साडीची आगळीवेगळी स्टाइल

सोनिया उपासनी
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

‘साडी’ या शब्दाबरोबर सगळ्याच बायकांच्या भावना, आठवणी आणि किती तरी नाजूक धागे जोडले गेले आहेत. ही अमुक साडी आपल्या आयुष्यातील कोणा एका खास व्यक्तीने दिलेली असते. तर, कधी ती साडी ठराविक प्रसंगाला दिलेली असेल, तर त्या प्रसंगाच्या आठवणीही त्या साडीबरोबर जोडलेल्या असतात. स्वतःच्या लग्नातल्या साड्या आणि जरतारीच्या शालूबद्दल तर बोलायलाच नको. पण कालांतराने प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडतोच, की बऱ्याच वेळा नेसून झाल्यावर या सगळ्या साड्यांचे आता करायचे काय? 

वॉर्डरोबमध्ये नवनवीन साड्यांचे आगमन झाल्यामुळे, या अर्धवट जुन्या झालेल्या साड्या मागे पडतात. बर या साड्यांबरोबर इमोशन्स इतके जोडलेले असतात, की कोणाला द्याव्या म्हटले तर तेही होत नाही आणि धड वापरताही येत नाहीत.

अशा वेळी एखाद्या ड्रेस डिझाइनरकडे जाऊन या नवीनच पण वारंवार नेसून कंटाळा आलेल्या साड्यांना एक नवा आगळा वेगळा डिझाइनर लुक देता येतो. अशा साड्यांपासून तयार केलेल्या ड्रेसेसचे हल्ली खूप फॅड आहे. पदर जर भरजरी असेल आणि साडीचे काठ सुरेख असतील, तर त्यापासून क्रिएट केलेल्या कलाकृतीला बघून कोणाच्या तोंडून ‘वॉव’ नाही निघाले तर नवलच! 

फक्त ‘रेनोव्हेटिंग सारीज’ हा कन्सेप्ट घेतला, तर त्यातून बरेच वैविध्य साकारता येते. साध्या प्लेन जॉर्जेटच्या साडीचा एक सुरेख घेरदार वनपीस ड्रेस व त्यावर प्रिंटेड अथवा ब्रोकेडचे श्रग टीम अप केले, तर कुठल्याही पार्टी अथवा समारंभात उठून दिसेल.

भरजरी जरतारी शालूचा कळीदार घेरदार ड्रेस, नी लेंथ ड्रेस, कफ्तान स्टाइल ड्रेस कुठल्याही समारंभात मिरवता येईल. कांजीवरम साडीचा लेहेंगा अथवा घेरदार प्लाझो व त्यावर ब्रोकेडचा वेस्टलेंथ ब्लाऊज याची सर कुठल्याही ट्रॅडिशनल वेअरला येणार नाही. गढवाल, पैठणी, साऊथ सिल्क, पटोला यांची शिवलेली हाफ साडी तर आजकालच्या तरुणाईची विशेष पसंती आहे, ही कारण नेसायला झटपट व चारचौघात उठून दिसेल अशी असते.

याचबरोबर प्लेन साड्यांना जुन्या जरीच्या साड्यांची बॉर्डर लावून तयार केलेल्या साड्या, कुर्ते, स्कर्ट व वन पीसही सध्या खूप चलनात आहेत. 

हे झाले कपड्यांचे. जरीच्या साड्यांपासून तयार केलेले टेबल टॉप कव्हर्स व त्यावर टेबल मॅट, दिवाण स्प्रेड, कुशन व लोड कव्हर्स, जरीचे पडदे हे सर्व रूमला एक ट्रॅडिशनल आणि फ्रेश लुक देतात. शिवाय जुन्या साड्यांचा उपयोग योग्यरीत्या होतो आणि त्या साड्यांसंदर्भात जोडलेले इमोशन्सही जपले जातात. प्युअर सिल्कच्या साड्यांपासून तयार केलेले क्विल्ट आणि बेडकव्हर्सही सुरेख दिसतात. 

तर अशा या जुन्यातून नवीन कलाकृती तयार करून नवीन फॅशन ट्रेंड आणता येतो. शेवटी फॅशन म्हणजे काय हो? जुन्यातूनच (कापड असो वा काळ) जे नवीन साकारले जाते आणि सर्वांकडून जे स्वीकारले जाते!!

संबंधित बातम्या