ठेवणीतल्या कपड्यांना नवीन झळाळी

सोनिया उपासनी
सोमवार, 27 एप्रिल 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

फॅशन म्हटले की पाहिल्यांदा डोक्यात येते ती विविध रंगी कपड्यांची रेलचेल, त्यावर वापरल्या जाणाऱ्या फॅशन ॲक्सेसरीजनी भरलेली बाजारपेठ, आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसावे यासाठी चाललेली सततची धडपड. त्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये कपडे, दागिने, पर्सेस, फुटवेअर, इतर मॅचिंग ॲक्सेसरीज याचे आपण सतत अपडेशन करत असतो. 

आत्ता सुरू असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसून सुरक्षित राहण्यापलीकडे पर्यायच उरला नाहीये. बरे, आता लॉकडाऊनचे नियम तर पाळायलाच लागणार! मग अशा वेळी घरीच राहून तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबसाठी काय करता येईल हे बघूया.

कॉटन, जॉर्जेट, सॅटिन, क्रेप हे सगळे रोजच्या वापरात येणारे कपडे. ते आपण धुऊन, इस्त्री करून सतत वापरतो. पण सतत न वापरले जाणारे कपडे म्हणजे पार्टी वेअर. ते जरा भरजरी, थोडे भडक, थोडे नाजूक, हेवी फॅब्रिकपासून तयार झालेले असल्यामुळे आपण गरज असेल तेव्हाच कपाटातून बाहेर काढतो. हल्लीचा फॅशन ट्रेंड असा आहे, की प्रत्येक ऑकेजनला नवीन पेहराव घ्यायचा. त्यामुळे जे कपडे आधी खरेदी केलेले आहेत, त्यांची वेळ येईपर्यंत ते बिचारे कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यात अथवा एका कोपऱ्यात साठवणीत जातात. 

तर या लॉकडाऊनच्या तुमच्या वेळामधला थोडा वेळ या सर्व कपाटात एकाकी पडलेल्या कपड्यांना तरतरी आणण्यात दिला, तर या सगळ्या हेवी सिल्क्स आणि भरजरी कपड्यांना एक नवीन झळाळी येईल.

स्त्रियांचे अथवा पुरुषांचे सिल्कचे कुर्ते, सिल्कच्या साड्या, दुपट्टे यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते, कारण सिल्क हे नेहमीच घडीमध्ये विटते. योगायोगाने लॉकडाऊन पिरियड हा उन्हाळ्याच्या सुरुवातीला आलाय. त्यामुळे सर्व सिल्कचे कपडे कपाटातून बाहेर काढून आपल्या घरात ज्या जागी कडकडीत ऊन येते, तिथे घडी उघडून किमान अर्धा तास तरी पसरवून ठेवावेत. हे याकरिता, की ठेवणीतल्या सिल्कला उधई लवकर लागते. या उधईचा नायनाट कडकडीत उन्हात होतो. दोन ते तीन दिवस कडक ऊन दाखवल्यानंतर सर्व कपडे हलकी इस्त्री करून घडी बदलून ठेवावेत. जर उन्हात ठेवूनही सिल्कला कुबट ठेवणीतला वास येत असेल, तर हे सिल्क एक बादली कोमट पाण्यात एक कप पांढरे व्हिनेगर घालून थोडा वेळ भिजवून ठेवावे व नंतर पाच ते सहा वेळा व्हिनेगरचा वास जाईपर्यंत सध्या पाण्याने धुऊन घ्यावे. न पिळता झटकून सावलीत वाळत घालावे. ओले सिल्क उन्हात वाळत घालू नये. या व्हिनेगरमुळे सिल्कच्या कपड्यांना वेगळीच झळाळी येते. 

सर्व भरजरी व वर्क असलेले कपडे कोमट पाण्यात लिक्विड सोप टाकून धुऊन घ्यावेत व कडकडीत वाळवून हलकी इस्त्री करून ठेवावे. यामुळे कपड्यांचे आयुष्य वाढते व चमकपण येते. सिल्क व भरजरी कपडे मऊ तलम कापडात गुंडाळून ठेवले, तर बरीच वर्षे आपण वापरू शकतो. 

ज्याप्रमाणे कपड्यांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे सोन्याचांदीच्या व ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचीपण काळजी घेऊ शकतो. तुमच्या रोजच्या घालायच्या सोन्याच्या दागिन्यांना, जर हळदीपासून तयार केलेल्या कोरड्या कुंकूवाने हलक्या हाताने घासून नंतर मऊ तलम कापडाने पुसून काढले, तर नव्या दागिन्याप्रमाणे चकाकू लागतील. त्याचप्रमाणे चांदी व इतर फॅशन ज्वेलरीला टूथपावडर अथवा टूथपेस्टने घासून काढले अथवा बेकिंग सोड्याच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवून काही वेळाने नीट धुऊन व पुसून घेतले तर नवीन दागिन्याप्रमाणे लकाकी येते. 

तर चला सुरुवात करूया आपल्या वॉर्डरोब रिअरेंजमेंटला... सर्व फॅशनप्रेमींनो, चकाकणारे सिल्क्स आणि लखलखणाऱ्या ॲक्सेसरीज घालून घरच्या घरीच निरनिराळे फोटो सेशन करा व सोशल मीडियावर अपडेटेड राहा आणि आपल्या सर्व फ्रेंडसर्कलकडून आणि नातेवाईकांकडून वाहवा लुटा. कोण म्हटते की लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी फॅशन करता येत नाही!

संबंधित बातम्या