परंपरेला आधुनिकतेचा टच

सोनिया उपासनी
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... असा हा हिरवळीने नटलेला श्रावण प्रत्येक स्त्रीच्या मनात एक हुरहूर देऊन जातो. सण, व्रतवैकल्ये सगळ्यात जास्त श्रावण महिन्यातच असतात. मग ते शिव आराधनेचे श्रावणी सोमवार असोत अथवा मंगळागौरीची पूजा, नागपंचमीची साग्रसंगीत पूजा असो अथवा नारळी पौर्णिमेच्या सणाला भावाला राखी बांधण्याची लगबग, गोकुळाष्टमीचा उपवास असो वा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारचे हळदीकुंकू... आणि त्यात जर सत्यनारायणाची पूजा घरी करायचे ठरवले, तर मग नटायला आणि सजायला सगळेच सोन्याहून पिवळे!

सगळाच महिना सणांची रेलचेल. हा महिना विशेष असतो, तो सर्व नववधू व उपवर मुलींसाठी. पहिली मंगळागौर, सगळी हौसमौज आणि सगळेच या महिन्यातील पाहिलेवाहिले सण. मग आकर्षणाचे केंद्र हे घरातील नववधू. आजकालची पिढी मॉडर्न. पण घरात जर परंपरा जपणारी वडीलधारी मंडळी असतील, तर सर्वांचा मान राखून कशा प्रकारे तुम्हाला नटता-सजता येईल हे आपण बघणार आहोत. 

साडी, सलवार सूट, घागरा चोळी अथवा लेहेंगा हे त्यांच्या सुटसुटीतपणामुळे आजकालच्या तरुणींची पसंती जरी असली, तरी आपल्या मराठमोळ्या नऊवारीची सर कुठल्याच पेहरावाला नाही. व्रतवैकल्याच्या पूजेला तर नऊवारी हे महावस्त्र मानले जाते. अगदी टिपिकल ब्राह्मणी नऊवारी न नेसता, नेसण्याच्या पद्धतीत जरासा फेरबदल केला, हेअर स्टाइलमध्ये थोडा बदल केला, अगदी टिपिकल लांब हातांचे ब्लाऊज न घालता त्यावर फुग्याच्या बाह्यांचा ब्लाउज, बॅकलेस चोळी, स्लीव्हलेस ब्लाऊज विथ या जुडा चोटी हे पण एकदम हटके आणि मॉडर्न लुक देतात. 

मुलींनी जर अशा फंक्शन्सना साडी नेसायची ठरवली, तर साडी ही अशाच प्रकारे अगदी ट्रॅडिशनल प्रकारे ड्रेप न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने नेसून अगदी स्टायलिश लुक देता येतो. प्रिन्सेस कट वेस्ट लेंथ ब्लाऊज आणि आपली रोजची आवडीची जिन्स अथवा कुठल्याही सिल्क पँटवर साडी ड्रेप केली, तर आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख मेळ दिसून येतो. त्याचप्रमाणे शॉर्ट ड्रेसवर खादी साडीचे ड्रेपिंग अगदी खुलून दिसते. धोती स्टाइल साडी ड्रेप ही आजकाल सर्व फंक्शन्सना आवडीने तरुणींकडून परिधान केली जाते. अजून एक ट्रेंड हल्ली खूप चलनात आहे, तो म्हणजे लाँग भरजरी कुर्त्यावर सटल पेस्टल सिल्क साडी नेसणे. 

हे सगळे पेहराव निवडताना आणि स्वतःला स्टाइल करताना अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, की यावर सर्व ॲक्सेसरीज या इंडोवेस्टर्न असाव्यात, जेणेकरून हा पारंपरिक फ्युजन लुक परफेक्ट दिसेल. 

परंपरेला थोडा आधुनिक लुक देऊन एक आगळा वेगळा स्टायलिश लुक दिला, तर सणासुदीला कोणाचे मन मोडणे नको. घरातील वडीलधारी मंडळीही खूश आणि घरातील तरुण मंडळीही खूश!

संबंधित बातम्या