कॉलेज चले हम...
स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार...
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी
दहावीपर्यंत रोज शाळेत युनिफॉर्म घालून जाणाऱ्या शाळकरी मुलामुलींना सगळ्यात मोठी उत्सुकता असते, ती अकरावीत कॉलेजमध्ये जाण्याची. शाळेच्या मोनोटोनस युनिफॉर्ममधून सुटका हवी असते आणि कॉलेजच्या रंगीबेरंगी दुनियेत पदार्पण करण्याची हुरहूरही लागलेली असते. आता कॉलेजला जायचे म्हटले, की कॉलेज वेअर, बॅग्स, शूज आणि काही लागणाऱ्या तत्सम ॲक्सेसरिज आल्याच की!
कॉलेज वेअर असे निवडावे, की जेणेकरून त्यात सुटसुटीतपणा तर हवाच, त्याचबरोबर रोजचे नवीन स्टाइल स्टेटमेंटही हवे. वेगळे दिसण्यासाठी अगदी महागडे नवीन कपडे घ्यायलाच हवेत असे नाही. डेली वेअरलासुद्धा एखाद्या नवीन ॲक्सेसरीबरोबर टीम अप करून एक छान स्टायलिश लुक देता येतो.
सुटसुटीत युनिफॉर्म ते कॉलेज गोअर्सचा नवीन लुक, हा चेंजओव्हर नीट आणि सहज व्हावा, यासाठी काही टिप्स जर फॉलो केल्या तर हटके दिसण्याबरोबरच दिवसभर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सला कम्फरटेबली बसता येऊ शकते.
सुरुवातीला दिवसभर बाहेरच्या कपड्यांमध्ये बसण्याची सवय मुलांना नसते. त्याकरिता सुरुवातीला पेहराव असा निवडावा, जो खूप घट्ट अथवा खूप सैलही नसावा. घट्ट कपडे वापरण्यासाठी वातावरणही सध्या पोषक नाही. ब्लड सर्क्युलेशनला ही अडचण येऊ शकते. मुलींना हायवेस्ट जीन्स बॅगी स्टाइल व त्यावर सुरेखसा क्रॉप टॉप, केसांची हाय पोनीटेल आणि पायात स्निकर्स. तर मुलांना कॉटन ट्राउझर्स, त्यावर एक फंकी टीशर्ट, पायात स्पोर्ट्स शूज व खांद्यावर एक सिंगल स्ट्रॅप लेदर बॅग घेतली, की बेसिक कॉलेज गोअर्सचा लुक पूर्ण होतो, जो प्रत्येक कॉलेजमध्ये हमखास बघायला मिळतो.
या व्यतिरिक्त कॉलेजच्या तरुणाईमध्ये फ्लोरल पँट आणि टीशर्ट, फ्लोरल स्कर्ट, प्लेन क्रॉप टॉप्स, रफल्ड टॉप्स आणि रफल्ड थ्री फोर्थ पँट, फंकी टीशर्ट, ट्युनिक ड्रेसेस, जम्पसूट, टॅंक टॉप्स, कॉटन श्रग्स आणि ब्लेझर्स, हे विशेष पसंतीचे आहेत.
फुटवेअरमध्येही अनेक प्रकारचे डिझाइन्स, क्रॉक्स, स्निकर्स, फ्लिपफ्लॉप्स, स्पोर्ट्स शूज, मोकाझिन्स, हिल्स हे प्रचलित आहेत.
बॅग्जमध्ये कॉटन शोल्डर बॅग्स, लेदर बॅग्स, शबनम बॅग्स याही प्रचलनात आल्या आहेत.
सो गेट गोइंग कॉलेज तरुणाई, शॉपिंग लिस्ट तयार करा आणि काय हवे नको, त्या सगळ्या खरेदीला लागा!