे सर्व फॅशनप्रेमींच्या सदाबहार आवडीच्या ठरत आल्या आहेत आणि या पुढेही राहतील.

संबंधित बातम्या