त्वचेलाही जपा 

स्वप्ना साने
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
 

उन्हाळ्याची चाहूल लागताच आपण वेगवेगळे सनप्रोटेक्‍शन क्रीम्स आणि लोशन्स, फेअरनेस पॅक, साबण, बीबी क्रीम्स या गोष्टींची खरेदी सुरू करतो. एवढेच नाही, तर टॅन न होण्यासाठी सनकोट, स्कार्फ, हातमोजे, पायमोजे, गॉगल्स हे सगळे वापरतो. इतके करूनही उन्हाळ्यात त्वचा नितळ आणि टवटवीत दिसत नाही. चेहरा, हात, पाय आणि पाठ काळवंडतातच. कितीही काळजी घेतली, तरी त्वचा निर्जीव व कोरडी दिसते. अनेकांना उष्णतेमुळे घामोळ्या होतात आणि तळपायाला भेगाही पडतात. तर, या सगळ्या तक्रारींना उन्हाळ्यात कसे सामोरे जावे? 

खाली नमूद केलेल्या काही टिप्स नक्कीच या तक्रारी दूर करू शकतील  

 • आपली त्वचा ओळखून त्यानुसार सौंदर्य प्रसाधने निवडावीत. उदा. तेलकट त्वचेला जेल असलेले प्रॉडक्‍ट्‌स उपयुक्त आहेत. तर, कोरडी आणि रुक्ष त्वचा असेल तर तेल असलेले प्रॉडक्‍ट्‌स उपयुक्त आहेत. 
 • पुरुषांची त्वचा असो वा स्त्रियांची किंवा कुमारवयीन मुलामुलींची त्वचा असो, सर्वांनीच रोज रात्री CTM म्हणजेच क्‍लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्‍चरायझिंग करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात आणलेला मॉइश्‍चरायझर उन्हाळ्यासाठी उपयुक्त नाही. ऋतू बदलला, की सौंदर्य प्रसाधनदेखील बदलावे लागेल. उन्हाळ्यासाठी SPF असलेली सौंदर्य प्रसाधने वापरावीत. 
 • आठवड्यातून एकदा मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य स्क्रब किंवा उटणे वापरावे. त्याने घासून मृत त्वचा काढावी. संपूर्ण शरीरावरची मृत त्वचा निघाल्यावर क्रीम्स किंवा लोशन चांगले अबसॉर्ब होते आणि पेशींना पोषण मिळते. 
 • उन्हाळ्यात कमीतकमी मेकअपचा वापर करावा. शक्‍य असेल तर ‘नो मेकअप’ लुक असावा. कारण, मेकअपमुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात आणि घाम आल्यामुळे तो पुसला जाऊ शकतो. 
 • घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा उपयोग करावा, किमान ३० SPF असलेले क्रीम वापरावे. यात तैलीय (ऑयली) त्वचेसाठी जेल असलेली सनस्क्रीन उपलब्ध आहेत. तर, कोरड्या त्वचेसाठी ऑइल बेस असलेली क्रीम्स अथवा लोशन आहेत. हल्ली BB क्रीम आणि CC क्रीम खूप मिळतात. त्याचा वापर करू शकता. तसेच, त्यामध्ये योग्य तो SPF असेल, तर आणखी वेगळ्या सनस्क्रीनची गरज भासणार नाही. 
 • चेहरा नीट राहावा यासाठी फेसपॅकचा वापर आठवड्यातून दोनदा तरी करावा. चंदन आणि मुलतानी मातीचा पॅक गुलाब जलमध्ये तयार करून लावावा. हा पॅक सदाबहार आहे आणि सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांना सूट होतो. 
 • उन्हाळ्यात त्वचा जास्त टॅन होते. सनस्क्रीन वापरूनही त्वचा थोडीफार काळवंडतेच. घरच्या घरी यावर उपाय करता येऊ शकतो. तुम्ही घरगुती फेसपॅक तयार करू शकता. मसूर डाळीची पूड करावी व ती दह्यात मिसळून पॅक लावावा अथवा बेसन आणि दही एकत्र करून पूर्ण अंगाला लावावे. खूप चांगला फायदा होतो. 
