गुलाबी थंडी, ‘वूलन’ची चलती!

सोनिया उपासनी
सोमवार, 14 डिसेंबर 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

हे गुलाबी थंडीचे दिवस आहेत. हिवाळ्यातही नेहमी इतकाच फॅशनेबल आणि स्टनिंग लुक स्वतःला देता येतो. या ऋतूतील समारंभांसाठी अनंत पर्याय उपलब्ध आहेत. अगदी समारंभांना नटण्यापासून ते कॅज्युअल आणि पार्टी वेअरपर्यंत. 

वूलन साड्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे. काश्मीरची पष्मीना साडी एकदम उबदार. काठीयावाडी वूलन वर्क असलेल्या साड्यांना तर समारंभांसाठी विशेष मागणी आहे. साड्यांप्रमाणेच वूलन ब्लाऊजही ट्रेंडमध्ये आहेत. अगदी मनमोहक वीण वापरून शिमर वूलने तयार केलेले ब्लाऊज आणि त्याच्या जोडीला शिमर साडी कुठल्याही समारंभाची शान वाढवेलच. 

अगदी ऑफिस वेअरमध्येसुद्धा प्युअर कॉटन अथवा लिननबरोबर वूलन टॉप्स अथवा ब्लाऊज टीम अप केले, तर कामावरसुद्धा वेगळा लुक कॅरी करता येईल. 

कुर्तीमध्येसुद्धा वूलन्सच्या निरनिराळ्या डिझाइन्सनी बाजारपेठ सजली आहे. वूलन कुर्ती आणि त्याबरोबर वूलन लेगिंग अथवा जीन्स आणि गळ्याभोवती एक सुंदर वूलन स्कार्फ, एक छान कॅजुअल लुक देतो. वूलन क्रॉप टॉप्स, स्वेटर्स, स्वेट शर्ट आणि पुलओव्हर्सचे तर असंख्य पॅटर्न आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत. वूलन वनपीस आणि स्टॉकिंग्ज तर ट्रेंडमध्ये आहेतच. पार्टी वेअरमध्ये फ्लॅनेलचे शॉर्ट अथवा लाँग स्कर्ट आणि त्यावर शिमर वूलचे क्रॉप टॉप्स, वूलन पुलओव्हर्स जीन्सवर टीम अप केलेले, अथवा वूलन wraparounds इन थिंग्स आहेत. त्याच्या जोडीला वूलन स्कार्फ, कॅप्स, कॅप्स विथ मास्क्स हे पेहरावांच्या लुकमध्ये अधिकच भर घालतात. 

लेदर जॅकेट्स तर कायमच फॅशनचा अविभाज्य भाग असतात; ही एक अशी विंटर फॅशन आहे जी कधीच जुनी होणार नाही. एव्हरग्रीन लेदर जॅकेट्स विविध रंगांमध्ये आणि साइझेसमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. 

शॉल्समध्ये तर विविध रंगी स्टायलिश पिसेस आपल्या गरजेनुसार उपलब्ध आहेत. 

वूलन पेहरावांबरोबर कमीतकमी ज्वेलरी घालावी. स्टायलिश बुट्स, मोजडी आणि पाय पूर्ण कव्हर होतील असे फुटवेअर पेहरावानुसार निवडले, तर सगळा लुक अधिकच खुलून दिसतो. 

एल्बो लेंथ ग्लोव्ह्जही सध्या फॅशनमध्ये आहेत. 

या सर्व गोष्टींसाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. नीट काळजीपूर्वक वापरले तर सर्व वूलन कपडे वर्षानुवर्षे छान टिकतात.

ही तर या ऋतूची सुरुवात आहे. चला तर मग हिवाळी फॅशनसाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये नवीन भर घालूया. कोण म्हणते, हिवाळ्यात फॅशनेबल दिसता येत नाही!

संबंधित बातम्या