पदरावरती जरतारीचा मोर...
स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... याविषयी जाणून घेऊया!
पदरावर मोर असलेली पैठणी आपल्या राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे. कुठलाही नॅशनल अथवा इंटरनॅशनल फॅशन वीक असो, पैठणी ही सगळ्यांवर भारीच पडते. महाराष्ट्रातली तर सगळी कार्ये व लग्नसमारंभ, पैठणी नसेल तर अपूर्ण वाटतात. पाचवार व नऊवार या प्रकारांमधल्या पैठण्या प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलवतात.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पैठण नावाच्या गावी ही अप्रतिम कलाकृती विणण्यास सुरुवात झाली, त्यावरून हिचे नाव पैठणी असे पडले. आता पैठण व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील येवला हे गाव भारतातील सर्वात मोठे पैठणी उत्पादक गाव आहे. येथे हँडलूम व पॉवरलूम दोन्हीवर पैठण्या विणल्या जातात.
सतराव्या शतकापासून अगदी काही दशकांआधीपर्यंत ही स्पेशल वीव्ह फक्त राजे-महाराजे, राजघराण्यातील इतर लोक आणि काही गर्भश्रीमंत लोकांसाठीच विणली जात असे. त्यात सुती अथवा रेशमी धाग्याबरोबर चांदीचा अथवा सोन्याचा धागा विणून अप्रतिम कलाकृती विणल्या जात. ताण्याला (warp) सुती धागा आणि बाण्याला (weft) गर्भरेशमी धागा.
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात असल्याने पारंपरिक पैठण्यांवर तेथील कलाकृती आणि पेंटिंग्जचे छाप बघायला मिळतात, उदा. कमळ मोटिफ, हंस मोटिफ, अशर्फी अथवा डॉलर बुट्टी, असवली मोटिफ, बांगडी मोर, राघू मैना मोटिफ, अमरवेल बुट्टी, नारळी मोटिफ, मोर, कोयरी मोटिफ, छोट्या बुट्ट्या, छोटी वर्तुळे, चांदण्या, चंद्रकोर, रुईची फुले, कालशपाकळी, पानांचा गुच्छ. या प्रकारची डिझाइन्स पैठणीच्या मेन बॉर्डर आणि पदरावर वापरली जातात. पदराचे पॅटर्न हिरव्या लाल रंगाचा मुनिया, लाल रंगाच्या आउटलाइनने हायलाइट केलेले जॉमेट्रिकल पॅटर्न तयार केले जातात.
या डिझाइन्सच्या आधारावर पैठणीचे विविध प्रकारांत वर्गीकरण केले गेले. पेशवेकालीन गर्भरेशमी पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी, बालगंधर्व पैठणी, मोरबांगडी पैठणी, मुनिया (राघू मैना) ब्रोकेड पैठणी, लोटस ब्रोकेड पैठणी, कडीयाल बॉर्डर पैठणी, चंद्रकळा, शिरोदक पैठणी. पैठणीचे हे सर्व प्रकार अत्यंत लोकप्रिय झाले. गोल्ड आणि सिल्व्हर जरीकाम, या दोन्ही प्रकारांनी रॅम्प गाजवला आणि असंख्य स्त्रियांच्या मनावर आजही हुकमत गाजवून आहेत. अस्सल पैठणीची गुणवत्ता तपासायची असेल, तर ती उलट आणि सुलट दोन्ही बाजूंनी सारखी दिसते. अस्सल हातमागावरच्या कुठल्याच दोन पैठण्या एकसारख्या नसतात, जरी डिझाइन सारखे दिसत असले तरीही. अस्सल पारंपरिक पैठण्या हँड डाईड रेशमाचे धागे वापरून विणल्यामुळे निवडक रंगांमध्येच उपलब्ध असतात. याउलट सिंथेटिक धागा मिक्स केलेल्या पॉवरलूमच्या पैठण्या असंख्य रंगछटांमध्ये बघायला मिळतात.