 • उन्हाळ्यात त्वचेप्रमाणेच केसांची काळजी घेणेही तेवढेच आवश्‍यक आहे. उष्णतेमुळे आणि घामामुळे केस तेलकट होतात आणि नीट सेट होत नाहीत. त्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा एक दिवसाआड केस धुवावेत. चेहऱ्याप्रमाणे केसदेखील तेलकट किंवा कोरडे असू शकतात. त्यामुळेच आपल्या केसांना योग्य अशा शॅम्पूची निवड करावी. खूप रुक्ष केसांसाठी शॅम्पूनंतर कंडिशनर वापरावे. शॅम्पूची निवड करताना नेहमी सौम्य आणि हर्बल ॲक्‍टिव्ह असलेले ब्रॅंड घ्यावेत. 
 • किमान एकदा तरी आपल्या ब्युटीशियनकडे जाऊन कुलिंग फेशियल करावे. वॅक्‍सिंग करावे. त्यामुळे स्वतःलाच स्वच्छ आणि फ्रेश वाटते. स्लिव्हलेस कपडे वापरल्यामुळे हात खूप काळवंडतात. त्यासाठी हॅंड पॉलिशिंग आणि अँटी टॅनिंग ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे काळपटपणा निघून जातो. ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहण्यासाठी होम केअर करावे. हे आपल्या सौंदर्य तज्ज्ञांना विचारून करावे. 
 • पुरुषांनीही ब्युटी सलूनमध्ये जाऊन वेळच्या वेळी फेशियल करावे. त्वचा खूपच टॅन झाली असेल, तर अँटी टॅन पॅक किंवा ब्लीच करू शकता. तसेच मुलतानी माती आणि दही एकत्र करून होममेड फेसपॅक तयार करता येईल. हा पॅक त्वचेचे कुलिंग करेल आणि रिफ्रेशही वाटेल. हा पॅक कोणत्याही प्रकारच्या त्वचेला उपयुक्त आहे. 
 • स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची त्वचा जरा जाडसर आणि रफ असते. त्यात रोज शेव्हिंग केल्यामुळे त्वचा मऊ राहात नाही. त्यासाठी उपयुक्त असे मॉइश्‍चरायझर लावावे आणि उन्हामध्ये जाण्याच्या २० मिनिटे आधी सनब्लॉक किंवा सनस्क्रीन लावावे. हल्ली बाजारात पुरुषांच्या त्वचेला उपयुक्त अशी सौंदर्य प्रसाधने मिळत आहेत. तर, आपल्या त्वचेनुसार त्यांचा वापर करावा. 
 • उन्हाळ्यात बऱ्याचदा ओठ फाटल्याचे आढळून येते. शरीरात पाण्याची कमतरता होत असते, सतत येणारा घाम किंवा सतत एसीमध्ये बसूनही ओठांची साले निघू शकतात. यावर उपाय म्हणजे चमचाभर मध, दोन थेंब लिंबू रस आणि चिमूटभर साखर यांचे मिश्रण करून त्याने आधी ओठांना हलक्‍या हाताने स्क्रब करावे आणि नंतर शिया बटर किंवा कोको बटर असलेले लीप बाम लावावे. लगेच फायदा होतो. अशा वेळी लिपस्टिकचा वापर करताना लिपस्टिक चांगल्या ब्रॅंडची आणि शिया बटर असलेली घ्यावी. 
 • उन्हाळ्यात बऱ्याचदा तळपायाला भेगा पडतात. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन पेडीक्‍युअर करावे. तसेच रात्री फूट क्रीमचा वापर करावा. खूपदा उष्णतेमुळे वारंवार तळपायाची आग होते. अशावेळी रात्री तळपायाला मेंदीचा लेप लावावा आणि सकाळी धुऊन टाकावा. खोबरेल तेलाचे मालिश केल्यास त्यानेही आराम पडतो. 
 • घरच्या घरीही काही उपाय करता येऊ शकतात. टॅन कमी करण्यासाठी पपईच्या गराचा लेप करून लावावा. याशिवाय ओट्‌सची पावडर करून त्यात मध आणि दही घालावे व पॅक करून ठेवावा. हा पॅक संपूर्ण शरीराला लावता येतो. 
 • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे. तसेच काकडी, कलिंगड खावे. शक्‍य असेल तेव्हा कोकम सरबत, लिंबू पाणी घेत राहावे; जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि तजेलदार दिसेल.

वरील माहिती सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. तरीही कोणाला काही त्वचाविकार असेल, तर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच कुठलाही उपाय करणे योग्य ठरेल.

संबंधित बातम्या