ब्लॉक प्रिंटिंग

सोनिया उपासनी
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

फॅशनच्या चंदेरी दुनियेतून कधीच लुप्त न झालेली म्हणजे ‘ब्लॉक प्रिंटिंग’. ब्लॉक प्रिंटिंग हे प्राचीन काळापासून आशियाई देशांमध्ये खूप प्रचालनात आहे. ब्लॉक प्रिंटिंगची प्रक्रिया वरवर सोपी दिसत असली, तरी अत्यंत क्लिष्ट आहे. सर्वप्रथम जे डिझाइन कापडावर छपायचे. त्याचे स्टेन्सल तयार करून लाकडाच्या अथवा मेटलच्या ठोकळ्यांवर उमटवले जाते. नंतर त्यावर कोरीव काम करून डिझाइन ठोकळ्यांवर व्यवस्थित सफाईदारपणे कोरले जाते. सुंदर नक्षीकाम करून वेल बुट्टे, पाने, कोयऱ्या, देवदेवतांची चित्रे, जिऑमेट्रिकल पॅटर्न, ॲनिमल प्रिंट, झाडे, पक्षी यांचे अनेक प्रकारचे डिझाइन्सचे ब्लॉक्स तयार केले जातात. मग विविध रंगांचा वापर करून वेगवेगळे फॅब्रिक डाय तयार केले जातात. 

यामध्ये विशेषतः व्हेजिटेबल डाय (नॅचरल कलर) आणि केमिकल डाय (कृत्रिम कलर) असे दोन प्रकार आहेत. ब्लॉक प्रिंट सिंगल कलरने अथवा मल्टिकलरनेही करता येते. मल्टिकलर प्रिंटिंगसाठी एकाच डिझाइनचे अनेक खाचे असलेले विविध ब्लॉक्स वापरले जातात. व्हेजिटेबल डायमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर होतो. उदाहरणार्थ हळदीपासून पिवळा रंग, बिटापासून गुलाबी, हळद आणि लिंबाच्या मिश्रणाने लाल रंग, कोबीपासून जांभळा, वनस्पतीपासून हिरवा, झाडांच्या सालींपासून ब्राउन, केशर वापरून केशरी, असे एक ना अनेक विविध वनस्पती, फळे , फुले, पाने व भाज्या वापरून एका सुंदर कलाकृतीची निर्मिती होते. व्हेजिटेबल डायमध्ये रंगांचा चॉईस तसा लिमिटेड असतो. कृत्रिम रंग मात्र पाहिजे त्या शेड्समध्ये उपलब्ध असतात आणि व्हेजिटेबल डायच्या तुलनेत जास्त पक्के व टिकाऊ असतात. 

भारतातील अनेक ब्लॉक प्रिंटिंगच्या प्रकारांपैकी काही प्रसिद्ध प्रकार- 

१) अजरख प्रिंट - हे प्रिंट गुजरात, राजस्थान येथील सिंधी, कच्छ, बारमेर येथे तयार होते. यात मुख्यत्वे जिऑमेट्रिकल डिझाइन आणि फ्लोरल प्रिंट असतात. अरेबिक भाषेत अजरख म्हणजे ‘निळा रंग’. 

२) बाघ प्रिंट - बाघ स्टाइल ही प्रिंटिंगची अत्यंत युनिक स्टाइल आहे. याचे काम मध्यप्रदेशातील बाघ या गावात होते म्हणून हे नाव प्रसिद्ध झाले. कॉटन, लिनन आणि सिल्क या कापडांवर हे प्रिंट केले जाते. बोल्ड प्रिंट्सचा वापर जास्त होतो.

३) दाबू प्रिंट - हे टेक्निक डार्क कलरच्या कापडावर लाइट कलर वापरून तयार केले जाते. राजस्थानमध्ये हे जास्त प्रचलित आहे. पाने, झाडांचे मोटिफ जास्त वापरले जातात. 

४) बाटिक प्रिंट - बाटिक प्रिंट हे वॅक्स आणि डाय या दोन्हीच्या मिश्रणाने तयार होते. गुजरात, राजस्थान, बंगाल, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये बाटिकचे काम केले जाते.

५) कलमकारी प्रिंट - हे आंध्रप्रदेशचे आहे. हे प्रिंटिंग चिंचेच्या काडीने सिल्क अथवा कॉटन फॅब्रिकवर केले जाते. यामध्ये वनस्पतींपासून आणि फळांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर होतो. देवदेवतांची चित्रे, बर्ड मोटिफ, वेल बुट्टी काढल्या जातात.

६) सांगनेर प्रिंट - जयपूर जवळच्या सांगनेर गावावरून या प्रिंटचे नाव पडले. इथले सर्व कारागीर फक्त या प्रिंटिंगच्या व्यवसायात आहेत. छोटे बुट्टे व नाजूक प्रिंट ही खासियत आहे.

७) बागरू प्रिंट - बागरू प्रिंट हीसुद्धा राजस्थानची देण आहे. बागरूमध्ये प्राण्यांचे आणि पक्षांचे मोटिफ वापरले जातात. त्यामुळे याला गीर प्रिंट असेही म्हणतात.

८) गोल्ड आणि सिल्वर डस्ट प्रिंट - या प्रिंटमध्ये सोन्याचा आणि चांदीचा वखर वापरून डिझाइन तयार होते. वेगवेगळ्या प्रकारची फुले, पाने आणि नाजूक नक्षी जास्त करून वापरतात. 

संबंधित बातम्या