बंध बांधणीचे

सोनिया उपासनी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

फॅशनच्या चंदेरी दुनियेत असे अनेक प्रकार आहेत, जे एव्हर ग्रीन आहेत आणि कधीच आऊटडेटेड होत नाहीत. त्यातलाच एक अत्यंत सुरेख आणि मन मोहवणारा प्रकार म्हणजे ‘टाय अँड डाय’, ज्याला आपण बांधणी अथवा बंधेज म्हणून ओळखतो. वायव्य आणि पश्चिम भारत बांधणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. इथे बांधणी कारागिरांची गावेच्या गावे वसली आहेत, जिथे हा प्रकार तयार होऊन संपूर्ण भारतात व जगात एक्स्पोर्ट केला जातो. यात मुख्यत्वे राजस्थान आणि गुजरात यांचा समावेश आहे, कारण या राज्यांचा पारंपरिक पेहरावच बांधणीचा आहे. कालांतराने या दोन प्रदेशांमधून बाहेर पडून बांधणीने बराच लांबचा पल्ला गाठला. भारताप्रमाणेच या कलेचा वापर दक्षिण पूर्व आशियामधील विविध देशांमध्ये आढळून येतो. त्यातलेच एक जपान, तिथे हा बांधणी प्रकार शिबोरी म्हणून प्रख्यात आहे. 

बांधणी हा संस्कृत शब्द ‘बंध’ यातून आला आहे. ‘बंध’ म्हणजे बांधणे. बांधणी व शिबोरी या प्रकारांमध्ये दोन बोटांच्या नखांनी कापडाला चिमटीत धरून आधी धाग्यांनी विविध आकारात व प्रकारात करकचून बांधले जाते व विविध रांगांमध्ये बुडवून रंगवले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी बांधून डिझाइन तयार केले जाते. 

एकडली (एकेरी नॉट), त्रिकुंटी (तीन नॉट), चौबंदी (चार नॉट), डुंगरशाही (पहाडी पॅटर्न), बूँद (डार्क सेंटरच्या अवतीभवती छोटे डॉट पॅटर्न), कोदी (टीयर ड्रॉप शेप) आणि लड्डू जलेबी पॅटर्न, जो भारतीय मिठायांच्या आकारांमधून प्रचलित झाला आहे. लेहरिया, शिकारी आणि मोथरा हे बांधणीचे अजून काही वेगळे प्रकार आहेत. बांधणीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व दिले आहे. सर्व शुभ कार्यांसाठी आणि विशेषकरून नववधूसाठी लाल रंगाच्या वस्त्रांचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाचे महत्त्व निर्माणासाठी आहे, हिरवा रंग सुबत्ता, तर निळा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. म्हणूनच बांधणीमध्ये या चार मुख्य रंगांचे आणि यांच्यापासून तयार झालेल्या दुय्यम रंगांचे विशेष महत्त्व आहे.  

महिला आणि पुरुष वर्गाला साजेल असे विविध रंगी पोशाख, विविध फॅशनमध्ये उपलब्ध आहेत. सिल्क, जॉर्जेट, सॅटिन व कॉटनमध्ये अनंत प्रकारात साड्या, कुर्ते, वन पीस, स्कर्ट, टॉप, जॅकेट्स, स्टोल्स, दुपट्टे, ब्लेझर इत्यादी आणि त्यावर लागणाऱ्या ॲक्सेसरीज, जसे बॅग्ज, क्लचेस, टाय, बटवा, स्लिंग बॅग या विविध रंगांमध्ये आणि फॅशनमध्ये उपलब्ध आहेत. 

लेहेंगा, चनियाचोळी आणि प्लेन साड्यांना लावण्यासाठी बांधणीच्या लेसेसची तर जगभरात विशेष मागणी आहे. या लेसेस सुंदर झरदोसी वर्क केलेल्या, मिरर वर्क केलेल्या, थ्रेड वर्कमध्ये सुरेख रंगांमध्ये उपलब्ध आहेत, ज्या वापरून एका साधारण ड्रेसला छान डिझाइनर लुक देता येतो. 

होम आणि फर्निशिंगमध्येही बांधणी आणि शिबोरीने फॅशन जगतात जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बेडशीट, कंफोर्टर्स, कुशन कव्हर्स, पडदे आणि बरेच काही...

नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तराच्या फॅशनमध्ये बांधणी कधीच आऊटडेटेड नव्हती आणि कधी होणारही नाही.

संबंधित बातम्या