फॅशनेबल खादी

सोनिया उपासनी
सोमवार, 14 जून 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध करण्यासाठी तयार झालेली खादी आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. एवढेच नव्हे तर कपड्यांबरोबर होम फर्निशिंगमध्येही खादीचा वापर होतो.

‘खादी’ अथवा ‘खद्दर’चा प्रसार भारतात स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून सुरू झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वावलंबनासाठी आणि भारतीयांना त्यातून स्वयंरोजगार मिळावे यासाठी स्वदेशी चळवळ सुरू झाली. त्यावेळी खादीची वस्त्रनिर्मिती करण्याचा उद्देश फक्त अमेरिकी आणि ब्रिटिश लोकांनी तयार केलेल्या वस्त्रांचा आणि वस्तूंचा निषेध करणे एवढाच होता. तेव्हा खद्दर हे फक्त सुतीच असायचे. कापसापासून चरख्यावर जाडसर सूत कातून त्या सुतापासून वस्त्र विणले जात. या खादीच्या वस्त्राचे वैशिष्ट्य असे की उन्हाळ्यात हे वस्त्र थंडावा निर्माण करायचे आणि थंडीमध्ये ऊब! 

स्वातंत्र्योत्तर काळात खादीला चांगले दिवस बघायला मिळाले. फक्त सुतापर्यंत मर्यादित न राहता, चरख्यावर रेशमी व लोकरी बिंडल कातले जाऊ लागले. या ‘हँड स्पन’ सुती, रेशमी व लोकरी धाग्यापासून विविध प्रकारची वस्त्र निर्मिती होऊ लागली. कॉटन खादी, खादी सिल्क व वूलन खादी अशा वस्त्रांचे प्रकार तयार झाले. उत्तर भारतापासून खादी वस्त्र निर्मितीची चळवळ संपूर्ण भारतात पसरली व भारताच्या कानाकोपऱ्यात खादीच्या वस्त्रांची निर्मिती होऊ लागली. प्रारंभी फक्त भारतातील बाजारपेठेत जाणारी खादी नंतर जगभरात निर्यात होऊ लागली. 

कालांतराने खादीच्या टेक्स्चरमध्ये कायापालट झाले. अगदी सुरुवातीला जाडसर व खरबरीत असलेल्या खद्दरला मऊ तलम फील आला. आजही खादी वस्त्र निर्मिती ही फक्त चरख्यावर तयार झालेल्या सुतानेच केली जाते. संपूर्ण जगातील फॅशनप्रेमींची आवडती आणि सर्व फॅशनविकमध्ये अव्वल दर्जाचे स्थान मिळवणारी खादी आता घराघरात पसंतीस येऊ लागलीय. पुरुषांची जॅकेट्स, कुर्त्यांचे कापड, शर्ट, याबरोबरच वूमेन्स फॅशनमध्येही खादीने धुमाकूळ घातला आहे. खादी सिल्कच्या साड्या व ड्रेस मटेरियल सर्व वयोगटात आवडीने परिधान केले जाते.

होम फर्निशिंगमध्ये खादी वस्त्रापासून तयार केलेल्या अनेक सुंदर कलाकृती  बाजारपेठेत बघायला मिळतात. कोस्टर्सपासून पडद्यांपर्यंत घरात लागणाऱ्या सर्व वस्तू देशविदेशात निर्यात होतात.

संबंधित बातम्या