बदलता कॉर्पोरेट लुक

सोनिया उपासनी
बुधवार, 24 जून 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

फॅशन जगत कितीही पुढारलेले असले, तरी काही वर्षांपूर्वी कॉर्पोरेट लुकमध्ये काही फारसे वैविध्य नव्हते. बिझनेस पर्सन्स आणि त्यांचे एम्प्लॉईज ठराविक ड्रेस कोड ठराविक मीटिंग्ससाठी वापरायचे. पुरुषांसाठी डार्क आणि लाइट रंगांमध्ये ‘क्लासिक टेलर्ड सूट्स’ आणि महिलांना ‘निटली प्लीटेड फॉर्मल प्लेन साडी विथ नाइस हेअरडू’ एवढाच होता. 

थोडा काळ सरला तसे महिलांनी पुरुषांचे अनुकरण करून क्लासिक सूट्स घालायला सुरुवात केली. हे फक्त मीटिंग्सच्या वेळेत एक वेगळी छाप पाडण्यासाठी आणि क्लायेंटवर छान इंम्प्रेशन जमवून बिझनेस वाढवण्यासाठी होते.

आयटी सेक्टरचे या जगात पदार्पण झाले आणि संपूर्ण कॉर्पोरेट जगतात बदलाव आला, तशीच कॉर्पोरेट फॅशनही बदलली. आता हा लुक मीटिंग्सपुरता मर्यादित न राहता रुटीनचा भाग झाला.

पुरुषांच्या बो-टाय थ्री पीस सूटची जागा स्टायलिश ब्लेझर्सने आणि फॉर्मल शर्टची जागा टरटल नेक, हाय नेक टी-शर्टने घेतली. फॉर्मल ब्लॅक शूजची जागा आऊटफिटला साजेशा मोकाजीन्सने आणि विविध रंगी लेदर शूजने घेतली. स्कार्फ हा ‘इन थिंग’ झाला. लूज ट्राउझर्सला नॅरो बॉटम फॉर्मल पँटने रिप्लेस केले. अगदी घड्याळांमध्येही विविधता आली.

जसे पुरुषांसाठी हे फॅशन विश्‍व बदलले, त्याहूनही अधिक पटीने बदलले ते महिला वर्गासाठी. फॉर्मल साडी आणि क्लासिक सूटची जागा विविध प्रकारच्या स्कर्ट्स, ट्राउझर्स, नॅरो बॉटम पँट, जंपसुट्स, वन पीस सुट्स, ब्लेझर्सनी घेतली. लाँग अँकल लेंथ फॉर्मल स्कर्टवर व्हाइट ब्लाऊज आणि ब्लेझर, शॉर्ट नी लेंथ स्कर्टवर फॉर्मल शर्ट, विविध रंगांमधले आणि स्टाइल्सचे जंपसुट्स, नॅरो बॉटम ट्राउझर्सवर कॉन्ट्रास्ट ब्लेझर आणि इन्फॉर्मल शर्ट या शैलींनी फॅशन जगतात आपला पाया रोवला. 

या सर्व पेहरावांसाठी डार्क व पेस्टल शेड हे दोन्ही पसंतीस उतरू लागले. टिपिकल काळ्या हँडबॅगची जागा विविध रंगी पेहरावाला मॅचिंग होणाऱ्या लेदर बॅग्सनी घेतली. फ्लॅट बॅलेरिनाजला मीडिअम अथवा हाय हिल्सनी रिप्लेस केले. आऊटफिटला मॅचिंग अशा स्टोल्सनी वॉर्डरोबमध्ये आपली जागा केली. कापड्यांबरोबरच हेअरडूही बदलला. हाय बनची जागा नीट सेट केलेल्या कर्ल्स आणि पोकर स्ट्रेट मोकळ्या सोडलेल्या केसांनी घेतली. 

जसे मागील काही वर्षांत साडीपासून मिनी स्कर्टपर्यंत ही कॉर्पोरेट फॅशन बदलली, तसेच यापुढेही अजून काही बदलाव आले तर नवल वाटू नये! 

संबंधित बातम्या