आसामी सिल्क

सोनिया उपासनी
सोमवार, 3 मे 2021


स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांमधील एक राज्य म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेले आसाम. आसाम चहाबरोबरच आसाम कॉटन आणि आसामी सिल्कसाठीही प्रसिद्ध आहे. येथील कामरूप तालुक्यातील सुलकची गाव विणकर वस्ती म्हणून ओळखले जाते. येथे उच्च दर्जाचे रेशीम व सुती तंतूचे व कापडाचे उत्पादन होते.

आसामी महिलांचे पारंपरिक वस्त्र म्हणजे मेखला चादोर व पुरुषांचे पारंपरिक वस्त्र धोती, कुर्ता व गमछो होय. सर्व प्रकारच्या मेखला चादोर आसामी सिल्कपासून तयार होतात. पण आसाममध्ये उत्पादन होणारे काही विशिष्ट प्रकारचे रेशीमच मेखला चादोर विणण्यासाठी वापरले जातात. 

मेखला चादोरबरोबरच दुकुल नामक सुती वस्त्रदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. प्रत्येक मुलीला ‘बोवा-कटा’ (सूत कातणे व विणणे) आले पाहिजे अशी प्रथा आजही आसाममध्ये आहे. हा पारंपरिक पोशाख महिला व पुरुष त्यांच्या सर्वात मोठ्या सणाला ‘बीहू’ला व सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये परिधान करतात. आसामी रेशमी 

वस्त्रांचा तीन प्रकार होय

  • मुगा सिल्क ः ईशान्य राज्यांमध्ये मुगा सिल्कपासून तयार केलेली वस्त्रे पूर्वीच्या काळी फक्त राजघराण्यातील लोक परिधान करत. हे वस्त्र उच्च दर्जाच्या रेशमाच्या धाग्यांनी विणले जाते. हे हाताने धुता येते आणि प्रत्येक धुण्यानंतर या सिल्कची चमक वाढतच जाते, हे याचे वैशिष्ट्य. याचमुळे पारंपरिक आसामी वस्त्र विणण्यासाठी मुगा सिल्क ही सर्व विणकरांची पहिली पसंती असते. 
  • पाट सिल्क ः पांढऱ्या पानांच्या शहतुतावर (तुती) रेशीम तयार करणाऱ्या किड्याचे संवर्धन केले जाते, तेव्हा त्याच्या पांढऱ्या कोशावरणावरून नॅचरल व्हाईट अथवा ऑफ व्हाईट सिल्कचे धागे तयार होतात. याच तंतूंपासून पारंपरिक पांढरे-लाल काठ असलेले मेखला चादोर व गमछो तयार केले जाते. सुरेख टेक्श्चर आणि शाईन असलेले हे पाट सिल्क नीट काळजी घेतल्यावर वर्षानुवर्षे छान टिकते.
  • एरी सिल्क ः एरी सिल्क हे व्हेजिटेबल सिल्क म्हणून पण ओळखले जाते. मलबेरीची (शहतूत) पाने खाऊन रेशमी किडा जगतो. किड्यापासून फुलपाखरामध्ये रूपांतरित होण्यासाठी या रेशीम तयार करणाऱ्या किड्याला त्याच्या लाळेपासून तयार केलेल्या कोशामध्ये अनेक दिवस राहावे लागते. जेव्हा हा किडा आपला कोश सोडून जातो, तेव्हा उरलेल्या कोशापासून जो रेशमी तंतू तयार होतो, त्याला एरी सिल्क म्हणतात. या प्रक्रियेत कुठल्याही किड्याला नुकसान न पोहचवता हे सिल्क वस्त्र निर्मितीत वापरले जाते. परिणामी, एरी सिल्क हे मुगा सिल्क आणि पाट सिल्कपेक्षा अधिक दाट आणि जाड पोताचे असते. हे सिल्क थर्मल असल्याकारणाने सर्व ऋतूंमध्ये परिधान करता येते. थोडेसे व्हेलवेटी असलेले पोत, साड्या, सलवार सूट, कुर्ता, शॉल, इतर ड्रेसेस, स्टोल्सबरोबरच होम फरनिशिंगमध्येही वापरले जाते. एरी सिल्कचे पडदे, बेड कव्हर्स, चादरी घराची शोभा वाढवितात.

संबंधित बातम्या